शुक्रवार, १२ मार्च, २०२१

शिव दत्त

शिव दत्त
********

मोहाचे मांजर 
हातून मरावे 
काशीत घडावे 
जाणे मग ॥१॥

होवून भैरव 
दास त्या शिवाचा 
शव हे लुटावे 
आपलेच ॥२॥

निनादो ओंकार 
जप श्री शिवाचा 
अवघ्या तमाचा 
नाश होवो॥३॥

एक समिधा मी 
घाटाच्या धुनीची 
होऊन जन्माची 
इति व्हावी ॥४॥

उगाच धिवंसा 
उमटे चित्तात 
शिव त्या तत्वात 
लीन व्हावे॥५॥
 
अन्यथा काय तो 
कुठे न जगात 
श्वासाच्या लयीत 
भरलेला ॥६॥

विक्रांत दत्ताचा 
शिवाला नमितो 
दत्ताला पाहतो
शिवरुपी॥७॥

*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, १० मार्च, २०२१

खेळणे


खेळणे
******

सहज कुणाचे 
होऊनी खेळणे 
पाहीले जगणे 
दत्तात्रेया॥१
 
कधीतरी कुणी 
धरीयले उरी 
कुणी भूमीवरी 
टाकीयले॥२

आठवून कुणी 
काढले शोधूनी 
घेतले ओढूनी 
क्षणभरी ॥३

अन येताच तो 
कशाने कंटाळा 
चिंध्यांचा बाहुला 
पुन्हा तमी ॥४

सुख ते कसले 
असे खेळण्याला 
मनोरंजनाला 
जन्म त्याचा ॥५

जाहले खेळणे 
भरले रे मन 
औचित्य संपून
गेले मग ॥६

खेळणे होण्यात
गंमत रे आली 
गती वृत्तीतली 
दिसूनिया  ॥७

अगा दत्तात्रेया 
पुरे झाले सारे 
उसवले दोरे 
ठाई ठाई ॥८

विक्रांता कळले 
निरर्थाचे चाळे 
अस्तित्व जाहले 
उगा मग ॥९
***********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ९ मार्च, २०२१

संत चरित्रे

संत चरित्रे
*******

संतांची चरित्रे
रसाळ गोमटी 
भव बंध तुटी 
होय त्यांनी॥१॥

संत जणू काही 
चालती भूदेव 
स्वानंदाची ठेव 
तया पायी॥२॥

पावन पवित्र 
जीवन प्रसंग 
घडे संत सग 
आपोआप ॥३॥

सहज बोलणे 
असे उपदेश 
तन मन क्लेश 
दुरावती ॥४॥

निवते अंतर 
होय समाधान 
जीवा मिळे खूण 
निश्चिंती ची ॥५॥

तयाच्या शब्दांचे 
धरुनिया बोट 
चालतांना वाट 
शीण जाय ॥६॥

विक्रांत तयांचा 
ऋणी जन्मोजन्मी 
नित्य निरंजनी 
लक्षियले ॥७॥
*^*^*
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

ज्ञान आणि मनोरंजन

ज्ञान आणि मनोरंजन 
**************

ज्ञान आणि मनोरंजन 
यांचे जर झाले भांडण 
तर या भांडणात बहूदा
मनोरंजनच जिंकून जाते

खरतर ज्ञान तसे भांडत नसते 
पण आपला आग्रह सोडत नसते 
अन् मनोरंजनाला तर 
कसलीच पर्वा नसते 
रीतसर परवानगीचीही कुणाच्या 
मुळीच गरज नसते 

मनोरंजनाला हवी असते 
सुटका कामाच्या व्यापातून 
सुटका अधिकाराच्या दडपशाहीतून 
सुटका रोजच्या त्याच जीवनक्रमातून 
आणि अर्थातच 
सुटका सार्‍याच कटकटीतून 

कामावरून लवकर 
पळून जाणारी ड्युटी 
सहज थांबती होते 
अन मनोरंजनात रंगून जाते

ज्ञानाचे फायदे असतात 
अनुभव हजार गोष्टी सांगतात 
पण मुख्य म्हणजे या गोष्टी 
सामाजिक जाणिवेला जाग्या करतात 
रुग्ण बांधिलकी 
अन्याय  अत्याचार यांना 
बळी पडणार्‍या व्यक्तींबाबत 
कळकळ जर वाटत नसेल 
तर व्यर्थ असते 
तुमचे तथाकथित 
रुग्णसेवेचे व समाजसेवेचे व्रत 

ज्ञान हेच सांगू पहात असते त्यांना 
पण ते निवडतात मनोरंजनाचा रस्ता 
मग ज्ञानाची एक दमदार सर 
वाया जाते त्यांच्या आयुष्यातून 

उपनिषदात 
दोन ध्येय सांगितले आहेत जीवनाचे 
एक  श्रेय अन दुसरे प्रेय 
ज्यांनी प्रेय निवडले
त्यांना काय म्हणावे?
अर्थात
निवडीचा हक्क होता त्यांना
पण त्यांनी काय गमावले 
हे कळायलाही 
ज्ञान असावे लागते 
नाही का?
******:

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, ७ मार्च, २०२१

श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली


श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली  
*******

पाहियले स्वामी
अवधूतानंद
शक्तिचा तरंग 
उत्स्फुलित ॥१॥

पुत्र नर्मदेचा 
पुत्र शंकराचा 
पुत्र श्रीगुरूंचा 
कृपांकित ॥२॥

बेछुट शब्दात 
असे कळकळ 
भक्ती तळमळ 
कणोकणी ॥३॥

नाही लपविणे 
सोंग वठविणे 
जगी मिरविणे 
लाचारीत ॥४॥

जैसा वृक्ष  वाढे 
तैसे  ते दर्शन 
निगेच्या वाचून
नभी जाणे ॥५॥

तपी तपिन्नला 
भक्तीत निवाला 
साधनी रंगला 
आत्मतृप्त ॥६॥
 
कृपेचे प्रसंग 
किती जीवनात 
नांदे भगवंत 
मागेपुढे ॥७॥

परी नाही गर्व 
ताठा कसलाच 
श्रेय गुरुलाच 
सर्वकाही ॥८॥

वाचताना ग्रंथ 
किती धडे दिले 
डोळे उघडले 
वेळोवेळी ॥९॥

साधनेचे प्रेम 
कृपा नर्मदेची 
दुनिया तयाची
अद्भुतशी ॥१०॥

देवाचिया खुणा 
दाखवून मना
संशयाच्या तृणा
जाळीयले ॥११॥

भेटविली मज
नर्मदा माऊली 
चित्ती वसवली 
भक्ती तिची ॥१२॥

उघडले जग 
भ्रम विभ्रमाचे
आंतर सुखाचे 
मनोरम ॥१३॥

भेटलो तयांना 
कधी समूहात 
पाऊल स्पर्शात 
धन्य झालो ॥१४॥

भेटल्या वाचून 
भेटलो कितीदा 
हृदयात सदा 
साठविले ॥१५॥

तुटला तो तारा 
दीप विझू गेला
परी उजळला 
मार्ग आत॥१६॥

लाखातला एक 
चाहता विक्रांत 
तया आठवत
नमि आज ॥॥१७॥

भेटतील खास
नर्मदा तटास
वाटते मनास 
उगाचच  ॥१८॥

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********
 

शनिवार, ६ मार्च, २०२१

ओढ

ओढ
****

चैतन्यांची ओढ 
जया अंतरात 
भय न मनात 
तया कधी ॥१॥

दिसता किरण 
जीव घेई धाव 
जाणवी हवाव 
पूर्णतेची ॥२॥

मिळे त्याचा हात 
घेऊनी हातात 
चालू पाही वाट 
गूढ रम्य ॥३॥

पिउनी आकाश 
निळाईचा भास 
लागे शिखरास 
लंघू सदा ॥४॥

चालणे आनंद 
पाहणे आनंद 
सुखाचा हा कंद 
तेजोनिधि ॥५॥

घरादारा सवे
विक्रांत धावतो 
दिव्य अलिंगतो
दत्त तेज ॥६॥
*********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

दत्त प्रवाहात



दत्त  प्रवाहात
**********

दत्त माझे ध्यान
दत्त माझे ज्ञान 
जीवन विज्ञान 
दत्त माझे  ॥१॥

दत्त चालविता 
दत्त भरविता 
साधनेच्या वाटा
दाखविता ॥२॥

दत्त खेळविता 
दत्त  निजविता 
तुरिया जगता 
नांदविता॥ ३॥

दत्त कृपेवीण  
चालेना जीवन 
अवघे व्यापून 
दत्तात्रेय ॥४॥

विक्रांत वाहत 
दत्त प्रवाहात 
होऊनी निवांत 
कांक्षेविना  ॥५॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...