गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली




कवयित्री विनिता पाटील यांना श्रद्धांजली
**********************

जीवन क्रूर असते
का मृत्यू ?
कळत नाही
रोज समोर दिसणारे
असंख्य मृत्यू  पाहूनही
प्रश्न सुटत नाही !

निर्व्याज मुलांसारखे
मृत्यू ओढून निजलेले
चेहरे पाहिले की
अस्तित्व थरारते
हवालदिल होते .

जीवनाने सळसळणारे झाड
पडताच उन्मळून
अहंकार जातो चूर चूर  होवुन .
अन परवशता घेते वेढून.

विनिता ...!

काव्य रसाने बहरून  आलेला
तुझा जीवन  वृक्ष
त्यावर सळसळणारे
प्रत्येक कवितेचे पान
शब्दाशब्दातून परावर्तीत होणारे
प्रतिभेचे किरण
अन त्याचा तो संपलेला प्रवास पाहून
सुन्न होऊन गेले मन

तू  होतीस
कवितेच्या समृद्धीवर
लौकिकाच्या लहरीवर
विराजमान झालेले
दिमाखदार काव्य सुमन ..
शब्दांच्या साम्राज्यात
आपले वतन प्रस्थापित केलेली सम्राज्ञी
वृत्त लय होते तुझ्यासमोर
अष्टोप्रहर मान झुकवून
पण
तू गेलीस अचानक
यत्किंचित व्हायरस चे आक्रमण
थोपवल्यावाचून

कधी कधी असे वाटते
जीवनातील दुःखांचे आक्रंदन
करते आमंत्रण
शब्दावाचून " त्याला "
आपला महा सखा म्हणवून
असेच काही तर
नसेल घडले तुझ्या बाबतीत
तुझ्या कवितेतील व्यथा
अन् तडफड पाहून

खरतर तू ज्या मनोभूमीवर होतीस
तिथे तुला खूप काही मिळायला हवे होते
पण अपेक्षा अन आस्वादकता
रसिक मनाला मिळालेले
वरदान आहे की शाप
हेच नाही उमजत

हे माझ्या काव्यजगतातील
मैत्रिणी
तुझ्या अश्या अचानक
चटका लावून जाण्याने
तुझ्या कवितेचे गडद ठसे
उमटले आहे माझ्या मनावर
हवे नको या पर्याया वाचून
म्हणून तू गेलीस तरीही
राहशील  माझ्या सोबत
तुझ्या शब्दातून डोकावत
तुझी विलक्षण कहाणी सांगत
दुःखाची सार्वकालीन चादर पांघरत
तुझ्या वेदनांवर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कवितेचे ऋतू

कवितेचे ऋतू
*********
मनाच्या मातीत
निजलेल्या कविता
वाट पाहतात
कुणाच्या स्पर्शाची
हलकेच जागवण्याची
कोवळ अंकुरांची

काही कवितांना
मिळतो तो ऋतू
उमलून देणारा
स्वप्न जागवणारा
आकाशात नेणारा

पण ज्या कविता
कधी अंकुरत नाही
अंतर उघडत नाही
त्या कवितांचे संपणे
अपरिहार्य असते
निसर्ग नियमानुसार

पण त्या त्यांच्या
विखुरल्या कणातून
हरवल्या पणातून
मनाची माती जाते
अधिक सुपीक होऊन

कारण जगणे म्हणजे
त्या मातीचे गाणे असते
कविता सृजल्या तरीही
अथवा करपल्या तरीही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

दत्त नाम


दत्त नाम

जगी दुमदुमे
एक तुझे नाव
साधू संत राव
भक्त तुझे ||
देव मुनि यक्ष
करीती आरती
भक्ति भावे गाती
किर्ति तुझी ||
दिव्य तुझे नाम
करता स्मरण
भावाचे बंधन
तुटो जाय ||
विक्रांत भाग्यवशे
वाणीत रुजले
हृदयी धारिले
म्हणुनिया ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

निरोप समारंभी





या तीन वर्षांत 
गेलो आहे तीन पर्वातून 
पहिले पर्व सोपे होते 
जाणणे पाहणे शिकणे
अन व्यक्ती ओळखणे 
हेच मुख्य काम होते 
स्नेह मैत्री आदर यांचा
त्यात सुगंध होता
खरंच ते दिवस 
पाखरांचे पंख लावून आले होते 

दुसरे पर्व जबाबदारीचे होते 
खरेतर डोक्यावर आलेले ते ओझे होते
तरीही त्यात एक उलगडणे होते 
आपण आपल्यालाच पाहणे होते 
स्वत: मर्यादांचे बाहुबल जोखले होते 
पण तरीही ते एक वरवरचे
एकटेपणाचे रूक्ष जगणे होते 
माणसात रमणारे अन् मिसळणारे हे मन
अधिकाराने जखडले होते
म्हणून 
टाकतात ते ओझे वाटले
प्रश्न सुटले आहेत
पण ते तसे घडले नाही 

तिसरे पर्व सुरू झाले 
तेव्हा जगणे नकोसे झाले होते 
जिथे फुले वेचली 
तिथे गोवर्‍या  वेचने नशिबी आले होते 
म्हटले तर चुकलेच होते 
लायकी असूनही स्वतःला नाकारले होते 
मनशांतीसाठी मध्यम मार्गावर 
पाऊल ठेवले होते
पण पदच्युत राजाचे ते
अपमानित मांडलिक जिणे  होते 
बंद करून झाकण प्रज्ञेचे
निरर्थक मान हलवणे होते 
अन् प्रत्येक दिवस हेच एक
ओझे झाले होते 

अखेर बदलाचे शुभ आशीर्वाद
घेऊन आलेला मित्र
शुभशकुनांचा कारणही झाला 
अन् या तीन अंकी नाटकाचा अंत झाला

या तीन पर्वात 
मी काय कमावले 
ते पाहू लागलो तेव्हा दिसले 
माझ्यासोबत फक्त प्रेम उरले आहे
इवलीसी कटुताही विरून गेली आहे 
सहकारी आणि सोबत यांनी 
दिलेल्या स्नेहाचा प्रेमाचा
आधाराचा अन् तृप्तीचा 
एक ठेवा हृदयात उरला आहे 
परफेक्ट कुणीच नसतो
मीही नव्हतो   
तरीही ते एक शुभंकर सहजीवन होते 
कधी पुनवेच्या चांदण्यात भिजणे होते 
कधी अवसेच्या आकाशगंगेत हरवणे होते 
जीवनातील गाठीभेटी सुखदु:खे देणेघेणे
पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात
कधी सुरू होतात 
कधी संपतात 
कुणालाही न कळते
पण हे जगणे सुंदर होते 
एवढे निश्चित !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

आजची नवी



आजची नवी
*********

तुझ्या उधार शब्दांना
काही आधार नव्हता
तू बोलली जरी काही
गंध आसवांचा होता

घेऊन साथ क्षणांची
जगते कोण कशाला
तू सुखा विटूनी का हा
घेतला विषाचा प्याला

क्षण सारेच वेळकाढू
निष्क्रिय निरुद्देश पंगू
जगण्याच्या निरस वाटा
म्हणालीस कुणाला सांगु

आगीविन का जळते
तेजात तमाला स्मरते
घे चुंबन ओठांनी तू
फुल हाती दरवळते

म्हणेल जन जे काही
ते ऐकणेच असते
उतरता रणी कुणी
घाव साहणे असते

दाटल्या कणांचा आवेग
अभ्रां नच मोडवतो
कोसळून शतधारा
अस्तित्व शुन्य तो होतो 

ही जगण्याची रे रीत
तुज सांगाया का हवी
सांडून कालच्या क्षणा
हो पुन्हा आजची नवी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

गुंतू नये


गुंतू नये
*****

एवढे पण गुंतू नये
असे कधी कुणात
की फास होईल बंधन
आपल्याच गळ्यात

जीवनाच्या पैलतीरावर
पोहचता पाय
सांग मागे वळून
पुन्हा जाता येते काय

मनाची ही नगरी
असे विलोभनीय जरी
वर्तमानाच्या आगीत
क्षणात जळून जाते खरी

हा हट्ट बरा नव्हे
उगा धावणे अंधारात
हा उतार ही वाट ,
जाते खोल डोहात

सावर ग सांभाळ सखी
कळ जप काळजात
रमुनिया जाई तुझ्या
उबदार घरट्यात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

दत्त कृपा


दत्त कृपा

दत्त कृपेची साऊली 
दत्त मायेची माऊली 
दत्त नयनी भरली 
मज करूणा दिसली 

दत्त जिवांचा विसावा 
दत्त शांतीचा पुतळा 
दत्त भक्त मनावर 
मेघ कोसळे सावळा 

दत्त मायाळू कठोर 
नीट नेई पथावर 
घेई प्रेमाने जवळ 
कोडे सोडवी दुस्तर 

एका दत्ताला स्मरावे 
जीणे तयास वहावे
धन मान यशाचे का 
उगा देव्हारे माजावे 

विक्रांत दत्ताला शरण 
जाणे जन्माचे कारण 
दत्त प्रेमाने मिळते 
दत्ता प्रेमाचे अंगण 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...