रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

मच्छिंद्र नाथ



मच्छिंद्र नाथ
**********
काठावरती तडफडती
मत्स्य पाहुन द्रवला जती

क्षणभंगुर हे जीवन किती
आले त्यांच्या क्षणात चित्ती

सुवर्ण क्षण तो मग वेचूनी
चालू लागला साधना पथी

घोर कष्टाला तपात बहुती
होय अर्ध्वयु  मग नाथपंथी

आदिनाथबीज हृदयी पडले
अवधुताने त्या प्रेमे सिंचले

वटवृक्ष ये आकार बीजाला
अगणित जीवा ठाव मिळाला

जातीभेद ते सारे मिटले
 वर्णपंथ अन एक जाहले

मानवतेच्या पायावरती
देवुळ एक उभे राहीले
**
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दत्ताची ती गोडी



दत्ताची ती गोडी
************
दत्ताची ती गोडी
नसे साखरेला
नसेच मधाला
कण भरी॥

दत्ताचा सुगंध
नसे गुलाबाला
नयेच चाफ्याला
काही केल्या॥

 दत्ताचा प्रकाश
 लाजवी चंद्राला
 शिणवी सूर्याला
 क्षणमात्रे ॥

दत्ताच्या कीर्तनी
विमुक्त रागिनी
गंधर्व गायनी
लाजतात ॥

दत्ताच्या प्रसादी
अमृत थोकडे
रस होती वेडे
सारे जणू ॥

सुखाचा सोहळा
दत्त माझा झाला
इंद्रियांचा गेला
बडीवार ॥

विक्रांत सुखाने
पुष्ट हा जाहला
दत्तात निमाला
आवडीने ॥

(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

धाड बा मुळाला




धाड बा मुळाला
***************

रोज किती पत्र
धाडावी तुजला
त्याच त्या शब्दाला
गिरवावे
रोज किती हाका
माराव्या तुजला
शिणल्या कंठाला
सुकवावे
काय तो तुजला
ये ना कंटाळा
विषम स्वराला
ऐकताना
किंवा तुजला का
लागलीसे गोडी
अक्षर हि वेडी  
आवडती   
जीव परि माझा
जाई दत्तात्रेया
धाव रे कृपया
जीवलगा
विक्रांत थकला
वाटेला बसला
धाड बा मुळाला
लवकरी

००००००
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

म्हातारा

म्हातारा
******

भयान राती
उजाड पथी
टाळून वस्ती
जाई म्हातारा

कंदील हाती
लाकूड काठी
देहावर ती
घट्ट कांबळी

खोल डोळे
गुहे मधले
ओठावरले
जंगल मोठे

कुठे चालला
या वेळेला
भय सांडला
नच कळे

झपझप झाले
कंदील हले
खडखड बोले
पायी वाहाण

वाट तयाची
जणू रोजची
युगायुगांची
असावी ती

डोळे चिमुकले
खिडकी मधले
होते जुळले
त्यास कधी

गूढ आकृती
कंदील स्मृती
अजून मना ती
रुंजी घाले

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

रोकडी भक्ती

रोकडी भक्ती
***********

एक रोकडी भक्ती
देई दत्ता मजप्रती
सरू दे रे आसक्ती
संसाराची या ॥
मातीच्या या देहाची
उद्या माती व्हायची
काय माझ्या कामाची
तुझ्याविना रे ॥
पुरे हे वरवरचे
नाते बंध फुकाचे
कुठवर सांभाळायचे
दामाकामातले ॥
चार टके कुणी जोडले
त्यांचे डोके फिरले
नकोच वेड असले
लावू मजला ॥
सुटू दे रे पसारा
अर्थहीन खेळ सारा
जन्मो जन्मी चालला
चाळा असला ॥
मजवरती दत्ता
असो तुझी सत्ता
सांभाळ विक्रांता
दीनासी या ॥
**
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

तूच माझा ठाव

पाहू नको दत्ता
माझी रे परीक्षा
मोडोनी आकांक्षा
ठेवी मज
साऱ्या सुरू गेल्या
सजल्या कामना
वैराग्य भूषणा
जीव जडे
तरी का रे अशी
सभोती दाटली
दुनिया सुटली
उगाचीच
तूच माझा ठाव
हेच मज ठाव
लोभाची हवाव
सारी गेली
दिली दृढ मिठी
तुझिया पावुली
विक्रांता सरली
उठा ठेव

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

नाते

नाते
*****
 खरच नाते काय असते
यावर  मतामतांचे वादळ उठते
प्रतेक मत वेगळे असते
वाट्यास आलेल्या जगण्याचे
त्यावर आरोपण असते
पण अगदी नीटपणे पाहिले
की असे वाटते
कदाचित नाते म्हणजे
गरजांनी बांधलेले जगणे असते
देहाची गरज मनाची गरज
पोटाची गरज घराची गरज
या गरजांची कितीही वजाबाकी केली
तरीहि बाकी उरते ती गरज असते.

तर मग या नात्याचे काय ?
भावनांच्या ओलाव्याचे काय ?
काळजीचे काय ?
विश्वासाचे काय ?
मनातील या हुरहुरींचे काय ?
भयाचे काय ?
पाहता पाहता दिसू लागते
अरे हे सारे मनाच्या रंगभूमीवर
चाललेले नाटक आहे
ज्यात आपण  आहोत नट
आणि आपणच आहोत दिग्दर्शक
अन् प्रेक्षकांची भूमिकाही
आपणच करत अाहोत

हे नाटक असते
अपेक्षांच्या रंगानी रंगवलेले
स्वप्नांच्या पडद्यांनी विणलेले
सुखाच्या दिव्यांनी झगमगणारे
अन् विझताच हे दिवे
एकटेपणाच्या अंधारात भयग्रस्त झालेले
अन् होतात आपली एक्झिस्ट
आपल्या सवेत संपणारे

नात्यांच्या या नाटकाचे
हे गमक कळले की
त्यांची अगतिकता उलगडत जाते
अन् गरजही ध्यानात येते
खरं तर या जगात
कुणीच कुणाचे नसते
हे आपल्यालाही माहीत असते
तरीही आपल्याला नात्यात जगणे आवडते
असला नसला ओलावा टिकवावा असे वाटते
गरजा व निकडीची पलीकडची
एक गरज यात वेटाळून नसते
आपण कोणीतरी आहोत
आपण कुणाचे तरी आहोत
या जाणिवेच्या बुडबुड्यात जगणे
बुडबुडा फुटेपर्यंत तरी
आपल्याला हवे असते
अर्थात हा बुडबुडा
स्वत:च फोडायचे
स्वातंत्र्यही तुम्हाला असते
अन् त्या सोबत जगायचेही
स्वातंत्र्य तुम्हाला असते
पण बुडबुड्याचे फुटणे
कधीतरी अपरिहार्यच असते.
कारण या फुटणेच
तुम्हाला घेवून जाते
 तुमच्या स्वरूपाकडे
ते तुम्हाला कळणे
 हेच जीवनाला.
अभिप्रेत असते
०००
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कृपा

कृपा  **** कृपा तुझी कोवळीसी हलकेच बरसली  चांदण्याची वेल जणू आकाशात पसरली  कृपा तुझी गवसली हृदयात विसावली  डोळीच्या कडेवर रेख झा...