शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

महापुर



























महापुर
******
येतो महापुर
माझिया शब्दांना
तुज स्मरतांना
गुरुदत्ता॥
वाकड्या उसात
अमृताचा झरा
शब्द तैसा खरा
मनातला ॥
मोकळी मराठी
माळरानातली
तव पायतळी
फुले होती ॥
विणतो अक्षर
अभंग ओवीत
मनातील प्रित
रेखाटीत ॥
किती खरी खोटी
तुज एक ठाव
सर्वज्ञांचा राव
तुच प्रभू ॥
विक्रांत संतांच्या
चाले वाटेवरी
शब्दांची चाकोरी
धरोनिया॥
**

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

प्रारब्ध





प्रारब्ध
******
भोगतो प्रारब्ध
दयाळा वाट्याचे
सुखाचे दुःखाचे
क्षण सारे
॥१॥

कधी देशी मान
कधी अपमान
दिसू दे समान
दत्तात्रया
॥१॥

घेऊन येतात
काळाची पाऊले
देणे ठरलेले
आपोआप
॥2॥

देऊन जातात
आणि व्याज सारे
कर्मी बांधलेले
फळ साथ
॥3॥

तया पथाने ते
येऊ दे जाऊ दे
विक्रांत राहू दे
तवपदी
॥4॥
००००००

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

शोधाच्या रिंगणी



शोधाच्या रिंगणी 
फिरे गरगर 
गळ्यातला दोर 
सुटे चि ना 

मारतो हिसके 
कधी आवेशाने 
अधिक तयाने 
फास बसे

बसले जे उंच 
तुजला जाणून 
तयाला पाहून 
हेवा वाटे

आहा पुण्यराशी 
भाग्याचे पाईक 
देवा सोयरीक 
केली ज्यांनी

अन् आम्ही कैसे 
असे भाग्यहीन 
सुटेना रिंगण 
दावण ही

विक्रांत घाण्याला 
रोज मरे मरे 
दत्ता तुज स्मरे 
सोडव रे 

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

दत्ताई


दत्ताई
******
कृपेची मागणी
माय तुझ्या दारी
दाटल्या अंधारी
दीप होय ॥
प्रेमाचे गा-हाणे
माय तुझ्या गळा
ओत ग जिव्हाळा
सर्व काळी॥
मूढ मी बालक
धावे सैरावैरा
देई ग आसरा
पदराचा ॥
भक्तीचा भुकेने
झालो ग  व्याकूळ
मिटेना काहूर
अंतरीचे ॥
असुनी जगाची
तू ग स्वामींनी
भिकारी होऊनी
जगतो मी ॥
इतुका असे मी
काय भाग्यहीन
अनाथ म्हणून
मिरवितो ॥
म्हणतो विक्रांत
ये गं ये दत्ताई
उचलून घेई
कडेवरी ॥

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

तुझी आठवण




तुझी आठवण
किती विलक्षण
मजला सोडून
जात नाही ॥
मनी भरलेले
झुकलेले डोळे
स्मरणी भिजले
येत राही ॥
तुझे बोलावणे
तुझे थांबवणे
तुझे ओढावणे
मुग्ध किती ॥
धुक्यात दडले
दवात सजले
अर्थ नसले
वेडे गाणे ॥
तरीही म्हटले
देही आसावले
अतृप्ती सजले
पुन्हा पुन्हा ॥
जरी आता नाही
घेणे गाठी भेटी
मन तळवटी
फुलांची तू ॥
००००००

© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

दत्त दिसो मज


दत्त दिसो मज
भरला जगात
अवघ्या रूपात
नांदणारा ॥
दत्त स्मरणात
जाऊ माझा दिस
विषयाचे विष
स्पर्शू नये ॥
नांदावा सकल
संतांचे संगती
उलटून दिठी
पाहण्याची ॥
वाहती प्रवाह
तमाचे भ्रमाचे
व्हावे नच त्यांचे
कधी काळी ॥
आणखी विक्रांता
नलगेच काही
सदैव तू राही
हृदयात ॥


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

. . .ना चि





. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि

आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि

काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि

कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि

इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि

निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि

आजचा उद्याला
देऊन हवाला 
प्रश्न जडावला
मिटेनाचि

०००००००


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...