गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

हिंपुटी


हिंपुटी
*****
माझे प्रारब्धाचे
डोईजड ओझे
उतरावे साचे
दत्तात्रेया

अंगी नाही बळ
टाकण्या पाऊले
ओझे जखडले
जीवनास

एक एक दिस
विझवी प्राणास
देहाचा आभास
दृढावून

होई तगमग
श्वासात दाटून
डोळे ओघळून
सदोदित

देई गा बा मज
कृपेचे ते दान
दत्त दयाघन
मावुलीये

विक्रांत उपाशी
नये तव दृष्टी
होवून हिंपुटी
साद घाली


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

दत्त प्रकाश



दत्तप्रकाश
 *********
दत्तप्रकाश होऊनी
येई माझ्या अंगणात
दत्त आकाश होऊनी
भरे सुख जीवनात

दत्त स्फुरलेले गाणे
होई माझ्या हृदयात
दत्त आनंदाचे अश्रू
येती डोळा ओघळत

दत्त भजता भजता
जातो सुखाने भरून
मज नकोसे वाटते
काही श्रीदत्ता वाचून

ओढ एकची मनात
डोळा घडावे दर्शन
जरी खाणा खुणा दावी
दत्त जीवा सुखावून

देई सायुज्यता आता
वेड्या विक्रांता श्रीदत्ता
ठेवी ठेवी गुंडाळून
सारी सरलेली गाथा


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

माझिया दातारा



माझिया दातारा
****
माझिया दातारा
काय मी मागावे
काय ते बोलावे
धजुनिया

येता तो समोर
वाचा होते बंद
मन होते धुंद
मोहुनिया

मनी ठरविले
मनी मावळते
मन न राहते
काही केल्या

हरवे तयात
वृत्तीची लहर
विरते अंतर
भारावले

उरते एकली
विश्व हरपली
आनंद बाहुली
होऊनिया

विक्रांत दत्ताची
होऊन सावली
जगी मिरवली
कौतुकाने


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

माऊलीची आस





माऊलीची आस
 ************
मागतो दत्ताला 
दत्ताचे मागणे 
काय असे उणे 
सांगा तुम्ही 

भक्त अंतरंगी 
तुम्ही संतजन 
कारणा कारण 
जाणकार 

अमृत सागरी 
अमृत प्राशने  
हे चि तो करणे 
असे ना हो 

तया कृपेसाठी 
एका थेंबासाठी 
व्हावी आटाआटी 
जीवनाची 

सृष्टीचे देखावे 
देखवे न डोळा 
समृद्धीचा मळा
रुचेचि ना

बालकांच्या दृष्टी 
माऊलीची आस
खेळणी भकास
वाटे तेव्हा 

तैसा हा विक्रांत 
पाहतोय वाट 
घेऊन डोळ्यात 
तृष्णा तुझी

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

***

विचित्र तह


विचित्र तह
******:**
जया वैर केले
तेची दोस्त झाले
अध्यात्म तयाला
पुरते कळाले ॥
कसे वचन ते
त्यांचे बदलले
बहू प्रेम खुर्ची
पाहताच झाले ॥
बुडाला विचार
बुडाला आचार
सत्तेच्या सुखात
मन मुग्धावले ॥
देई बा परत
मज माझी पत
येऊ नको पुन्हा
माझिया दारात ॥
कशी गर्जनाही
बंदीवान झाली
बाप ह्रदयात
मान घाले खाली ॥
नच कळे आम्हां
काही कुटनीती
आम्ही सैनिक हो
प्रीत झेंड्या प्रती ॥
बरा नव्हे तह
असला विचित्र
वाघ शेळीचे का
होते कधी मैत्र ॥
तुम्हा प्रती प्रीती
म्हणून या ओठी
शब्द काही येती
उदास बहू ती ॥
साहेब तुमची
बहू याद येती
तुम्ही शिकवली
जागे बंड वृत्ती ॥
म्हणूनी मागतो
स्मरुनिया दान
नको लाचारी ती
बळ द्या हो हाती ॥

****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

अक्षरांचा धनी





अक्षरांचा धनी
 **********
अक्षरांचा धनी
करूनिया मला
असशी लपला
माये आड

तरी दत्ता सारे
टाक हे घेऊन
पाषाण करून
ठेवी मज

मानतो हे शब्द
तुझीच मी कृपा
अडविती रुपा
काय पण ?

सुटू देत दत्ता
मैलाच्या या खुणा
मुक्काम ठिकाणा
दावी मज

जाहला सोहळा
नाद वर्णातला
जीव न निवाला
परी माझा

मौनाच्या रांजणी
मिटो खळखळ
शांतीचा नितळ
डोह करी

विक्रांत शून्याच्या
बसला पायरी
प्रवेश अंतरी
देई दत्ता



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

***

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

मिळताच घर तुला


मिळताच घर तुला
***************

मिळताच घर तुला
जीव माझा सुखावला
तसा तर आहेस तू
अनिकेत मिरवला ॥
मिळताच घर तुला
दूर कोणी दुखावला
पण तोही आपुलाच
नकळत दुरावला ॥
नाही कसे म्हणून प्रिय
खंत तर होती मनी
न्याय झाला वास्तवाचा
दुःखी नच व्हावे कुणी ॥
जिंकण्यात गर्व नाही
हरण्यात क्षोभ किंवा
मैत्र माणसांचे श्रेष्ठ
दुजाभाव दूर व्हावा ॥
त्यांचे माझे काय इथे
जन्म याच मातीतला
कुणी काय कधी केले
भूतकाळ जुना झाला ॥
अनंतात वाटा अशा
समांतर जाऊ देत
निराकार आकार हे
सारे भेद मिटू देत ॥


****
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग *** ( आसावरीताई काकडे ) रंग रेषा आणि शब्द  यात जीवा गुंतवूनी  एक निर्मळ आयुष्य  जगली ती मनस्विनी  खिडकीतील इवली तीच फुले आणि...