शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली
***************************

 खूप मित्र मिळवतो 
आपण आपल्या जीवनात
काही मित्र असतात 
सतत किंवा बराच काळ 
आपल्या अवतीभवती वावरत
आपण त्यांच्यात मिसळतो 
हसतो खेळतो बोलतो 
पण काही कारणाने 
अचानक ते मित्र दूर जातात 
पुढे कधी कधी महिने अन महिने 
वर्ष अन वर्ष त्यांची भेट होत नाही 
कधीकधी  उडत-उडत 
खबर येतात त्यांच्याबद्दल 
कुणी बोलतो 
त्याचे असं झालं तसं झालं रब
त्याला मुलगा झाला 
त्याला मुलगी झाली 
त्याच्या मुलाचे लग्न झाले 
आता तर नातू झाला आहे 
वगैरे वगैरे . . 

जरी तो आपल्या जीवनात  
या क्षणी नसला तरी 
तो कुठेतरी आहे आणि सुखात आहे 
आनंदात आहे 
एवढे आपल्याला पुरेसे असते

पण अचानक एखादी बातमी येते 
आणि आपल्याला कळते 
तो मित्र आपल्यात राहिला नाही 
तेव्हा ही खबर 
एखाद्या बाणासारखी हृदयात 
खोलवर रुतत जाते

आज सकाळी 
अशीच एक बातमी आली 
डॉक्टर राजू गायकवाड गेला 
अविश्वसनीय बातमी होती 
खरी वाटत नव्हती
मग खात्री करून घेतली 
मन विषादाने आणि दुःखाने भरून गेले 
सदैव हसतमुख असलेला 
आपल्या जगात 
आणि आपल्या सुखात 
रंगलेला हा मित्र 
त्याने विचारपुर्वक ठरवलेल्या 
जगण्याच्या चाकोरीतच जगत होता 
एक आखीव-रेखीव नेटके जीवन 
सुखी समाधानी जीवन 

त्याचे घर त्याची नोकरी 
त्याचा दवाखाना त्याचा संसार 
सुखाने राहत होता तो
दृष्ट लागू नये असे त्याचे जीवन  

आणि कोरोनाच्या 
या लाटेत या तडाख्यात 
ध्यानीमनी नसताना तो सापडला 
तसा तर तो योद्धाच होता 
व्हेंटिलेटरवर जाऊन जिंकून
परत आला होता पण 
ते घाव खूप खोलवर गेले होते 
अन त्या घावांमध्येच 
त्याचे श्वास हरवुन गेले .

मला खरंतर काहीच माहिती नव्हती 
हे सगळे घडले तरीही 
आणि कळली ती फक्त 
शेवटची बातमी 

राजुला एक सवय होती 
दुसऱ्याला अंदाज करायला लावायची 
अन अचानक रहस्य उद्घाटन करून 
त्याला चकित करायची
दुसऱ्याचे आश्चर्याचे भाव टिपण्यात 
त्याला आनंद वाटायचा 
मग तो हसायचा तो मिश्कीलपणे 
अगदी मनापासून 
कधी कधी खोडकरपणे 
प्रश्नही टाकायचा समोरच्याला 

पण यावेळी त्यांने  प्रश्न टाकला नाही 
अंदाज करायला लावले नाही 
काही काहीच कळले नाही 
आजारपण नाही 
दुखणे नाही
नंतरचे भोगणे नाही 
काहीच सांगितले नाही 
एक धक्का दिला 
अविश्वसनीय 
आणि तो निघून गेला 

राजूची स्वतःचे एक तत्त्वज्ञान होते 
लो प्रोफाईल मध्ये राहायचे 
कुणाच्या डोळ्यात न येण्याचे 
आपले जीवन आनंदाने जगायचे 
आपली कर्तबगारी हुशारी 
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व 
आपले चातुर्य ओळखी 
त्याने जणू ठेवल्या होत्या 
मनाच्या आतल्या कप्प्यात 

या महानगरात 
नोकरीच्या धांदलीत 
दोन लोहमार्गाच्या भोवती असलेल्या 
दोन वेगळ्या जगात 
आम्ही पडलो होतो आणि दुरावलो 
पण कधी आठवण झाली 
तर तो हसरा मिश्किल 
चेहरा समोर यायचा 
मदतीस सदैव तत्पर असलेला 
त्याचा स्वभाव आठवायचा 
हा मित्र जिथे असेल तिथे 
नक्की सुखात असणार 
मनातून पूर्णपणे ठाऊक असायचे 
खरतर
पण सुखाला ही दृष्ट लागते 
हे माहीत  होते 
कधी पाहिले नव्हते 
ते पाहिले.
************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

आकाशीचा बाप .

आकाशीचा बाप माझा 
प्रभू गुरुदत्त आहे 
नका देऊ बायबल 
माझ्यात मी मस्त आहे ॥

तुम्ही काय हरविले 
तुम्हाला ती जाण नाही 
बदलून देव घेणे 
हे शहाणपण नाही 

बायबली काय आहे 
अरे मी ते वाचले रे 
भक्तीच ती श्रेष्ठ आहे 
अंती हेच मांडलेले 

अद्वैताचे भान  परी 
त्याच मुळीसुद्धा नाही 
येशु मेरी विना त्यांचे 
पान ते हलत नाही 

स्वीकारले तुम्ही तया 
काही कसे करूनही 
तयामध्ये फारसा मी 
आता पडणार नाही 

ख्रिस्त कुठे प्रचाराचे 
वाचला न बोलतांना 
जाळे लावा भक्तासाठी 
असे किंवा सांगतांना ॥

आम्हासवे खेळ असा
येऊनिया खेळू नका  
फसवून धनाने त्या
धर्मभ्रष्ट करू नका ॥


गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेवी माय

 

ज्ञानदेवी माय

***********

तुज पांडुरंगा मा

गावे ते काय 

ज्ञानदेवी माय 

दिलीस तू  ॥


यया सुखा पुढे 

अवघे थोकडे 

याहून चोखडे 

जगी नाही ॥


माय सांभाळते  

माय दटावते 

माय जोजावते 

जीवनात ॥


जरी मी उनाड 

अभ्यासा वाचून  

खेळून मळून 

घरा येई ॥


 न्हावून माखून 

भक्तीच्या शब्दांत 

ज्ञानाचे अमृत 

पाजवते  ॥


विक्रांत नाठाळ 

खेळतो शब्दांत 

अर्थ तो पोटात 

उतरे ना ॥


परी भरविता 

थकत  ती नाही  

पुन्हा देतं राही 

मुखी घास  ॥


**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

दत्त बाजार

दत्त बाजार
********

दत्त्ता तुझ्या बाजारात 
किती हा झगझगाट  
कणकण उजळला 
सारे दंग प्रकाशात  ॥

प्रत्येकाला हवे आहे 
मिरवणे सजवणे  
भरले वा रिते खिसे 
वांच्छा मनी सारे घेणे  ॥ 

इथे मी तो कशाला रे 
आलो काय बघायला 
जे न हवे कधी मला l
कारे दावी डोळीयाला ॥

तुझे नाम तुझे ध्यान
हरवावे देहभान
याहूनी ते अधिक न 
मागितले दयाघन ॥

उठो हा बाजार आता 
देहातला मनातला  
विक्रांता या सुख देई 
चित्ती रहा वसलेला ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कळणे

कळणे
******

आता फक्त 
काही वर्ष 
कदाचित महिणे 
सांगता येत नाही पण 
फक्त दिवसही 
असतील उरले जगायला !

दूरवर असलेल्या गाव 
जसा जसा जवळ
येऊ लागतो 
आणि गाडीतील सामानाची 
आवराआवर सुरू होते 
तसं काहीसं झालं आहे  .

खरंतर पन्नाशीनंतर 
प्रत्येक वर्ष 
प्रत्येक दिवस 
हा बोनस असतो 
नाही का  ?

आता तर आपण 
मोकळं व्हायचं असतं 
सार्‍या  पाशातून 
मोहातून आसक्तीतून  
पण  हा गुंता 
काही केल्या सुटतच नाही  

बऱ्याचवेळा मी 
मलाच विचारतो 
अरे जे पाहिजे होते 
ते सारे मिळालं ना 
अजून काय पाहिजे  

तर मग ही अतृप्ती का ?
ही बोच का ?
ही अस्वस्थता का  ?

मग मीच मला सांगतो 
अरे जगलो ते खरं आहे 
पण का जगलो ?
हे कळले नाही  !

माझा प्रश्न 
जगण्याचा नाही 
माझी चिंता 
मरण्याची नाही 
माझा फक्त एकच  
प्रश्न आहे 
एकच इच्छा आहे 
एकच आकांक्षा आहे 
आणि ती म्हणजे 
हे कळण्याची !

बस 
हे कळणे माझ्यासाठी 
प्राधान्याची गोष्ट 
होऊन बसली आहे 
कदाचित या कळल्यामुळे 
माझ्या बाह्य जीवनात 
फारसा फरक पडणार नाही 
पण हे कळणेच  
माझ्या जीवनाचे ईप्सित आहे 
हे मात्र नक्कीच !

आणि हे कळणे 
जोपर्यंत जीवनात अवतरत नाही 
तोपर्यंत जीवन हे अपूर्णच राहिल.


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

मरण

झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी

मरण
*****
असे हवे रे
सुंदर मरण  
ज्यात ओघळून 
जाईल जीवन

असे असावे 
सहज मरण  
अट्टाहासावीन 
जगणे अजून

हळूच जावे 
कोणी फुंकून
ज्योत इवली 
सायासाविन 

होती ज्योत हे
कळल्या वाचून
घन तिमिरात  
जावी बुडून

काही तडफड 
झाल्या वाचून
वलय जावे
विलय होवून 

जसा उमटून
जातो हरवून
शब्द नभात
उरल्यावाचून

उरते स्मृति का
कुण्या फुलाची
खुण राहती
वा मृग सरीची 

हे आनंदाने
गाणे सजले
आनंदात च
व्हावे सरले 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेव माय


 ज्ञानदेव माय
**********
नाही डोक्यावर 
पडला तो हात 
ज्याने हा विक्रांत 
नाही होय  ॥१॥
बहुत ऐकली 
कोणाची ती कीर्ती 
स्वाधीन ती शक्ती 
जया असे ॥२॥
परी दगडास 
मिळाली ना स्फूर्ती 
मिटली ना वृत्ती 
देहातील ॥३॥
म्हणतात कोणी 
बीज रे पेरले 
होय उगवले 
एके दिनी ॥४॥
घडो ते घडणे
कुणाला कळणे 
जीव तहानेने 
व्याकूळला ॥५॥
बसली पंगत 
उपाशी विक्रांत 
तोंडावर हात 
ठेवलेला ॥६॥
ज्ञानदेव माय 
झडकरी येत 
घास या मुखात 
घालना ग॥७॥
हट्टी या बालका 
नको रागावूस 
सोडून देवूस 
गर्दीमध्ये ॥८॥
शोध ग मजला 
धरी ग हाताला 
घेऊन घराला 
जाय पुन्हा ॥९॥
********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...