मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

हनुमंता

हनुमंता
******

हे महाबली हनुमंता 
तुझे सामर्थ्य नको मला 
तुझा पराक्रम ही नको मला 
तुझ्या अष्ट सिद्धीच्या तर 
मी जाणारच नाही वाट्याला 
कारण तेवढी शक्ती नाही 
माझ्यात 
त्या मिळवायला 
आणि अर्थात गरजही नाही 

पण आज 
तुझ्या जन्मोत्सवाच्या दिवशी 
तुला वंदन  करतांना 
तुझा आशिर्वाद घेतांना 
मागावी अशी वाटते ती
तुझी प्रभू रामचंद्रवरची भक्ती 
त्यांच्यावर असलेले प्रेम 
तुझी असीम शरणागती
अपरिमित समर्पण 

त्याचा फक्त एक कण 
दे तू मला 
त्या एका कणानं
या आयुष्याचं होईल सोनं

हे बलभीमा पवनपुत्रा 
खरेच
ती गती दे
ती भक्ती दे
ती युक्ती दे 
ती कृती दे 
प्रभू रामचंद्राच्या चरणाशी 
कायमचे
सदोदित 
हरक्षण 
अहर्निश 
लीन होण्याची 
गुंतुन राहण्याची .

अन याहून अधिक 
काही न मागण्याची 
बुद्धिही 
तुच दे वीरोत्तमा .


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

प्रेम

प्रेम
*****

मला वाटतं 
मृत्यूनंतर माणसातील प्रेम 
अलगद बाहेर पडतं  
अन कुठल्या पानात 
कुठल्या फुलात कुठल्या रानात 
जावून बसतं. 
  
अन मिळताच एक हळवं मन 
त्यात हळूवार प्रवेश करतं.

तेव्हा ते अगदी नव कोरं असतं.
स्मृतिचा कुठलाही डाग नसलेलं. 
जन्माला येणार्‍या बाळासारखं.

नाहीतर हे जग संपून गेलं असतं.

कारण प्रेम कुठ पिकत नाही
प्रेम कुणी विकत नाही
प्रेम कधीच मिळत नाही 
चोरुन वा बळजबरी करून .

प्रेम स्वत:च ठरवतं 
कुठे राहायच !

मवाळ मृदू संवेदनशील मन 
समजंस त्यागी जागरूक मन 
त्याहूनही 
मोकळं मुग्ध अन रिक्त मन 

तिथं प्रेम रूजतं वाढतं फोफावतं 

त्या प्रेमाला 
खरंच काही प्राप्त करायचं नसतं
आपल्या असण्यात राहायचं असतं.
अन ते राहतंही .
म्हणूनच ते प्रेम असतं


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

रविवार, २५ एप्रिल, २०२१

एक्सपिरिअन्स (अनुभवणे)

अनुभवणे
********:
आता प्रेम पुरे झाले 
भेटणे बिटणे पाहिजे सरले 
अरे घरच्यांना आहे संशयाने घेरले 
म्हटली ती त्याला 
अन तिने त्याचा अखेरचा निरोप घेतला 
ओके म्हणाला तोही तिला 
अन त्याने आपला रस्ता धरला 

किती सहज संपली ती कथा 
जसा की  पायातून सहज निघावा काटा 
मग ती गेली नाचतच घरी 
तोही परतला निमूटपणे आपल्या दारी 

मग जे घडले ते काय होते 
जणू काही मनाची खेळणे होते 
किंवा अतृप्त अनुभूतीचे 
पुन्हा उगवून येणे होते 

ते भेटणे ते बोलणे 
रुसणे आणि रागावणे 
ते मिठीत बहरणे 
ते ओठांचे थरथरणे 
ते होते का 
so called experience  घेणे
अनुभवामधून जाणे ?

मदिरेचा कैफ असतो तरी कसा ?
गांजा डोक्यात भिनतो तरी कसा ?
स्वप्ने अफुची कशी बरी सुखावतात ?
गर्द हशिम रंगात कुठल्या घेऊन जातात ?
तसेच काही असावे हे अनुभवणे 
तिचे अन त्याचेही 

एकदा नशा केल्यावर 
त्याची लत लागतेच असेही नाही 
अन समाजाची घरादाराची 
बंधनेही असतातच काही 
नशेसाठी असावी लागते 
एक बेदरकार हिंमतही 
कुठल्या लैला मजनू सारखी 
हिर रांजा सारखी 
ती नव्हतीच
त्याच्यातही अन तिच्यातही.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

आई


आई
****
तळपते उन असो वा 
कडाक्याची थंडी
सदैव आपल्या कामामध्ये 
हरवून गेली असे ती
लागेल ऊन फाटेल कांती 
तिला मुळी क्षिती नव्हती

किती वेगळी होती ती 
काय म्हणू तिला न कळे 
वेरूळातील सुंदर लेणे 
लोकगीत वा कुणी गायले 
गर्द हिरव्या रानातील 
अनाम फुल वा गंध भारले

खळखळत्या झर्‍यासारखे 
तिचे निर्मळ सरळ बोल 
मृदगंधाने मोहरलेली 
तिच्या शब्दामधील ओल 
नव्हता गर्व अहंकार 
पण करारी स्वाभिमान 
जनप्रिय ती मन मोकळी 
छक्के पंजे या जगताचे 
ठावुक असूनी ठावूक नसली

अशी माऊली जगावेगळी 
कणखर शीतल साधी सावळी 
होती जणू माझ्या जीवनी
आनंदाचा मेघच बनली 

गेला वर्षा ऋतु बरसून
जीवन सारे आले उमलून 
वाहू म्हणतो तिला सुमन
हरवून गेले परी ते चरण

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

दत्त सोन्याचा

दत्त सोन्याचा
**********
दत्त सोन्याचा सोन्याचा 
रत्न जडित रूपाचा ।
करी संहार तमाचा 
वर्ण सहस्त्र रश्मीचा ॥

दत्त पितळ तांब्याचा 
जरी एकाच साच्याचा ।
प्रिय आत्मकाम असे 
जणू प्रत्येक घराचा ॥

दत्त पाषाण अश्माचा 
कोणी कोरल्या हाताचा ।
स्त्रोत अखंड ऊर्जेचा 
लाख भक्तांच्या भेटीचा॥

दत्त मातीचा मातीचा 
अंग सुरेख रंगाचा ।
काच घरात ठेवला 
ठेवा कुणाच्या सौख्याचा ॥

दत्त मनाचा मनाचा 
द्वैत अद्वैत रसाचा ।
नाद ओंकार गुंजतो 
होतं स्पंद जगताचा ॥

दत्त पाहियेला ऐसा 
भाव भक्तीत नटला ।
देखे विक्रांत कौतुके
चित्ती दृढ ठसावला ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

साकडे

साकडे
******

पाहणे पाहणार्‍या सोडून गेले आहे 
किनारे पाणीयाने ओढून नेले आहे ॥
उद्ध्वस्त घाट सारे उध्वस्त मंदिरे ही 
लापता देव हे पुजाऱ्यासह झाले आहे ॥

आता या जगाचे करू तरी काय मी 
वाटोळेच पूजणाऱ्या मनाचे झाले आहे ॥
हे दुःख आसमंती आकाश व्यापलेले 
वणव्याचीच वस्ती हे शहर झाली आहे ॥

आक्रोश हे कुणाचे या कानात साचलेले 
का अंतर रुदनाचे गर्भागार झाले आहे ॥
विरतात हाका इथे कानात येण्याआधी 
पाहून वेदनांना पाषाण वितळले आहे ॥

हा अंत जगाचा नाही जाणती शहाणे ते
सुटून हात तयांचे जे विषण झाले आहे ॥
हा न्याय वर्तुळाचा जागेवरी यावयाचा  
ते दीर्घ लघु कुणी रे व्यास मोजले आहे ॥

पडणार वीज कुठे कळते ना कुणास
जग सारेच प्रार्थनेचे हात झाले आहे  ॥
विक्रांता कोडे तेच जगण्या नि मरण्याचे 
कळण्यास साकडे दत्तास घातले आहे॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

वाट

वाट
****
वाट चालूनी 
थकली 
चाल पायात
निजली 

चढ-उतार 
ते किती 
मागे पडली
वस्ती 

कधी घाटाची
वळणे
कधी पथाचे
तुटणे 

कुठे चालली  
कशाला 
नसे ठाव ची 
कुणाला 

प्रश्न उत्तर
नसले
दाही दिशांना
सांडले

जग दाटले
तिच्यात
खीळ तरीही 
पायात

देह अडली 
इथली 
नच  उरली
तिथली 

वने बांधून 
घेतली 
गावे  पालथी
घातली

शोध तरीही 
नव्याचा 
कुणासाठी तो
आजचा

आस व्याकूळ 
मनात
आशा उसनी 
डोळ्यात
 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...