गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

धुनी




धुनी
***

दत्ता माझ्या जीवनाची
व्हावी एक धन्य धुनी
चटचट जळतांना
दत्त शब्द यावे मनी

काम क्रोध लोभ सारे 
जळून या खाक व्हावे 
आत्मप्रकाशात दिठी
विश्व सारे तुच व्हावे

जळतांना जनासाठी 
सुख जळो लाख वाती 
सभोवर उबेसाठी 
भक्तांची रे व्हावी दाटी

चिमट्याचे अशीष ते
सदोदित पडो डोई 
विझणाऱ्या जाणिवेस 
जाग एक टक देई

विश्वाचे या भान मग
माझा क्षणक्षणा होवो  
विक्रांत हे नाव गाव 
दत्ता हरवून जावो
*
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


स्वामींनी



तू स्वामींनी सखे 
या जीवनाची 
गृहस्वामिनी तू 
मम प्रपंचाची 

तू सारथी सखे 
माझिया रथाची 
अचूक माहिती 
ती तुजला पथाची 

तू कारभारीन 
सखे या घराची 
वजाबाकी ठाव 
तुजला बेरजेची

तू लेखिका सखी 
सहजीवनाची 
मुर्त स्वरूपच
सोबत सुखाची 

तू सावली सखे 
सदैव प्रीतीची 
तापल्या जिवाला
शीतलता साची 

तुजवीण सखें 
न गोष्ट जीवनाची 
अधुरीच सदैव 
कथा विक्रांतची

****

बुधवार, ३१ जुलै, २०१९

गिरनारी





गिरनारी 
******

आलो गिरनारी 
घडले दर्शन 
आनंदाचे घन 
मन झाले 

बाप अवधूत 
पाहियला डोळा 
युगाचा सोहळा 
क्षणी झाला 

पाहिली पावुले
शिळे उमटली 
दर्शने जाहली 
तृप्ती जीवा

केले दंडवत 
उत्तराभिमुख 
स्मरून अलख 
हृदयात

सरे सारा शीण
आनंद उधाण
दत्तात्रेयी मन
लीन झाले

पडला विसर
सा-या जगताचा
खिळल्या पायाचा
देह झाला

विक्रांत दत्ताचा 
दत्ताला भेटला 
ठेवून स्वतःला 
आला तिथे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, ३० जुलै, २०१९

पापाचा तो पैसा



पापाचा तो पैसा 
असे रे कोळसा 
आत्म्याचा आरसा 
काजळता 

देतो जगण्याला 
सारे विश्वंभर 
तया कृपेवर 
आस्था ठेव  

मनाची या हाव 
नाही सरणार 
आग मागणार 
तेल सदा 

एक एक पैसा 
होय पाप ओझे 
दार नरकाचे 
रुंदावते 

जळू दे रे हात 
माझे अवधूता 
चुकून लागता 
तया  कधी 

विक्रांता भाकर 
देई एक वेळ 
नावे ओठांवर 
आणि तुझे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

सोमवार, २९ जुलै, २०१९

दत्त सुखापुढे




दत्त सुखापुढे
*********

दत्त सुखापुढे 
भोग ते थेकुले  
वाटती धाकुले  
राज्यभोग

दत्ताला वानिता 
शब्द होती स्तब्ध 
रुपावरही लुब्ध 
भाव सारे  

स्वर्ग सुख सारे
खेळणे मनाचे
उच्छिष्ट सुराचे
मज वाटे

अरेरे जगत
तयात वाहते
मरणा मागते
दान जैसे

आनंदनिधान
असता पावुले
व्यर्थ अंतरले
भाग्यहीन

विक्रांते जाणले  
ह्रदयी धरीले  
म्हणूनी सुटले
भवभय


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २८ जुलै, २०१९

हे प्रियतम आत्मन





हे प्रियतम आत्मन 
**************
म्हटले तर मी 
दिवस मोजतो आहे 
म्हटले तर मी 
दिवस विसरतो आहे 
मोजामोजीत ठेवाठेवीत 
तुजला परि शोधतो आहे 
तुझे अंधार पांघरून निजणे  
तुझे दिशा होवुन जगणे 
सारेच विभ्रम सौंदर्यांचे 
अन् त्यात माझे खुळावून जाणे
हे सारे जरी असे नित्याचे 

कधी परि माझ्यात उलगडते 
स्वप्न तुझे शुभ्र चांदण्यांचे 
गर्द वनराईवर पडलेले 
शांत स्निग्ध मनोज्ञ एकांतातले 
तू असतोस कातळात गोठून 
हळूवार हवेत पसरून
मोकळ्या माळावर गाणे होवून

हे प्रियतम आत्मन 
सर्वव्यापी सनातन 
दत्तात्रेय भगवन
काय वेगळा आहेस
तू या सगळ्याहून

हळूहळू जातो मग मी ही
तुझ्यात विरघळून

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

शनिवार, २७ जुलै, २०१९

सरस्वती वंदना



..

.
.. माता शारदा ..


करतो मी स्तुती 
माता शारदेची 
माझ्या जीवनाची 
सर्वस्व जी II

हंसवाहिनी ती 
विद्येची देवता 
व्यापूनिया चित्ता 
राही सदा II

तिच्या वीणा नादी 
ॐ कार गुंजती  
लक्ष प्रकाशती  
सूर्यकण II

आई अधिष्ठात्री 
चौदाही विद्येची 
चत्वार वाचेची 
जननी जी II

तिचा प्रसादाने 
साहित्याची लेणी 
आकाश भरूनी  
मूर्त होती II

शुभ्र कमलासना 
मूर्त शुचिता जी 
मज मती माजि  
वास करो II

विक्रांत नेणते  
लेकरू हे तिचे  
आजन्म विद्येचे   
स्तन्य मागे II


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...