सोमवार, १५ जुलै, २०१९

तुजविण दत्ता





तुजविण दत्ता
**************
नको मज जीणे
तुजविण दत्ता
जगणेही आता
शिण वाटे ॥
वाहतो देहाला
व्याधींच्या संघाती
होण्या तुझी भेटी
म्हणूनिया॥
मनाची बोलट
नकोशी संगत
धरून राहत
तुझ्यासाठी ॥
धरिला संसार
जरी का खवट
घडण्या शेवट
प्रारब्धाचा॥
येई मायबापा
घेई गा कुशीत
श्वासाचे संगीत
मग सरो ॥
विक्रांत जगात
कुण्या कोपऱ्यात
जाईल विरत
थेंबागत ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००















रविवार, १४ जुलै, २०१९

दानपेटी


देवापुढे नसो
कधी दानपेटी
रित ही ओखटी
वाटे मज ॥
असतो का कधी
देवाचा तो धाक
म्हणे पैसा टाक
कधी का तो ॥
असो धर्म पेटी
स्थळ चालविण्या
सोय ही करण्या
येणा-याची ॥
परंतु तयात
गोवू नये देवा
ऑफरिंग नावा
ठेवूनिया ॥
बाह्य मार्गावरी
पेटी ती ठेवावी
पावती फाडावी
हवी तर ॥
नको त्या धनिका
व्हीआयपी सेवा
जणू काही देवा
लाडका तो 
सुटो वहिवाट
ऐसी जनरीत
एकाच रांगेत
सारे राहू ॥
विक्रांता दिसतो
पैशांचा बाजार
जणू तो संसार
इथे दुजा ॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

चुकलो माकलो


चुकलो  माकलो
सैराट धावलो
उशिरा पातलो
तुजकडे 

परी विसाव्याला
तुझाची आधार
होऊन साकार
दया दावी ॥

जग हे कलीचे
कळतेय जरी
पुन्हा पुन्हा परी
अडतोय ॥

तुजला भिडेला
घालतो कृपाळा
पुण्याई व्यापारा
वापरतो ॥

तुज विन मज
अन्य कुणी नाही
कृपा दृष्टी पाही
जीवलगा ॥

विक्रांत विनवी
श्रीदत्ता तुजला
ठाव दे पदाला
लेकराला ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

शनिवार, १३ जुलै, २०१९

पुरे झाले दत्ता


पुरे झाले दत्ता
*************


उरलेत चार
पाच हे मुक्काम
नंतर आराम
तव पदी

वाहतो तोवर
देहाचे लोढणे
जगात साहणे
कसे बसे ॥

पुरे झाले दत्ता
उबगलो याला
तुझ्या घराला
नेई मज ॥

 दुःखाचा बाजार
कारे तू मांडला
कळेना मजला
कृपाळू वा ॥

तुझे ठाव तुला
नको सांगू काही
पण मज देही
गोवू नको ॥

मागतो विक्रांत
ठेव स्वरूपात
जन्म मरणात
लोटू नको ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

०००००


शुक्रवार, १२ जुलै, २०१९

पंढरी



अवधूत पंढरी

पाय चालती चालती
अास  उरात धरुन
धन मान यश भान
गाठी तोडून सोडून 

कोण आलेले कुठून
कुठे जायचे निघून
शंका भीतीचे मळभ
गेले गजरी  विरून

कुणा भेटणार काय
काही जाणल्या शिवाय
देती झोकून स्वत:ला
मनी बाप रखुमाय

ओढ कुणाची कशाला
मुळी कळेना मनाला
डोळी वाहती का धारा 
शब्द ओठी ये विठ्ठला

बाप अवधुत माझा
बसे पंढरी सजून
बाळ विक्रांत नाचतो 
हाती पताका घेवून

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, ११ जुलै, २०१९

पडावा हा देह


पडावा हा देह
तुझिया चरणी
ओघळून मनी
श्वासाचे या   

अन्य अवधूता
काही न मागणी
जन्माची कहाणी
तुच होय ॥

सुखाच्या हिंदोळी
दुःखाचे गचके
जागोजागी धक्के
द्द्ंडाचे ॥

सत्तेची घमेंड
पैशाचा वा माज
उन्मतांची गाज
येथे चाले ॥

नको देवराया
तमाचे हे जग
शोषितांचा ओघ
जिथे वाहे ॥

पापाची आंधळी
चाले कोशंबीर
कलि मनावर
राज्य करी ॥

विक्रांत शिणला
दोषात मळाला
केवळ उरला
तुज मुळे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



बुधवार, १० जुलै, २०१९

मुक्त करी


आता या देहाचे
रो देवा काज
स्वरूपाचा साज
जन्म होवो  

दावी काही कळा
सुखाचा सोहळा
पाहुनी मोकळा
करी मला ॥

विरलेले धागे
विटलेला रंग
गाठी या सवंग
सोडव रे  

कितीदा घातली
कितीदा फेडली
जगी मिरवली
वस्त्रे पुरे ॥

जरी का उरले
प्रारब्धयाला
पुने पायाला
री दारी ॥

विक्रांत देहाला
शिणला मनाला
विनवी दत्ताला
मुक्त करी ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


००००

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...