बुधवार, २६ जुलै, २०१७

तेव्हा ही पाऊस होता




तेव्हा ही पाऊस होता
***************

तू मला भेटलीस पहिल्यांदा
तेव्हा ही पाऊस होता
तुझ्या माझ्यातला द्वैताचा
पडदा मिटला
तेव्हाही पाऊस होता
बाळाची चाहूल लागली जेव्हा
पाऊस किती दाटून आला होता
आणि बाळाच्या खिदळण्यात
पाऊस ही निनादात होता

किती गंमत वाटते 
जणू जीवनातील प्रत्येक पर्वात
तो सदैव साथ करीत होता  
बदली, प्रोमोशन, घर बदलणं
मुलांचे अॅडमिशन
सगळे यायचे ठरवून
पावसाळ्याचा मुहूर्त पाहून

आणि जेव्हा तुटली तावदान
दुराव्याचे निमित्त होवून
तेव्हाही पाऊस होता
आणि तेव्हापासून
काहीही झाले तरीही
पाऊस पडतच नाही
का काही घडतच नाही
कुणास ठावूक

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २३ जुलै, २०१७

रस्ता झाड आणि मृत्यू




रस्ता झाड आणि मृत्यू 

सहज चालता पथावर
दोन पावलावर मृत्यू होता
जो कुणास ठावुक नव्हता
सारे संपले एका क्षणात
झाड कोसळले सवे देहलता  
ती तिथे त्या घडीला
अशी नकळे आली का ?
अन ते झाड जीर्ण झाले
तेव्हाच असे कोसळले का ?

दोन क्षणांचा होता उशीर
तर कदाचित  
टळला असता तो मृत्यू
दोन दिवस जर अगोदर
तोडले असते ते झाड
तर कदाचित
घडला नसता तो मृत्यू  

जरतरचे असे आरोप
उगाच कुणावरती करूनी
ती पोकळी अस्तित्वाची
येणार नाही कधीच भरूनी
पराधीनता सर्वव्यापी
झाली साकार पुन्हा एकदा
क्षण भंगुरता या देहाची
जीवन अन जगण्याची
आली समोर पुन्हा एकदा

आणि कदाचित
आज उद्या कधीतरी ही
असेच होइल माझेही काही
मनात शंका येई नकोशी
हतबलता अन क्षुद्रपणाची
मानवाच्या लाचारीची
मना मनातून जाई लहरत
थंड शिरशिरी देही उमटत


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २२ जुलै, २०१७

पाऊस वगैरे छान असतो !




पाऊस वगैरे छान असतो !


ठीक आहे यार
पाऊस वगैरे छान असतो
धुव्वाधार पडतो
खूप मजा आणतो
सगळीकडे हिरवे गार होते
जीवनाचे नवे दार उघडते  
नाही म्हणजे
मलाही आवडतो पाऊस
त्याचे नखरे
त्याच्या साऱ्या रुपासह
पण..
जोवर माझ्या मनातला
हा कोपरा भिजत नाही
तोवर कशालाच अर्थ नाही
तसे तर मी लाख यत्न केले
छातीवर वादळाचे
झोत झेलून घेतले
नखशिखात भिजलो
इमारतीच्या गच्चीवर
एकटाच.. 
कित्येक तास..
पण आतली माती
चक्क कोरडीच होती
रात्रभर झोप न लागलेल्या
टक्क डोळ्यासारखी
मला खरच कळत नाही
मी विरघळून का जात नाही ?

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




शुक्रवार, २१ जुलै, २०१७

तो म्हातारा माझा बाप



तो म्हातारा
माझा बाप
पाठीवरी
देत थाप

चाल म्हणें
मज चाल
एक्या जागी
मांडी घाल

नाभीतून
शब्द यावा
पण कुणी
न ऐकावा

लाख सूर्य
तारे जळोत
सप्त सिंधू
अन वाळोत

जागेहून
चळू नको
घाबरून
पळू नको

अंतरात
खोल खोल
जाणिवेचे
असे फुल

त्याचा गंध
ये घेवून
मी पणाला
दे टाकून

तू माझ्यात
पहा तुला
नि सोडूनी
देई मला

आणिक तो
हास हासला
जाग आणत
क्षितिजाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २० जुलै, २०१७

प्रकाशाची आभा



प्रकाशाची आभा
************

तू प्रकाशाची आभा होवून हसतेस जेव्हा
मी तारकांच्या जगात होतो आकाश तेव्हा

तू खळखळता झरा तू आकाशीचा वारा
मी होवून पाचोळा म्हणतो सांभाळ जरा

तुझे मुक्त वाहत जाणे रूप सरिता होणे
मी तरतो तुझ्यात तुझे होवूनिया जगणे

तू फुल ग चाफ्याचे मदिर मधुर गंधाचे
दरवळती मनात क्षण तुझ्या सोबतीचे

तू हृदयी सजले गाणे धुंद संगीत तराणे
जणू मनात जागले स्वप्न रेखीव देखणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १८ जुलै, २०१७

पाप असे का पुण्य ?





पाप असे का पुण्य ?

पाप असे का पुण्य ते सारे 
सोड असले प्रश्न खुळे रे
घेवून गंध श्वास भर रे
मग आनंदे मस्त जग रे |

फुल कुणाचे प्रश्न असले
सांग कश्यास तुज पडले
रंग देखणे मनी भरले
स्पर्श हळवे तृप्त जाहले

ओठावरती पाऊस पडता
थेंब इवला अमृत होतो  
रान हिरवे हाक मारता
जन्म मरणातून सुटतो  

शब्द सजती भाव बोलती
नाती जुळती मनी सजती
ओंजळीत या सुख भरती
दे उधळूनी तू त्या जगती

ऐक मनाचे अडल्याविना
जा ओलांडून या दुनियेला
गंध येवू दे तव गाण्याला
कृष्ण भेटतो मग राधेला

पाप अथवा पुण्य नसते
क्षणात जिणे घटते मिटते
त्याच क्षणाला घेरे जगुनी
रे असण्याचे सार्थक होते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, १६ जुलै, २०१७

अद्वैतला भार न व्हावे




अद्वैतला भार न व्हावे
 ******************

तुझ्यामधले माझेपण
मजला मागे तुझेपण
तुझ्यातल्या माझेपणावर
गेलो असा की मी भाळून
तुझेपण ते देही मिरवून
चंद्र घेतला मनी गोंदून
पण विरहाची आग मिटेना
आषाढीही मन भिजेना
का रे असा हा जीव लावला  
पाऱ्या मधला तूच तुला
कुणी मिटावे जरी ना ठावे
अद्वैतला भार न व्हावे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
  



महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...