मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

*बालगणेश *




*बालगणेश *

मंदाराच्या बुंध्यावर
कोण बाई बसला ग
गणपती पार्वतीचा
सांगा कुणा दिसला ग

गोल मोठे पोट तरी
पोर किती चपळ ग
मोदकाची पुरचुंडी
घेऊनिया चढला ग

सोबतीला इटुकला
मूषकराज आला ग
गुळखोबरे खावूनी
सेवेलागी सजला ग

पाय हालवी जोराने
वृक्ष दुमदुमला ग
वारा घालीत कानाने
करितो दाणादाण ग

गज ध्वनी करुनिया
मित्रा करी व्याकूळ ग
उतरुनी तया मग
भरवी गोड खाऊ ग

हसूनिया पार्वती त्या  
घेई प्रेमे जवळ ग
कौतुकाने देखे देव
आनंदाचा सुकाळ ग


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http;//kavitesathikavita.blogspot.in



सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

देह पसारा



मातीच्या देहाला जपावे किती
मातीस मिळणे मातीला अंती

चार पाच सहा दशके जीणे
इथले गणित सदैव उणे

आधि व्याधि कधी प्रारब्ध आड
वाढते आणिक मरते झाड

जग रे मानसा मरेस्तोवर
नाव गाव टिंब नसे नंतर

विक्रांत सोड रे व्यर्थ पसारा
आता तरी आत फिरे माघारा 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

माघारी




तू सांगू नकोस काही
तू पाहू नकोस काही
मौन असण्यात तुझ्या
गीत उमलून येई

वळे बाजूस दुसऱ्या
देत केसास झटका
शब्द ठरले तरीही
मौन थबकून ओठा

असे तुटक वागणे
लांब लांबच राहणे
तुज जमतात कसे
हे जीवघेणे बहाणे

चार दिसांची भरती
चार दिसांची ओहटी
म्हणू नकोस असते
हीच जगाची रहाटी

मन उताविळ जरी
सीमा बांधल्या सागरी
घालमेलीच्या वादळी
लाटा जातात माघारी

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

दारावरी कुणाच्या.



दारात कुणाच्या.


दारावरी कुणाच्या मी
अजूनी भिकारी आहे
कणभर दानासाठी
हि किती लाचारी आहे ॥
अन तो दाता उदासिन
फिरतो माघारी आहे
रिती झोळी हेच माझे
भाग्य भाळावर आहे ॥
दरवळे गंध कुठे
हास्य भरजरी आहे
निर्लज्जशी आशा माझी
सदोदित दारी आहे .॥
मरुनियां मन गेले
तरी ओझे शिरी आहे
अभिमान ठेचलेला
कण्हतोय उरी आहे ॥
द्यायचे नसून तुज
होय ओठावरी आहे
का भिती यायची  तुज
सांग रस्त्यांवरी आहे ॥


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे (कवितेसाठी कविता)

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

भिंत

भिंत
******

मला माहित आहे
तू कधीच जगू शकणार नाही
स्वतःसाठी अन्
स्वतःच्या सुखासाठी .

किती अवघडलेली तू
जगाने बांधलेली तू
खुळया मर्यादांचे
लोढणे गळ्यात बांधून
ठेचाळत चालणारी तू
आपल्या चांगुलपणाची
प्रतिमा सांभाळत
अपकीर्तीचे शिंतोडे
अंगावर उडू नये
म्हणून काळजी घेत
सारे मोहर जळून देतेस
दारी आलेला वसंत नाकारत

हे खरे आहे म्हणा की
भिंतीेएवढी सुरक्षितता
या जगात आणखी कुठेही नसते
पण खरंच सांगतो
कदाचित तुला माहित नसेल
या भिंती तुच बांधलेल्या आहेस
आणि हळूहळू तुच एक
भिंत झालेली आहेस
भिंतीचे प्रयोजन संपूनही

http://kavitesathikavita.blogspot.in
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

अवधुत पंथ


अवधुत पंथ

धरिला मी सखी 
अवधूत पथ 
लोकलाज रीत 
गेली माझी ॥
आता मी भिकारी 
महासुख राशी 
झाले वेडीपिशी 
आनंदाने ॥
नको मज मठ 
महाल मंदिर 
देव दिगंबर
आहे माझा ॥
नसे माझ्या मनी 
सुखाची ती आशा 
देहाची  दुराशा 
गोड वाटे ॥ 
जाते दारोदारी 
घेऊन कटोरी 
दत्ताच्या गजरी 
हर्ष होय ॥
मिटताच  डोळे 
प्रकाश लाघव  
सुखाचे अर्णव  
पापण्यात ॥
ऐकते हृदयी 
दत्त दत्त नाद 
भाग्याची वरद 
प्रिय झाले ॥
विक्रांत अंतरी 
सुखांचे वादळ 
सरले समुळ  
जन्म काज ॥

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोने 

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

शोधणे माझे


शोधणे माझे
**********

लागली आच
शब्दांनी माय
वाचविण्याचे
सरले उपाय

आता लपवू
कुठे स्वत:ला
सारा शून्याचा
सुटे गुंडाळा

धावतो अहं
जरी कासावीस
जमीन उरली
नाही पायास

वाजतो चाबूक
वळ न उमटे
मिटता डोळे
लख्ख दिसते

शोधता काही
हरवून गेले
शोधणे माझे
मीच पहिले

पेटता जाणीव
अंगण भरले
माझे मी पण
माझ्यात वेगळे

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot,in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...