रविवार, ७ जुलै, २०१९

वारी




वारी
***

सर्वव्यापी सनातन
ज्ञानदेव पुरातन
पंढरीसी येणं जाणं
एकपणी रसपान

जाणीवेच्या मातीमध्ये
उगवणे जागेपण
अवकाश व्यापूनिया
विरलेले देहभान

पादुकांची स्पर्श भेट
जोडणारे जनमन
एका भाव एक ध्यास
लाखो चालती चरण

चालण्याच्या सोहळयात
जन्म जगण्या वेढून
वाटेचे निमित्त फक्त
आत स्थिरावला क्षण

चाल बापा त्या पथाने
स्वरूपात मुरलेला
वाहणारे पाय वाहो
शब्द थांबो चाललेला


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

आसक्ती


आसक्ती
********

कशाला आसक्ती
हाडांची मांसाची
सजल्या त्वचेची
जगन्नाथा

जनुकात बंद 
प्रजनन छंद
घेण्या देहबंध
नव्या रुपी ॥

कामातूर मन
तोच भोगवटा
मरणाच्या वाटा
घोंगावती ॥

मनोमनी चाले
सुखाचा हा शोध 
अतृप्तीचा नाद
विश्व भरे ॥

विक्रांत मागतो
कृपेची सावली
सरू दे काहीली
दत्तात्रेया ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


शनिवार, ६ जुलै, २०१९

जळो मोठेपण




जळो मोठेपण 
आले उगवून 
मनाला व्यापून 
नको तरी

बरवे राहावे 
कुणी नसलेले 
दत्तात रमले 
चित्त माझे

नको ती उपाधी 
दयाघना पाठी 
सोडव रे गाठी 
पडलेल्या

होणे कुणी नाही 
देणे कुणा काही 
आठवण ती ही 
नसु देरे

तुझिया प्रेमात 
राहावे जगत 
आनंदे पाहत 
रूप तुझे

विक्रांत मागतो 
जाग जगण्यात 
योग असण्यात 
सवे तुझ्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in
००००

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

जीव दत्त पायी




जीव दत्त पायी
***********

फेडूनिया ऋण 
काही जीवनाचे
मजला जायचे 
आहे जरी ॥

अडकला जीव
माझा दत्त पायी
मज अन्य काही 
नको वाटे ॥

चाललो घेऊनी 
संसाराचे ओझे
आलो प्रारब्धाचे 
मापे जरी ॥

सांभाळ रे दत्ता 
नेई आता पार
मजला आधार 
अन्य नाही ॥

वाहतो विक्रांत 
प्रारब्ध प्राक्तनी
दत्ताला स्मरूनी
सदोदित 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, ४ जुलै, २०१९

सुटो अहंकार




सुटो अहंकार
********

माझिया मनाचा
सुटो अहंकार
जेणे तुझे दार
अडविले ॥

होऊन धुकट
येते तुझ्या आड
डोळ्यास झापड
लावतसे ॥

तूच माझा सखा
स्वप्न सजविता
मरणाची गर्ता
चुकविता ॥

इवल्या फुंकरी
सरू दे आभाळ
कृपेची सकाळ
करी बापा ॥

नाव अवधूत
गाजो तुझे मही
त्राही त्राही पाही
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


बुधवार, ३ जुलै, २०१९

नेई मज दत्ता




नेई मज दत्ता
पुन्हा चांदण्यात
पुन्हा पावलात
स्वर्ग नांदो ॥

पुन्हा माथ्यावरी
झळाळो तो चंद्र
ओघळावा सांद्रतुही मनी ॥

तीच लवलव
हिरव्या पानात
चंदरी रसात
दिसू दे रे ॥

कभिन्न कातळी
हरूनियां भान
माझे हे मी पण
जाऊ दे रे ॥

दरीतला वारा
येऊ दे भरारा
मनाचा पिसारा
फुलू दे रे ॥

साद कानांवर
जय गिरणार
पुन्हा एकवार
पडू दे रे ॥

लोभस ती मूर्ती
दिसू दे चरण
डोळ्यात भरून
पाहू दे रे ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

मंगळवार, २ जुलै, २०१९

आई






लायकी वाचून
नाही ना धावत
तुजला मागत
प्रेम प्रभू ॥
बाळ हे मळले
घाणीत पडले
आईने त्यजिले
काय कधी ॥
तैसा जरी मज
दोषांनी वेढले
वाया घालविले
जन्मात या ॥
घेई गे जवळ
करी गे सांभाळ
करून सकळ
दोष दूर ॥
कुपुत्रा सुपुत्र
करण्याचे बळ
तुजला केवळ
मायबाप ॥
विक्रांत वाचाळ
बोलतो बरळ
करिसी सरळ
दत्तात्रेया.॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
****०००००

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...