मंगळवार, ५ मार्च, २०१९

शिव परिवार


शिव परिवार
*******

दिनरजनीचा
घेऊनि धागा
रचतो जगता
सदाशिव

त्या वस्त्राचा
पोत पाहते
आधार देते
जगदंबा

लाल पांढरे
निळे जांभळे
वस्त्र जोडले
एक एका

युगे अशी ही
अनंत घडती
कौतुक पाहती
गणराय

जो खांद्यावर
प्रिय पित्याच्या
लीला जगाच्या
अवलोकी

आणि षडानन
करी अनुकरण
पित्यासमान
होण्यासाठी

व्याघ्र नंदी अन्
मयुर सुंदर
अवघेची हे घर
कैलासाचे

विक्रांत पाहिले
कुटुंब असले
कौतुक दाटले
मना माजी

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, ३ मार्च, २०१९

दत्त रांगेत माझा नंबर




सां कधी येईल रे
रांगेत माझा नंबर
कसा कुठे दिसेल तो
मज दत्त दिगंबर .

खडावांचा बोल तया  
माझ्या कानी गुंजतील
आनंदाच्या रोमावळ्या
अन देही उठतील

फार का रे दूरवर 
मारू अशी चक्कर मी
जन्ममरणांशी घेऊ 
उगा का रे टक्कर मी

माझ्यासवे ब देवा  
वशिला मुळीच नाही    
भरलेला खिसा अन
कुणी दलालही नाही  

मळलेले हात माझे
पान फुले मळलेली
धक्का बुक्की खातांना  
शिवी मुखी बसलेली

तहान भुकेने तुझ्या 
असे बहू काकुऴलो  
जळतात पाय माझे
अन मनी व्याकुळलो

तरी तुझ्या दारी उभा
रांग सोडतच नाही
विनवितो विक्रांत हा
दत्तादी ठादेई

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**


आरसा



आरसा
*****

माझ्या मनाचा
आरसा धुळीचा
असे रे कधीचा
भरलेला

तुझिया हाताचा
व्हावा स्पर्श तया
तुजला पहाया
दत्तात्रया

अंतरात साचा
साथी प्रकाशाचा
अनंत मितीचा
निर्विकार

पाहताच तुला
पाहीन मी मला
अर्थ मी पणाला
ये तेधवा

विक्रांत अज्ञात
बसे कोपऱ्यात
वाट ती पाहात
दिगंबरा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १ मार्च, २०१९

उभ्या मोहाचा राशी




उभ्या मोहाचा राशी
तुझी भेट व्हावी कशी
जीव जतो दातारा
तुजविण दिननिशी

किती जाहल्या चुका
वाट तमी हरवली
तुला स्मरतो तरीही
डोळा लावून मशाली

किती व्रण रे देहासी
मन चाळण हे झाली
काट्याकुट्यात आसक्ती
होती खोल दडलेली

दत्ता विरागी करा हो
एक देऊनिया छाटी
जाव्या हळूच सुटूनही
जन्मोजन्मीच्या या गाठी

नाव विक्रांत माझे हे
रा सार्थ देवा मही
नाव विक्रांत पुसा हे
दत्ता भरूनिया देही

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

निरोप



निरोप
*****
भाऊ निघाला समरी
दही देते हातावरी
आई सांभाळ भावड्या
आण सुखरूप घरी

भाऊ शिवबाचा भक्त
त्यांच्या रक्तात तान्हाजी
खिंड राखेल शर्थीने
जणू दुसरा की बाजी

सीमा पेटली पेटली
विष दंतानी वेढली
नाच फड्यावर असा
कृष्ण होवून मुरारी

नको येऊन देऊस
आच एका घरावरी
भूमी इंच इंच लढ
कुळनाव सार्थ करी

वैनी लाडकी लहान
हात पिवळे अजून
नको पाहूस वळून
तिला डोळ्यात ठेवीन

येशी परतून जेव्हा 
गावी पिटेल दवंडी
जगी मिरवेल द्वाही
आला शिवबाचा गडी

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

अजुनि रक्त माझे



अजुनि रक्त माझे
**************

अजुनि रक्त माझे थोडे
 रे येथे सांडणार आहे
 सावध, फौज कोडग्यांची
 लपूनही पुन्हा येणार आहे

तेज तर्रार हे शस्त्र झाले
तुटूनिया पडणार आहे
एकेक रिपू  नग्न संगीन
रे आता टिपणार आहे

होऊ  दे रे अंत , इथला तो
प्रत्येक गद्दार मरणार आहे
हातात घेत मरण आता 
प्रत्येक कण लढणार आहे

आलो असे जन्मा  इथे मी
सार्थक ते करणार आहे
जननी जन्मभुमी तुझे गं
पांग मी फेडणार आहे


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

तर्पण




तर्पण
*****

जाहले तर्पण
आत्मा उर्ध्वगामी
निवली ही भूमी
तापलेली 

उधळली राख
चितेत थांबली
प्रवाही निघाली
अस्थि फुले 

आता शिवतील
काक त्या पिंडी
उमटून शांती
अंतरंगी

पेटलेल्या मनी
दुःखाची कहाणी
स्मृतीच्या सुमनी
शांत होय 

झालेय आता
तक्षकाय स्वाहा
इंद्राय स्वाहा
होवो काही  

भले केले वीरा
म्हणतो विक्रांत
असे पुरुषार्थ 
हाच खरा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...