गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

शोधताना दत्ता





पडली ठिणगी
होऊ दे रे जाळ
अवघीच राळ 
अज्ञानाची ॥ १॥

कोण तू कुठला
आला रे जन्माला
भ्रम हा सगळा
सरू दे रे ॥ २॥

जन्माच्या आधीच्या
शोधतांना दत्ता
करू नको खंता
अस्तित्वाची ॥ ३॥

इंधन लाकूड
लाकडी इंधन
पेटण्याचा क्षण
दत्ता हाती ॥ ४॥.

विक्रांत जळाला
क्षणात जन्मला
जगणे काळाला
वाहीयले ॥ ५॥
**
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

कुठे दत्ता


  


कुठे दत्ता 

*******

या तुझ्या जगात 
दुःखाच्या वनात 
वेदनेची पेटतात 
रोज वनवे 


वाळूच्या कणाचे
गवताच्या पात्याचे 
अस्तित्व हे माझे 
असे अर्थहीन 


काय मी मागितला 
येऊन तुजला 
जन्म हा असला 
सांगा जरा


मृत्यूच्या थैमानी
मज मोकलूनी
गेलास सोडूनी
कुठे दत्ता 


होरपळे जीवन 
यातना कठीण 
कोण्या संकल्पांन
येते घडून 


विक्रांत संकटी 
भय बहु पोटी 
अहो जगजेठी 
कृपा करा


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com




मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

श्री स्वामी स्वरुपानंद



श्री स्वामी स्वरुपानंद
 **
अज्ञान तिमिरी
हरवला अहं
विसरूनी सोहं
स्वरूपाला

पावसी प्रगटे
ज्ञानाचा प्रकाश
अंधाराचा नाश
करावया

मुर्ध्निआकाशात
करतसे वास
ज्ञानियांचा अंश
नाथ योगी

स्वरूपा जाणून
वाटतो जगाला
हंसारुढ झाला
स्वामी माझा

स्वरुप आनंद
आस या जगास 
विक्रांत मनास
खुणावते

तयाचा तो दिप 
तेवतो सतत 
घालतोय साद 
शोधकर्त्या


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

वृत्तीवर वाहे




वृत्तीवर वाहे
 **

जेधवा मजला 
दिसते मी आहे
वृत्तीवर वाहे
निरंतर

आहे पणाची या
कथा काळजाची
कुठल्या गावाची
विसरतो

मी च्या मुळातून 
त्रिभुवनी जातो
नच कळू येतो
वाटलेला

बधीरून जाता
सुक्ष्म संवेदना
कळून फुटेना
होते काही

भेदक डोळ्यांनी
पाहती ते मला
गिळून वृतीला 
थोपावती 

जन्माचा सोहळा
कळतो जन्माला
डोळे पाहण्याला
फुटतात



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, ५ जानेवारी, २०२०

ओळखता




*-*
जन्माला कारण
अवघे मीपण
आले उमलून
जाणिवेत

जगणे मरणे
व्यथेत धावणे
जगत हे होणे
नसूनही

जगण्याची खंत
कोंदाटली आत
जाणिवेची भिंत
उभारून

बांधली हि ज्याने
पाडली ती त्याने
नसल्या हाताने
निरंतर

विक्रांती पाहिला
दत्त कवडसा
फुटला आरसा
सांभाळला

शब्दी आढळला
भावात फसला
मीपणा अडला
ओळखता
***



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

मी दत्त गाणे गातो


मी दत्त गाणे गातो
**************
मी दत्त गाणे गातो
मज दत्त शब्द देतो
मी काहीबाही लिहतो
तो अर्थ त्यात भरतो 
.
मी तया पदी नमतो
तो मजला चालवतो
मी रान गाण रचतो
तो वात झुळूक होतो 
,
ते रूप त्याचे पाहून
मी माझा न राहतो
देह भान हरवून
सुख सागरात न्हातो 
,
कृपा प्रसाद वर्षावी
हा जन्म कृतार्थ होतो
धन्य झालो स्वामी दत्ता
सुखे विक्रांत म्हणतो
,
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

उधळणे





उधळणे
*****

उधळणे शब्द हे माझ्या स्वभावात नाही
येता समोर पण तू सखी भान राहत नाही

बोलता हलके हसून तू  हे ध्यान हरवत जाई
फुटूनी डोळे पिसांना मनमोर नाचत जाई

होऊन पाखरू मन भिरभिरने थांबत नाही
वाचून कळल्या काही जमीन आठवत नाही

तू शुभ्र चांदण्याची ती प्रभा मिरवत जाई
होतो चंद्रमणी मी की नाव ही  राहत नाही

हे कोडे गूढ जन्माचे मजला कळत नाही
भुरभुरणे  मेघाचे या आकाश सावरत नाही


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...