मंगळवार, २१ जुलै, २०२०

लबाडी

लबाडी 
*****

जग म्हणते हे 
तुझाच मजला 
मी तो लाविला
तुझा टिळा ॥

जग हे म्हणते 
रे भला थोरला 
मी देव चोरला 
शब्द बळे ॥

करूनी तुजला 
बघ बदनाम   
करवून काम 
घेई माझे ॥

आता तू जर का 
मजला टाकले 
तुलाच लागले 
बोल होय ॥

 प्रभू अवधुता 
मी तव शरण 
जीवन-मरण 
तुझ्या हाती ॥

जरी लबाडी 
करीतो थोडी 
हसुनी वेडी 
स्वीकार रे॥ 

लबाड विक्रांता
हसतो ताडतो 
ह्रदयी धरीतो 
दत्त राज ॥
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २० जुलै, २०२०

संवेदना

संवेदना
****
जाहली  बोथट 
माझी संवेदना 
काय हे चालले 
मजला कळेना ॥

मरतात जन 
धडाड येऊन 
श्वास अडकून 
कळल्यावाचून ॥

रोजचे मरण 
रोज आक्रंदन 
रोजचे पी पी ई
प्लास्टिक कफन ॥

 रडतात मुले  
बायका रडती 
धास्तीत पडले
शेजारी पळती ॥ 

येतात सयंत्रे 
मागणी वाचून 
जागा न ठेवण्या 
राहती पडून ॥

नवीन सामग्री 
अर्जंट कंट्राट
परी मरणाचा 
घडे ना रे अंत ॥

जयाची पॉलिसी 
तया मिळे बेड 
रिपोर्ट साऱ्यांचा 
दिसतो कोविड ॥

कुठे चाललेय 
कोणाचे शोषण 
कोण कुठे घेई 
हात  ते धुऊन ॥

तरीही त्या रांगा 
लागती मटना
हुल्लड होतेच 
रोजच्या दुकाना ॥

चालतो व्यापार 
चोरून छुपून
पोट हातावरी 
जाती ते निघून ॥

मरणाच्या वारा 
सुसाट सुटला 
गाठेन आम्हाला 
आज ना उद्याला ॥

कोण रे मरेन 
कोण तो जगेन 
टक्क्यांची गणित 
कुणा न सुटेन ॥

विक्रांत विनवी 
दत्ता अवधूता 
आवरा  सावरा 
आता या जगता.॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १९ जुलै, २०२०

भित्री श्रद्धा

 श्रद्धा
***********

बाजार भितीचा
हिशोब दानाचा 
काल त्या सर्पाचा
त्रिंबकीच्या॥

जुनाट शब्दांचे 
विना कि श्रमांचे
प्रकार तयांचे
कमावयाचे  ॥

होती जाहिरती
दलाल असती
मुळ परि भिती
अनिष्टाची॥

तयारी यज्ञाची
मांडणी पुजेची  
त्याच सामानाची 
सदोदित ॥

झुकती दुनिया
देवा तुझी माया
मज न ये आया
मजेशीर ॥

दत्त काढी मन 
माझे सा-यातून 
अवघे दावून
निरर्थक  ॥

 
 *****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

गोरक्षाची काठी

गोरक्षाची काठी
***************
गोरक्षाची काठी 
पडली डोक्यात 
टेंगूळ माथ्यात 
येऊनिया ॥

गोरक्षाची काठी 
पडे पेकाटात 
बसे बोंबलत 
आणिक मी ॥

बोंबललो असा
कानफाटा होत
जाऊन उलट
जीभ आत ॥

डोळे फिरवता 
श्वास अडकता 
पाठीत धपाटा 
पडला तो ॥

गोरक्ष धपाटा 
सुखाची उकळी 
पोटाच्या उखळी 
उतो येते ॥

उकळता नाद
दुमदुमे आत
आग नि पोटात
पेटतसे॥

असा हा  प्रवास 
पाहूनिया त्रास 
माऊलीचा श्वास 
ओलावला ॥

माऊली प्रेमाने 
भरविते घास 
सरतो सायास
भोगलेला ॥

गोरक्षाची काठी 
धरूनिया हाती 
उभारतो गुढी 
मग मीच ॥

विक्रांता गोरक्ष 
धावला पावला 
मस्तकी ठेविला 
कृपा कर ॥
****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

विकली श्रद्धा

विकली श्रद्धा 
***********

विकल्या श्रद्धेला 
दारिद्र्य आधार 
पेरती  अपार
धनराशी ॥

वांझोट्या शब्दांचे 
आतल्या गाठीचे 
प्रकार तयांचे
अर्थ शून्य ॥

वाजती गाजती
जगी मिरवती
त्यास त्याच्या पथी
जाऊ द्यावे ॥

अहा ते नाटकी
दाविति फुकाचे 
घेती कि चुकांचे
पाप माथी

मग दानशूर 
होवून निश्चिंत
नवीन शोधत 
जाती सावज  ॥

ऐसे दत्तात्रेया
पाहतो डोळ्यांनी 
धुर्तांची वाहणी
विपरित ॥

दत्ता  काढी तण
 हे रे देशातून 
बघ उपटून
समुळ ते ॥

विक्रांत कर्माचा 
हिंदवी धर्माचा 
उघड्या डोळ्यांचा 
सांगे बात  ॥ 
 *****
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १८ जुलै, २०२०

विटाळ

 पापाचा विटाळ 
************

पापाचा विटाळ 
फक्त एक मान 
सोवळे ते जाण
उपकार  ॥

सोवळे ओवळे
विटाळ पाळणे
काय ते जगणे
शहाणे रे ॥ 

देहाधा-या कैचा 
स्पर्शाचा विटाळ 
मानवा  किटाळ 
असे हे रे॥

अहो भाविकांनो
होऊन डोळस 
मिरवा कळस 
धर्माचा या ॥

काही  करा छान
बांधाबांध नवी 
तोडफोड हवी
तर ती ही ॥

तरीच उज्वल
धर्म हा जगेल 
आणि मिरवेल
विश्वामध्ये ॥

वृक्ष  ऐसा थोर
अमृत फळाचा
होवो जगताचा  
आश्वासक  ॥

विक्रांत संताच्या 
पायातली धूळ 
तयांचे सकळ 
बोल बोले.॥
*
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, १६ जुलै, २०२०

शुभेच्छा 
****:::
झळाळत्या किरणांचे 
यश मिळो सदा तुला 
स्वप्न तुझे प्रकाशाचे 
नित्य येवो आकाराला 

यश तुझे सुवर्णाचे 
हो दुर्मिळ कौतुकाचे 
यश तुझे पोलादाचे 
कणखर टिकायाचे 

यशा नको गालबोट 
धन मान उगा खोट 
मूल्य मापा वाचून जे 
भिडो आकाशाला थेट 

हीच मनिषा सर्वांची 
आशा आणि आशिषांची 
उडा उडा रे गगणी 
सीमा नको क्षितिजाची.
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...