शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

गूढध्वनी




माझिया ओठात 
शब्द फुलतात 
आपुल्या नादात 
आपोआप ।।१
ज्ञानोबा तुकोबा 
गुज वदतात 
कानी सांगतात 
गूढध्वनी।।२
तयांचे उच्छिष्ट
मज महाभोग
सरे भवरोग
सहजची ।।३
नच शब्दासाठी 
थांबत मी कधी 
व्यर्थ उचापती 
करीत गा।।४ 
वृत्त मात्रा छंद
वाहून जातात
अनावर होतात
भाव जेव्हा ।।५ 
विक्रांता आवडे 
शब्दांचा पसारा 
मोकळा भरारा 
रान वारा ।।६ 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

आणखी एक संध्याकाळ ....





दूरवर हलकेच घरंगळत जाणारा सूर्य
लाटांचे अव्याहत जनन आणि मरण
धूसर प्रकाश उदास केशरी रंग अन
जागेवरच पाण्याचे पुढे मागे वाहणं


या किनारावर अगणित तरुण युग्म
येतात क्षण प्रणयात हरवतात जातात  
किती निरर्थक आणि किती क्षणिक
तरीही वाळूवर नाव कोरत राहतात  


मिलनेच्छेवर पांघरलेले प्रेमाचे कापड
अस्तित्वाच्या प्रेतावर हळूच टाकतात  
तीच सनातन चाहूल मावळतीची  
देखाव्यात चित्कारात बुडवू पाहतात


अन त्याच्या डोळ्यात दाटून येते काहूर
शून्यात हरवतो मंद खर्जातला सूर
गिळणारा अंधार कणाकणात व्यापून
जाणीवेत दाटतो आर्त प्रार्थनेचा पूर


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने  
http://kavitesathikavita.blogspot.in




बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

दत्त चाकरी



काही माझे न्यून दत्ता घे साहून
पदरी ठेवून चाकरला ||
करतो आळस बसतो उदास
निरर्थात रस घेतो कधी ||
पडूनिया भुली विसरतो काम
घेणे तुझे नाम संगितले
मनाच्या संगती करे नशापाणी
राखण सांडूनी जाणिवेची ||        
बोलविल्याविन घेतले वाहूनी
जगाते पाहुनी अर्थहीन  ||
पायाची शपथ वाहतो विक्रांत
मज हवा फक्त तूच दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in

                                                                                                                                           

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

निरुपाय जगण्याचे वाहतांना कलेवर




निरुपाय जगण्याचे वाहतांना कलेवर
माणूस चढवतो स्वप्नवेल काळावर

हताशा निराशा यांनी हात बांधलेले
माणूस चढवतो दिवास्वप्न डोळ्यावर

कुठे तरी जगाच्या ओसाड कोपऱ्यात
चाचपडते अस्तित्व अहंच्या कड्यावर

आज काय उद्या काय जरी न ठावे
हिशोबी जमाखर्च नि बांधतो उरावर

नाहीच कुठे काय सापडले तया तर
पारायणी पोथी ती पुन्हा येतेच बाहेर

असे स्वप्न शेवटी डोळ्यात उजेडाचे
नाकारतो अंधार ठाम दाटला सभोवार  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

जन्म जाहला पुन्हा विरागी




घट्ट वाटा हळवी वळणे
क्षितिजावरती काही स्वप्ने  
हातात हात होते झुलणे
वाऱ्यावरती मुग्ध जगणे
================
जाणून तुला न जाणतो मी
पाहून तुला न पाहतो मी
एक मितीच अनाकलनीय
माझ्यातच जणू जगतो मी
================= 
कोण धावले मोही कुठल्या
कोण रंगले रंगी कुठल्या
कुणा सावल्या निळ्या डसल्या 
प्राणा मधल्या तृष्णा निजल्या 
==================
कुणास शिवले अहं उरगी
कुणी भाळले गंध सुरंगी  
कधी करुणा होवून जागी 
जन्म जाहला पुन्हा विरागी 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

गुरुपदी होता भेटी






गुरुपदी होता भेटी
पुन्हा मागे फिरू नको
जीव देई तया दारी
पायरी ती सोडू नको

हजार बसो ठोकरा
माथा फुटो पुन:पुन्हा
जन्म लावूनी पणाला
करी सार्थक जीवना

सापडता श्रेय तुज
दवडू नकोस तयाला
मानपान रितीभाती
ठोकर मार जगाला

तिथे चुकता चुकीने
व्यर्थ जाईल रे जिणे
जन्म मृत्यूत धावणे  
प्रारब्धी केविलवाणे

हेच माझे सारे काही
पटो हृदयाची ग्वाही
मिळो संजीवनी जीवा
अन्य कुठे जाणे नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

काही वेदना

वेदना
*****
या डॉक्टरी पेशात
मी पहिल्यात
असंख्य वेदना
तरीही प्रत्येक वेळी
मला दिसली
तेवढीच धारधार
प्रत्येक वेदना
मी पाहिली
देहाच्या वेदनेने
तडफडणारी माणसे
ठेचाळलेली रक्ताळलेली
थरथरणारी माणसे
घट्ट पोट धरून
डोके आवळून
विव्हळणारी माणसे 
आणि एखाद्या वोवेरान
एखाद्या बस्कोपेन
वा एखाद्या पँनफोर्टीने
स्वस्थ होणारी माणसे 
कृतज्ञतेने हसणारी
धन्यवाद देणारी माणसे
वेदनेचे परीहारीत होणारे हे रूप
देते एक अर्थ माझ्या जीवनाला .....
कधी पाहीलीत मी
जीवलगांच्या जाण्याने
साऱ्या विश्वाची वेदना
डोळ्यात भरून
काळीज फाटणारा
आक्रोश करणारी माणसे
या जगाची अन जगण्याची
सारी गणिते क्षणात
चोळामोळा करणारी ती वेदना
तिचा इलाज
तिचा उतारा
मला कधीच भेटला नाही
त्या असंख्य अनाम
आक्रोशांनी अन वेदेनेनी
भरलेले माझे हृदय
मी नेवून बुडवले
कधी संगीतात
कधी सुखभोगात
कधी ग्रंथात संतचरित्रात
तर कधी मंत्र पठणात
अगदी वेदांतात
अन उपनिषदातही
तरीही ती वेदना तशीच आहे
अविचल कोरडी सनातन ...
कधी मी पहिले कुणाला
कित्येक प्रहर कळा सोसतांना
तन मन पिळवटून निघतांना
जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर
स्वत:ला लोटतांना
कुशीतील चैतन्य
जीवनात सोडतांना
अन वेदनेला आलेले फुल
अलगद वेचतांना
पाहिले एक अपूर्व समाधान
डोळ्यात ओघळतांना
अगदी कडेलोट होवूनही
वेदना अशी हसतांना ...
***
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...