मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

दत्त आमुचा



|| दत्त आमुचा ||

दत्त आमुचा
आम्ही दत्ताचे
जन्मोजन्मीचे
दास झालो ||

वाहियला देह
तया पायावर
मनाचा आधार
तोडोनिया ॥

सरले भरणे
रिते पुन्हा होणे 
आम्हास मरणे
नाही आता ॥

आता न कसली
चिंता ती आम्हाला
भेटला भेटला
कल्पतरू ||

झालो जलबिंदू
तुडुंब सागर
सगुण साकार
दत्त प्रेमे ॥

विक्रांत निमाला
जन्मास आला
दत्ताने घेतला
पदावरी ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बाबासाहेब आंबेडकर नावाची कविता



बाबासाहेब आंबेडकर नावाची कविता

इतिहासाच्या पानावर
लिहिल्या गेल्या आहेत
असंख्य कविता .
करुणेने ओथंबलेल्या
गायले गेले आहेत
असंख्य पोवाडे
शौर्याने फुरफुरणारे
अगणित युद्ध गीते
क्रौर्याने भिजलेली
रक्तात साकळलेली
आणि किती एक
ती कारुण्य गीते
हृदय पिळवटून टाकणारी
बलिदानाने हळहळणारी

पण तुझी कविता
सगळ्यात वेगळी आहे
तुझी कविता तुझ्या
जगण्यातून उमटली आहे
तुझी कविता माणुसकीच्या
पुनर्उत्थानाचे गीत आहे
त्याच्या शब्दा शब्दात आहे
गिळलेल्या अपमानाचा अंगार
त्याच्या मुळाशी आहेत
पिढ्यान पिढी दडपलेले हुंकार
तुझ्या कवितेने सांगितले जगाला
माणूस कशाला म्हणतात
जगणे काय असते
आणि जगण्यापेक्षा श्रेष्ठ
काहीही नसते
तुझी कविता जीवनाचे गाणे आहे
म्हणूनच
तुझी कविता गातो आहे मी
तुझी कविता जगतो आहे मी
जन्माने कोणीही मोठा नसतो
आपणच आपल्या जीवनाचे
सूत्रधार असतो शिल्पकार ठरतो
याचे आत्मभान आणून देणारी
लाचारी नाकारून
आत्मग्लानीच्या दलदलीतून
बाहेर काढणारी तुझी कविता
ही मी वाचलेली
एक सर्वश्रेष्ठ कविता आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

विरहण



उकळले रक्त 
थरारले प्राण 
मरणाचे भान 
दूर गेले

क्षणात कोंदले 
स्पर्शात थिजले 
जाणीवेचे ओले 
देह गाणं ॥
पुन्हा वादळाचे 
स्वप्न पहाटेचे 
उजव्या कुशीचे 
चाळविले ॥
पोथीतल्या वाटा 
आटल्या डोळ्यात 
कळ काळजात 
उमटली ॥

वाट विरहण
थांबे ओठंगून 
चाकोरी वाहून 
नेई तिला ॥
उधळतो फुले 
वृक्ष बहरून
वळण जपून
हृदयात ॥
द्यावे ओवाळून 
वाटते जीवन 
ठेविती बांधून 
मुळे खोल ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

दत्त ध्यास




दत्त ध्यास
*********

देउनी सुखांना
जणू गांजविसी
नकोस मजसी
खेळणीही ॥

दावूनी दुःखांना
कधी भिवविसी
चित्तास भ्रमसी
उगा देवा ॥

आता मी उदास
टाकूनी साऱ्याच
धरे तुझी आस
रात्रंदिनी ॥

देणे तर द्यावे
तुझे प्रेम सुख
काही न अाणिक
मागतो मी ॥

विक्रांत जनास
सांगतो मनास
दत्ता विना ध्यास
धरू नको ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

सगुण निर्गुण



सगुण निर्गुण

जेव्हा तू जात होतीस
आकाश रिते करून
बंद करुनी पाने मने
गेली अंधारात विरून

तसा तर लखलखणारा
उजेड आतमध्ये होता
उर्जेचा गहन प्रवाह तो  
कणोकणी वाहत होता

पण डोळ्यांचा हट्ट वेडा
जीवनास जड होत होता
तिमिर कल्लोळात भान
अन अंधार उशाला होता

येणे तुझ्या हाती नव्हते
अन जाणे ते ही कधी  
अर्था वाचून अर्थ घटला
आला पसाय घेवून हाती

त्या भरजरी क्षणांना मी
ठेविले मग मनात गोंदून
मिट्ट काळोखात ध्यान
गेले लख्ख प्रकाशी बुडून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

सृजन



सृजन
******
हा सृजनाचा
शाप तनाला
शाप मनाला
का जीवाच्या ॥

अमरत्वाचे
खूळ लागले
विश्व जाहले
रतीरत ॥

मेलो तरी मी
उरणाऱच ना
राहणाऱच ना
वंश माझा ॥

दिसल्या वाचून
आत लागली
कुणा न कळली
कळ अशी ॥

आणि तमाशा
बघत हसतो
जग जो रचतो
रचनाकार

जगता वाचुनी
तोही कुठला
म्हणूनही मांडला
का हा खेळ ?


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

दत्त शोध

दत्त शोध 
*******

माझ्या जीवाला 
वेड लावून 
गेला ठकवून
दत्तराज ॥

शोधून तयाला 
बहुत थकलो
उदास जाहलो 
अंतरी मी 

वाटते शोधाचा 
अंत या होऊनी 
जावे उजळुनी 
जीवन हे ॥

याहून असता 
अाणिक मागणे
जळोन जगणे 
जावो माझे ॥

दत्त माऊली
कृपा करूनी
घेई उचलूनी
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...