शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना






डॉ बाबासाहेब  आंबेडकर यांना
******************************

होय बाबा जाणतो मी
सार्‍या तुमच्या वेदना
ज्यास्तव दिले आयुष्य
तो भारत असे उणा

महामानव म्हणती
सारी दुनिया तुम्हाला
बांधूनी भव्य  पुतळे
नि विसरति  तुम्हाला

स्वातंत्र आणि  समता 
या दोनच मुल्यांसाठी
वेचले जीवन  तुम्ही
लढलात न्यायासाठी

मान्य मला इथे तरी
व्याधी जागी अजुनही
दिसे आग धुमसती
लागली दोन्हीकडेही

द्वेषाची भुते जणू की
मरत नाही कधीही 
इकडून तिकडे ती
वाहतात जणू काही

ओठावरी दिसे जरी   
प्रेम मैत्री खोटी काही
दोघांच्याही पोटी भिती
आहे सुप्त अजुनही

तुम्हा प्रति परी वदे
मी जीविचे गुज माझे
तुमच्याच  लढ्यातून
कि जे झाले आहे माझे

माणूसकी  जात माझी
धर्म माझा माणूसकी
या देशाशी या मातीशी
फक्त माझी बांधीलकी 


प्रिय मजलागी आहे
प्र्त्येक माणुस इथला  
उपासना असो काही
तो भारत वंशी इथला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

अभय कर दत्ता


अभय कर
********

कासया ते भय
दाविसी दयाळा
व्याघ्र सिंह व्याळा
दावूनिया॥
पाहता समोर
ऐसे रूप देवा
पुन्हा देहभावा
मन जाते ॥
दिसते आसक्ती
देही अडकली
मरणास भ्याली
चित्तवृत्ती ॥
मानतो मी हार
तुझ्या वाटेवर
परि नेई वर
तूं ची आता ॥
सरली अहंता
होता भयभीत
तुच सदोदित
रक्षी मज ॥
विक्रांत प्रांजळ
भये थरथर
दत्ता कृपा कर
दीनावर ॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

दत्त वेड ,



दत्त वेड ,
**
उगा असा वेडा होतो
दत्तासाठी गाणे गातो


होती जरी भास काही
मनोखेळ नसतो तो


सांभाळतो मजला तो
विश्व माझे होवुन तो


अवधुती रंगा ल्यातो
मजला रंगवतो तो


चाले जरी गुमान मी
सवे जातो घेवुन तो

सर्व माझ्या भावनांना
शब्दात मिरवतो तो
 

दत्त पदी व्हावा अंत
स्वप्न हे  मज देतो तो


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

असणे सकळ





असणे सकळ
*************

माझा रंग मला
तुझा रंग तुला
आहे का वेगळा
दत्तात्रेया

माझे हरवले
तुज सापडले
तू ना वेचियले
बरे तर

नको वाटाघाटी
नको आटाआटी
पडू दे सोंगटी
खेळाविना

मनाचा पिंपळ 
आकांक्षा हिंदोळ
व्यर्थ सळसळ
करी ना का !

तू तर केवळ
असणे सकळ
कुणा कैसे बळ
फुटायाचे

विक्रांत लुटला
शुन्यात बुडाला
मेला की वाचला
कुणा ठाव

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...