शुक्रवार, २८ जून, २०१९

वाटा परतीच्या



वाटा परतीच्या
************

मागे वळून पाहता
लागे आसवांची सरी
बाप गिरनारी माझा
दृष्टी धरी मजवरी ॥

तुझे जाहले दर्शन
माझी सुखावले मन
क्षण दुजा आला पण
सवे विरह घेऊन

पुन्हा घडो येथे येणे
पुन्हा आनंद चांदणे
पुन्हा पावसाच्या सरी
गाणे बहरून जाणे

वाटा परतीच्या तुटो
जरी वाटे क्षणक्षणा
माय कठोर तू लोटे
मज जीवनाच्या रणा

दिला नेमून संसार
घडो तुझ्या स्मरणात
नाव ओठांवर तुझे
रूप राहो हृदयात ॥

खुळा भक्त हा चालला
खुळेपणी नादावला
खुळा होवून विक्रांत
त्याच नादी खुळावला


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००
००००

गुरुवार, २७ जून, २०१९

करुणा बहाळी




मज देऊनिया शब्द 
कृपा दत्तराये केली 
प्रीत दाटली मनात 
पदी वाहता ती ली

बाप कृपाळु कैवारी 
मज धरूनिया हाती 
मार्ग सुकर करून 
आडरानातून काढी 

शब्द पिकल्या मनाचा 
मज करूनिया माळी 
करी कौतुक जगात 
असा करुणा बहाळी 

त्यांच्या प्रेमात गुंतलो 
मज हरवून गेलो 
प्राप्त भोगतो संसारी 
नच इथला उरलो

ऐसा कैवल्याचा रंग 
मज खुणावू लागला 
यत्न अवघा सरला 
शब्द सोहळा उरला 

नका विचारू आणिक 
विक्रांत आहे का गेला 
येण्या जाण्याचा संकल्प 
सारा दत्तमय झाला 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००


हरवली पुनव




हरवली पुनव
*********

ते डोळे मिटणारे ते श्वास सरणारे 
अगतिक असहाय ते प्रेम हरणारे 

विशी पंचविशीतले होते वय कोवळे 
जगण्याची आस त्या डोळी एकवटले 

हळू हळू वाढलेली श्वास गती होती वक्षी 
थकलेल्या पिंजरी त्या थकलेला पक्षी 

चुकलेला नेम जणू होता तो काळाचा 
करपला देठ जणू चुकूनिया कळीचा 

दाट केस काळे कुंकू छोटे भालावरी 
खचलेला पतीसवे होता हात हातावरी 

आणि मग गेली ती लढूनिया थकलेली
पुनवच जणू काही अवसेत हरवली 

पण तिचे ते डोळे बोलके नि मोठाले 
विनवणी भरलेले माझ्या जीवनी थिजले 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

बुधवार, २६ जून, २०१९

दत्त वसंत




माझ्या मनी पालवला 
दत्त सुखाचा वसंत
गेल्या भरूनिया दिशा 
अवघा आनंदी आनंद॥

चैत्र पालवी सुरेख 
गंध सुमनांचा मळा
स्वर नामाचा विलसे 
फुले कोकिळेचा गळा ॥

वारा उत्तरेचा मंद 
येई सांजेला घेऊन
गंध चंदनाचा काही 
नेई राउळी ओढून ॥

देही उत्सव नटूनी 
मनी ऋतुराज येई
धुंद मोहर जाणिवी 
सुख उघडून जाई

भाग्य आले माझ्या दारी 
तन मनाचे तोरण
होई विक्रांत हिंदोळा 
सुखा थिटे त्रिभुवन ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

मंगळवार, २५ जून, २०१९

उताराची वाट



वाटेवरी उतारी त्या 
हात हातात कुणाचे 
भलतेच काय बरे 
वेड्या असे वागायचे

रित भात जगताची 
काय तुला ठाव नाही 
चढ उताराची धाव
मध्ये कुठे गाव नाही

कुणी कुणा सावरावे 
कळण्यास वाव नाही 
कुणी कुठे घसरावे 
थांबण्याचे नाव नाही

जाणणारे अंध डोळे 
अर्थ तोच मोजणारे  
उमटून प्रश्न मनी 
भुवयात अडणारे

सांग बरे तूच आता 
यात असे काय खरे 
उताराचा स्वभाव वा
बहाणा ही वाट धरे

सोमवार, २४ जून, २०१९

दत्ता विसरणे महापाप




दत्ता विसरणे महापाप
**********************

अवघी उद्याची 
चिंता माझी देवा 
घ्यावे तुझ्या नावा
हेचि व्हावी ॥

तुझिया स्वप्नात 
सरो सारी रात
रूप डोळीयात 
दिसो असे ॥

राहो धडपड 
पोटाची पाण्याची 
गाठ कटोर्‍याची 
असो करी ॥

भरो पोट अर्धे 
राहो वा उपाशी 
मजला तयाशी
काय काज ॥

विक्रांत जगणे
असो उणे दुणे
दत्ता विसरणे 
महापाप ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००


रविवार, २३ जून, २०१९

बाप कृपाळुवा दत्त





********

दिशा गेलेल्या गिळून
जग गेलेले संपू
तुझे अस्तित्व उरले
तन मनाला वेढून 

थेंब पाण्यात सांडला
थेंब वाहता जाहला
थेंब थेंबाचा सागर
थेंब म्हणावे कुणाला 

वाट धुकट धुसर
नभ ओघळे झांजर
उब पदरी बाळाला
तैसे सुखावे अंतर 

सारे दुःखाचे उखाणे
गेले सुखात मुरून
नाव दत्ताचे ओठात
लाज जगाची सोडून 

बाप कृपाळुवा दत्त
सवे नाथांचा संघात
झाला भाग्याचा विक्रांत
तया पायी होतो रत

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...