शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

माझे शोधणे मजला भेटले








लागली आग त्या शब्दांनी माय
वाचण्याचे नि सरले उपाय
आता मी लपवू कुठे स्वत:ला
साऱ्या शून्याचा सुटला गुंडाळा
धावतो अहं जरी कासावीस
जमीन उरली नाही पायास
वाजती चाबूक वळ न उमटे
मिटताच डोळे लख्ख दिसते
पेटे जाणीव अंगण भरते
माझे मीपण मलाच पुसते
शोधता काही हरवून गेले
माझे शोधणे मजला कळले

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने









शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

मी उंचावर




मी उंचावर
मुकुट शिरावर
परी एकटा ।
..
कुणा क्वचित
हे मिळते वांछित
परी शापित ।
...  

अरे उठू दे
ते गीत मनातून
माझ्यावाचून ।
.....

तीच तहान
रे जन्मांतरीची
कृष्ण घनाची ।
.....

व्याकुळ आस
कधी कळेल त्यास
निशब्द टोहो ।
.....

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

काही हायकू




 



चंद्र कोवळे
मन थरथरले
त्या अवसेला
 
फांदीवरचा
उगा पक्षी उडता
झाली कविता ....

फुल म्हणाले
मी उमलून आले
जग जिंकले

मन कळता
हे जगणे सरले 
मृत्यू व्यापले

दुख भरले
आकाश दाटलेले
वर्षा होईना

मन पाहीले
मी मीपण सरले 
देव जाहले

झोक्या वरुनी
सुख नभात गेले  
फांदीस सले 

तोही सखीचा
होता एक बहाणा
येणे न पुन्हा

सुख घरात
अडखळे दारात  
उंच उंबरा 

१०
भक्त भरला
जगात मिरवला
भक्त नुरला

11
हिरवे पाणी
घनगर्द साठले
भय थिजले

१२
एक पाकळी
हळूच ओघळली
वादळ झाली

१३
सरली गाणी
यमुनेत बुडाली
माठ फुटली

१४
आता म्हणू मी
माझे इथे कुणाला  
ऋतू जळला

१५ .
देहाचे ओझे
या होय धरणीला
जातो लयाला

१६
नकाच शोधू
कधी मी माझ्यातला
म्हणती मेला

१७  
पापण्यात तू
डोळा भरले पाणी
जाय सांडूनी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...