गुरुवार, २५ जुलै, २०१९

ऐसा दत्त






ऐसा दत्त
********
ऐसा दत्त दिसो मज
मनोमनी उजळला
जीवनाच्या वाटेवरी
क्षणो क्षणी  साथ आला   


ऐसा दत्त कळो मज
जगतांना जाणलेला  
आयुष्यात काठोकाठ  
भक्तासवे बसलेला

असा दत्त मिळो मज
प्रार्थनेत सजलेला
आपपर भाव गेला
जनीवनी वसलेला


असा दत्त फळो मज
दुजाभाव नसलेला
घरीदारी परिवारी  
जीवलगी सामावला

असा दत्त पाहो मज
एक  रुपी एक झाला
तया पावुला विक्रांत
जन्मोजन्मी विसावला 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

बुधवार, २४ जुलै, २०१९

विभूती व्हावा




विभूती व्हावा

***********
इंद्रियांचे रान 
टाकावे जाळून 
घर ते फुंकून 
म्हटलो मी

हाती पडले त्या
गोड से मानून 
राहावे बसून 
निरार्तीत 

उदरभरण 
पालन पोषण 
काहीही करून  
घडेच ना

परि हातातली
भरते न झोळी
जागा रांगेतली 
सुटते वा

“अरे असतो हा 
प्रपंच असाच 
सांगण्यात नच  
नवे काही ”

दाविले दत्ताने  
मायेचे खेळणे  
जीवन जगणे 
यथावत  

मग विनविले 
शरण जावून 
मागणे टाकून 
दयाघना

“विक्रांत कोळसा 
निखारी जळावा 
विभूती व्हावा 
धुनीतला ”


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे






मंगळवार, २३ जुलै, २०१९

दत्त स्वप्न



दत्त स्वप्न माझ्या
पडे जगण्याला
अर्थ असण्याला
आणे काही

दत्त स्वप्न वांछी
स्वप्न सुटण्याला
स्पर्श नसण्याला
करण्यास

स्वप्नी मिसळून
जावे हरवून
सिंधूशी लवण
जैसे काही

स्वप्नी समर्पण
इंधन होऊन
जावे हरवून
स्वाहाकारी
पडो क्षणोक्षणी
स्वप्नाचे हे स्वप्न
पाहण्यास मन 
उताविळ

स्वप्न विक्रांतचे
काय असे त्याचे
काम  पाहण्याचे
दत्ता सुखे 



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



सोमवार, २२ जुलै, २०१९

त्यातीलच एक


त्यातलाच एक  
*********
जगत आधारा 
परम कृपाळा 
म्ह्णती  उदारा 
तुज सारे 

म्ह्णुनिया मग 
तीच ती अक्षरे 
ओठी मीही धरे  
आशेने रे 

जगतो सुखात 
चौकोनी घरात 
आखीव जगात 
नीटपणे

परि का मनात 
उदास आकाश 
अतृप्ती आभास  
कोंडलेला 

कितीक जणांचे 
असेच जगणे 
आणून उसने 
वसान 

त्यातीलच एक   
करू नको मला 
किनारी बसला 
भयभीत 

विक्रांत तयार 
बुडाया तराया 
येण्यास तुझिया
तीरास त्या 


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 


रविवार, २१ जुलै, २०१९

चंदन शेजार






चंदन शेजार
***********
पाहीला मळला
झर्‍याचा ओघळ
पापाचे काजळ
लेऊनिया ॥

पाहिले निर्व्याज
जळलेले मन
अहंता भरून
वाहणारे ॥

सुखाच्या शोधात
हरवून पथ
धावते सैराट
भोगी मन

नको देऊ मज
अशी अधोगती
सदा अवधूती
वृती ठेव ॥

विक्रांता शेजार
देई चंदनाचा
संत सज्जनांचा
सर्व काळ ॥

मग मी निर्धास्त
पंकज पंकात
राहिन स्मरत
तुज दत्ता॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

शनिवार, २० जुलै, २०१९

तृषार्थ पथिक




अवधुता विना
काहीच सुचेना
मन हे रमेना
अन्य कुठे ॥
चातकाची चोच
जाहले जगण
भेटावे जीवन
तया कैसे ॥
कासावीस जीव
लागली तहान
थिल्लर सेवन
घडेचिना ॥
कोसळ बा दत्ता
होय दयाघन
मज तुजविण
अन्य नाही ॥
विक्रांत युगाचा
तृषार्थ पथिक
आसरा क्षणिक
हृदयी दे ॥



शुक्रवार, १९ जुलै, २०१९

चिंचा

चिंचा
*****
चिंचा चावता चावता
जीभ वेडावली काही
दात आंबले तरीही
नाही म्हणवत नाही

काही मधुर गोडस
कण रेंगाळती कुठे
असे विचित्र मिश्रण
जीव तयावरी जडे

लाल तपकिरी रंग
एक वेगळा सुगंध
तया स्मरता मनात
जीभ टाळूत हो बंद

वृक्ष थोराड प्रचंड
कोटी पानांचे जगत
तिथे असतात भूत
कधी खरं न वाटतं

फळ आम्र चिकू केळी
जरी मधुर चविष्ट
चिंच सम्राज्ञी रसांची
करी स्मरणे प्रकट
**
दत्त तसाच तो माझा
साथी सदैव सुखाचा
बाळ तारुण्य वार्धक्यी
असे रसनेचा राजा

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...