शनिवार, १५ जुलै, २०१७

उध्वस्त पहाट..




उध्वस्त पहाट..
***********

तुझ्या दुःखाचे अंगण
सुख मागते अजून
रोप लावली हौसेने
जाती पाचोळा होवून

का ग भोगातेस अशी
व्यथा उजाड रानाची
मनी उभारली गोड
स्वप्ने मुग्ध श्रावणाची

गंध भरता श्वासात
प्राण वेडावती खुळे
याद शोधते अजून
खोल पाताळात मुळे

जीव जगतो एकटा
फांदी जखडल्या गाठी
मुठ रिकामी तरीही
गोष्टी जपल्यात किती

कुणी वेल्हाळ पाखरू
वाट चुकून भेटते
त्याला घरट्याची उब
दूर घेवुनिया जाते

मग निष्पर्ण डोलारा
रात्र राहतो मोजत
अन उजाडते पुन्हा
तीच उध्वस्त पहाट

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, १३ जुलै, २०१७

मिटो प्रश्न



जाळे प्रतीक्षा मनात 
वर्ष जातात उदास  
शीळ गोठली ओठात
साद घालता कुणास

भेटीगाठीत इथल्या
व्यथा होत्याच ठरल्या
क्षणी उघड्या पडल्या
का रे खुणा मनातल्या

सुखे जाळणारी व्यथा
कधी भेटते कुणास   
हर्ष जळूनी कोवळा
जन्म होतोच भकास  

हास्य मुखवटे जुने
तरी मिरविणे जनी
कुणा पडतो फरक
लाखो गेलेत मरुनी 

तडजोडीत कालच्या
दिन आजचा बुडाला
प्रश्न प्रकाश वाटेचा
पोटी रातीच्या दडला

जन्म मरण चरक  
क्षण क्षण घे पिळून
आस आतली कोरडी
तुट तुटते पिंजून

आता होवु दे रे अंत
अश्या निरर्थ खेळाचा
शून्यी पहुडून मन
मिटो प्रश्न अस्तित्वाचा  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, ७ जुलै, २०१७

|| विठू दादा ||



भीमेचीया तटा
उभा विठू दादा
रोवूनिया पदा
युगे युगे ||
काळाला करडा
असे त्याचा धाक
पाप वाहे भाक
दूर पळे ||
दु:खात सावूली
धरे डोईवरी
कर्तव्य कसुरी
नावडे त्या  ||
हसतो खेळतो
संगतीने येतो
जीवनाला देतो
अर्थ गोड ||
हाती नसे चक्र
अथवा की गदा
प्रेमाने सर्वदा
मार्ग दावी ||
कृपाळू दयाळू
सदा लोकपाळू
होई कनवाळू
प्रियजना ||
विक्रांत जाणला
हृदयी धरिला
म्हणुनी कळला
काही पथ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, ४ जुलै, २०१७

|| हसे अवधूत होवून सावळा ||




|| हसे अवधूत होवून सावळा ||


श्वासात पाहिला
नामात ठेवला  
समोर ठाकला
नाही कधी ||

पंढरी येवूनी
राऊळी धुंडीला
परी न दिसला
मज कधी ||

भाळलो भक्तांना
भावना कल्लोळा
म्हणुनी दाराला
आलो कधी ||

का रे जीवलग
नच तू जाहला
भक्तीचा कळला
डंख कधी ||

खंतावे विक्रांत
येवून जन्माला   
माहेरी रमला
नाही कधी ||

हसे अवधूत
अंतरी बसला  
होवून सावळा
मग कधी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, ३ जुलै, २०१७

नको दिगंबरा




स्वप्न दुनियेची  
जातात उडून
हाती आल्यावीण
काळ ओघी ||

कधी आकाशाचे
कधी या मातीचे
परंतु अभ्राचे
गाव सारे ||

अडके आकडा
जणू काळजात
दुखाचा संघात
तैसा असे ||

कोण तो दयाळू
मांडे ऐसा डाव
शोधुनिया ठाव
लागेचिना ||

जीवा फरफट 
मोह सापळ्यात
व्यथेचे गणित
सुटेचिना ||

नको दिगंबरा
जपणे ठेवणे
भुली या पडणे
गोरीयाच्या ||

सरो साचलेले
गाठी मारलेले
जीवा बांधियले
रज्जू दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, १ जुलै, २०१७

उगा येई सय कधी




तिचे डोळे रोखलेले
काळजात घुसलेले
दुखणारे काटे मनी
अजुनी न काढलेले

तिचे चित्र भेटलेले
गुपचूप ठेवलेले
वर्ष उलटून गेली
तरी आत जपलेले

तुटलेले पूल जुने
अन पथ मोडलेले
गुलजार वळण ते
तिथे मन थांबलेले

येणे जाणे नाही आता     
पाहणे व भेटणे ही
उगा येई सय कधी
डोळे ओले अन होई

लाख मना म्हटले मी
विसर ते पुरे झाले
वेडे वारे तरी असे
वेळू वनी गुंतलेले

जीवनाची चाल जुनी
सागरात नांगरणी
अवधूत तुफानात
टिकायला हवे कुणी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, ३० जून, २०१७

दत्त आत्मतत्व *




दत्त आत्मतत्व
*************


दत्त आत्मतत्व
असे हृदयस्थ
जरी सदोदित
साक्षी रूप ||

परी आठवण
ठेवू जाता मन
वाहून स्मरण
जाय दुरी ||

अजुनी स्वरूपी
मन चिटकेना
हजार कामना
वाहुटळी  ||

घडे धावाधाव
होई उठाठेव
मायेचे लाघव
संपेचिना ||

परी धरीयाला
तव हात दत्ता
म्हणूनि विक्रांता  
आशा काही   ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...