शनिवार, १५ एप्रिल, २०१७

एकांत



एकांत
*******
एकाचा जिथे अंत होतो
तो एकांत
जिथे नुसते निखळ अस्तित्व उरते
तो एकांत
बाकी मनाला शांत वाटते
निसर्गाचे सुख मिळते
प्रिया येवून भेटते
प्रेम शृंगार धीट होते
वगैरे वागिरे व्याख्या म्हणजे
एकांताला चिटकवलेले
मूर्खवत मुखवटे आहेत
दुसरा कुणीही नकोसा वाटणे
हा त्या मितीत होणारा प्रवेश आहे
असा एकांत उदय व्हायला
जंगलाची गरज नसते
ना गुहेची ना मठाची
मुमुक्षुत्वाची परिणीती
परमसीमा गाठते
प्रभूप्रेमाची चुणूक मनाला मिळते
आत्मप्रेम जेव्हा जागृत होते
तेव्हा ती स्थिती आपोआप उमटते
ती आणता येत नाही मित्रांनो  !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

निळूल्या ज्योतीचा



निळूल्या ज्योतीचा | निळूला प्रकाश|
भरले आकाश | अंतरीचे ||१ ||

तुवा दिले दान | सरले अज्ञान |
दु:खाचे प्रांगण | आक्रसले ||२ ||

अजुनी तरीही | आहे काही सल |
मनात शेवाळ | द्वेषाचे त्या ||३ ||

आपुलेच परी | किती दुरवरी |
तुटले अंतरी | आप्तजन ||४ ||

तुवा देवपण | देते जन मन |
सहिष्णुतेवीन | दिसे मज  ||५ ||

विक्रांत हा अज्ञ |पायी ठेवी माथा |
दिसो काही वाटा |बंधुत्वाच्या ||६ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

प्रवासी






एकटा चाले प्रवासी
स्वप्न राहिलेले दूर
माथ्यावरी ओझे अन
डोळी दाटले काहूर


सोडले जीवलग ज्या
भेटेल का तो प्रियकर
गाठण्या आधीच किंवा 

दाटून येईल अंधार

संध्याछाया भोवताली
नयनी दाटला पूर
व्यापूनी ह्रदयी आग
प्राण जाहले अधीर 


थकले हे तनमन
फुटूनिया गेला  उर
मिटती डोळे निजतो
फक्त तू  कृपा पांघर



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

हसायचे होते





हसायचे होते  

फार काही नाही मज
फक्त हसायचे होते  
हेच वेड पण मला
रडावया पुरे होते  

साथ शोधावया गेलो
सोडणे नशिबी आले  
कुणी साथी नाही तर
दु:ख हेच दोस्त झाले

आता तर जीवनाला
मी ही विसरून गेलो
सरतात दिस कसे
निर्जीवात जमा झालो

कळेना प्रिय कुणास
दु:ख माझे होत आहे
दूरच्या त्या तारकांत
मन हरवत आहे

चालतो आहेच इथे  
छिन्नभिन्न स्वप्न जरी
निसटून मिठीतून
गेले आहे कुणीतरी

कळेना चाहूल कुणाची
जळते काय अंतरी  
हसतेय कोण इथे
काळ ओठात जहरी

(हँसने की चाह ने वर बेतलेली कविता )



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, १० एप्रिल, २०१७

दत्ता उतराई कसा होवू


दत्ता उतराई
कसा होवू तुझा
आले काही काजा
जीवन हे ||१||

केल्याविन काही
होत जरी नाही
करणे तू तेही  
झाला माझा ||२||

केली सारी आशा
तुझी जीवनात
भोगात लोभात
लिप्त जरी ||३||

एवढेच पुण्य
असे काही गाठी
झाला तयासाठी
दाता प्रभू ||४||

प्रभू जी भरलो
जीवन पातलो
किरण जाहलो
प्रकाशाचा ||५||

उरले नाटक
विक्रांत ओढतो
दत्ता विचारतो
ठीक ना रे ||६||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


रविवार, ९ एप्रिल, २०१७

खेळ मजेचा




जोवर कुणी भेटत नाही
गळा पाचर मारत नाही
तोवर शब्द भरून देत
फुगा लगेच फुटत नाही

आंधळ्याचे स्वप्न जसे की
कधी कुणास कळत नाही
स्पर्शा मधले डोळे त्याचे
अर्थ शब्दात मांडत नाही

रे लाख आम्ही जगलो इथे
जगणे त्यास म्हणत नाही
किती उलटून दिन गेले
स्मरण चित्रे पुसत नाही

नवा सदरा घातला तरी
देह कधी बदलत नाही
रंगाच्या थरात बुडूनही
रंग आतला लपत नाही

बघ विक्रांत खेळ मजेचा
दुनिया ज्यास विटत नाही
मन हे कारावास असूनी 
बंदिवाना उमजत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ८ एप्रिल, २०१७

जोडीयला दत्तराये ||




जैसे जीवनाचे
हाती आले माप
पुण्य पाप ताप
स्वीकारले ||१

ठेविल्या बांधून
भावना कामना
निराश कामना
भगव्याची ||२

पेटवून प्राण
करी घुसळण
घडो ते घडणं
याची डोळा ||३

मनाचे अंगण
दिले मी सोडून
पाहतो बसून
येरझार ||४

विक्रांत फुटला
शतखंड झाला
पुन्हा जोडीयला
दत्तराये ||५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...