मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

ज्ञानदेवा !!





ज्ञानदेवा !!

माझिया मनीचा
पुरवावा हेत
मिळो तुझी प्रीत
ज्ञानदेवा ||
सरो माझेपण
अवघे कळून
सदोदित होवून
तूची रहा ||
अमृत सिंचन
देई अनुभव
तन मन भाव
मावळून ||
येणे परतून
घडू नये पुन्हा
गिळून करुणा
टाको मज ||
विक्रांत पाहतो
मिटूनिया डोळा
सुखाचा सोहळा
अंतरात  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, ६ जानेवारी, २०१९

काही कथा

कथा

साऱ्याच कथा जीवनाच्या
कधी नसतात यशोगाथा
साऱ्याच पौर्णिमा नभातल्या
न दावतात प्रकाश वाटा

काही अडतात अडखळतात
मुक थांबतात सुन्या कडेला
काही हरतात पथ सोडतात
हरवून जातात आडवाटेला

त्या हरवल्या प्रवाशाची
खंत काळ पुसून टाकतो
शिशिरात होते पानगळ
वृक्ष तटस्थ उभाच राहतो

कोण जगतो काय कशाला
ज्याचे असते श्रेय तयाला
मनातील या क्षण जगताला
अर्थ नसतो इथे असण्याला

सारे घडते कळल्यावाचून
विश्व चालते ठरल्यावाचून
लहरी मधून लहर जन्मते
लहर जाते लहरीत हरवून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ५ जानेवारी, २०१९

भक्तीची मोट



भक्तीची मोट
**********

अवधूत कृपा
करी मजवर
प्रारब्धाचा पूर
दूर सार ॥
येरे जीवलगा
करू नको खेळ
पाडसा सांभाळ
भटकत्या ॥
मजला खेचतो
तुझा प्रेमपथ
जन्मांचे हे नातं
पुरातन ॥
आदिम हुंकार
प्रणव पहाट
खोल अंतरात
रूप तुझे ॥
विक्रांत भक्तीला
बांधलेली मोट
डुंबत भरत
तहानली ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

याचक










याचक
*****

होवूनी  याचक
मी तुझ्या दारात
घालतोय साद
दत्तात्रेया ॥
मागतोय दान
ज्ञान भक्ती त्याग
कमल पराग
जीवनाचे ॥
रत्नपारखी तू
कृपेचा सागर
लोटी मजवर
दया प्रेम ॥
जन्मा घातलेस
भूकही दिलीस
मुखीं घाली घास
स्वरूपाचा ॥
भेटीची हि आर्ती
पुरवावी देवा
विक्रांता विसावा
पायी द्यावा ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

नसणेपणात


नसणे पणात
********


या मनाच्या चांदण्यात
शांत मध्यरात्र आहे
शुभ्र दैवी प्रकाशात
रिक्त तृप्त गात्र आहे

पानावरी भावनांचे
मुग्ध मौन गीत आहे
गर्द सावलीत स्मृती
निज पांघरीत आहे

स्वप्न नाही निद्रा नाही
जाण जागृतीत आहे
निर्विकार निष्कंप हे
सर्व आसमंत आहे

रिते मन रिते हात
मागणे सुटत आहे
देण्याचाही खटाटोप
हळू मावळत आहे

मीच हा माझ्यातला
मी पणा पाहत आहे
वाहतेय पाणी तरी
भरुनी पात्रात आहे

सांगतो नाव तरी न
अर्थात विक्रांत आहे
लिहितो कविता तरी
नसणे शब्दात आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २ जानेवारी, २०१९

अवघडलेले प्रश्न



अवघडलेले प्रश्न
*************
अवघडलेले प्रश्न
उभे दारात दाटून
उगे उगेसे जीवन
स्तब्ध उत्तरा वाचून

वास्तवात स्वप्न पडे
पापण्यात ओघळुन
उडण्या आधीच जाती
पंख जणू कि जळून

धुक्यातील नाते जाते
वारीयात वितळून
जीवघेणे हिव अन
ठसठसे  नसातून

मागतो ती उब गेली
दूर कुठे हरवून
चित्र शेकोटीचे तरी
घेतो उरी कवळून

हा  कुणाचा  खेळ चाले
कुण्या सुड चक्रातून
का वाहतो नशीब मी
होत असा पराधिन
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १ जानेवारी, २०१९

शोधतो दत्ता



शोधीतो दत्ता
************

चुकलेल्या जगी
उगा वावरतो
तुजला शोधतो
दत्तराया ॥
अहो ते धनाचे
जगत मानाचे
कीर्ती कर्तृत्वाचे
नाही माझे ॥
किती सांभाळावे
कसे सांभाळावे
पाठीवरी घ्यावे
व्यर्थ ओझे ॥
तुवा जे दिधले
तैसेच जगतो
नात्यात राहतो
वेढलेल्या ॥
नेई रे दातारा
आता तुझा घरा
एकदेशी करा
मन माझे ॥
मग हा विक्रांत
राहील निवांत
सुख सोहळ्यात
आनंदाच्या ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http//kavitesathikavita.blogspot.in

चाकरमानी

चाकरमानी ******** पोटाला पाठीला  पिशव्या बांधुनी कामाला निघती हे चाकरमानी ॥ चाकरमान्याच्या  डोळ्यात घड्याळ देहा चिकट...