सोमवार, १६ मार्च, २०२०

कवितेत दत्त



कवितेतील दत्त
**
जर कधी तुम्हाला
माझ्या कवितेत
दत्त दिसत नसला
तरीही दत्त
तिथेच वसत असतो
जरी मी वाचेने
म्हणत नसलो
तरीही त्यालाच
स्मरत असतो

माझ्या कवितेतील दत्त
नसतो ही त्रिमूर्ती
दंड कमंडलू धारी
कधी कधी तर
त्याला नसतो आकार
पण तो आहे हे
पाहणाऱ्याला करते

दोन ओळींमधील अंतरात
अगदी सहजच व्यक्त होतो
माझ्या कवितेतील दत्ताला
तुम्ही दत्त म्हणावे
हा हट्टही नसतो
खरंतर सहस्त्रनामाचे
प्रत्येक बिरुद 
तिथे कमी पडत असते
रूढ अर्थाने म्हणाल तर
 ते भक्त गीतही नसते
पण भक्तीशिवाय त्यात
बाकी काहीच नसते

म्हणूनच माझ्या कवितेत
दत्त दिसला नाही तर
ती कविता माझी नाही
असे तुम्ही खुशाल समजा

रविवार, १५ मार्च, २०२०

अवस्था


अवस्था
**
निळ्या जलावर नील नभाचे 
चित्र आता उमटत नाही 
हिरव्या कच्च झाडाना त्या 
स्वप्न पाखरांचे पडत नाही 

नसलेल्या त्या प्रियतमाची 
मन वाटही पाहत नाही
आता जगणे वाऱ्यावरती 
कुणासाठीच अडत नाही 

आधाराचे खांबही नव्हते 
छपराविना मी रडत नाही 
जळून गेली स्वप्न अवघी 
देही दुःख पण सलत नाही  

सुख कशाचे दुःख कुणाला
नित्य काहीच दिसत नाही 
विक्रांत नाणे उंच उडविले
काटा छापा पडत नाही 

ही न समाधी साम्यावस्था 
माझे मलाच कळत नाही
आकाशाची स्वप्न आकारा
काही केल्या पडत नाही



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १४ मार्च, २०२०

रंग



रंग
***
तुझा रंग  तू कृपाळा
दिलास जरी मजला
माझा रंग पण मला 
अजुनही ना सुटला

काय माझ्या रंगामध्ये
तुझे रंग मिसळेना
वेगळाले गुणधर्म
एकजीव का होईना

माझा रंग तेलाचा का
तुझा रंग पाण्याचा का 
कुणालाही कशाचा रे
मेळ इथे बसेना का

सांग आता या चोथ्याचे
काय मी  ते करावे रे ?
कसे चित्र रंगवावे
कुठे तया ठेवावे रे ?

तुझा रंग तुला पुन्हा
घेता तो  येणार नाही 
माझा रंग  मुळी आता
माझा उरणार नाही 

मग अश्या मिश्रणाला
भक्ती  कशी मी म्हणावे 
थांबलेल्या जीवनाचे
चित्र कसे पुरे व्हावे ?
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

क्षण फावला



क्षण फावला
 *******

क्षण फावला
म्हणती ज्याला
लाव त्याला
शून्याला

वासनेच्या या
चिंध्या मधला
देह सजला
पाहायला

काय चाललेय
अन कशाला
हवे कुणाला
कळायला

जगण्याच्या
गुंगी मधला
जीव निराळा
उठायला

किती घुसती
शब्द शलाका
आणिक गलका
वेदांताचा

गप्प राहा रे
जसा पडला
श्वान एकाला
उन्हातला

स्वप्न आळले
शून्य जाहले
जग नुरले
मग त्याला



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १२ मार्च, २०२०

कृपेची कहाणी


******
श्री स्वामी समर्थ
आले माझ्या मनी
कृपेची कहाणी
लिहायला

दिला एक धक्का
पुन्हा सावरले
आणिक हसले
मोठ्यांनी ते

करून कौतुक
घेतले जवळ
निमित्त केवळ
भयाची ती

मन धावणारे '
आले भानावर
जडे पायावर
मग तया

केवळ माउली
कृपेची साउली
भेटली भेटली
विक्रांत या


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

बुधवार, ११ मार्च, २०२०

आता तरी घडो






आता तरी घडो

**********





तीच ती अक्षरे

जीवनाची पाने

अवघे लिहिणे

ठरलेले



कशाला लिहिली

तू ही व्यर्थ कथा 

जया नाही दत्ता

नाव तुझे



बस झाले देवा

पुरे कर आता 

मिरविणे घटा

अस्तित्वाच्या 
 

आतातरी घडो

तुझे येणे काही

घेवुनिया जाई

मज सवे
 

विक्रांता नावडे

जीवनी वाहणे

निरर्थ जगणे 
तुज विना




************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १० मार्च, २०२०

दत्ता येरे खेळायला



 दत्ता येरे खेळायला


 **
दत्ता येरे खेळायला 
माझ्या सवे पळायला 

तुज  मारीन मी हाका 
तुझा लपण्याचा हेका 

सदा घेईन मी डाव
तुझी पुरविणा माव 

सदा लंगडी घालीन
तुझा रिंगणी फिरेन

नको येऊन तू हाताला 
परि रहा रे दृष्टीला 

मार पाठीवर गुद्दे 
कर प्रेमी गुदगुदे 

तुझ्या चिंतनात राहो
तुला सदोदित पाहो

असा मांडे रे तू खेळ 
मागे विक्रांत केवळ


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...