बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

सजविला देव







सजविला देव
बुडविला देव
केली उठाठेव
धनबळे ||
ओरड आरत्या
वाजविल्या झांजा
केला गाजावाजा
मंडपाचा ||
भाकड भावाचा
आळविलासूर 
दान भरपूर
गोळा केले ||
कुठल्या गणाचा
देवा तू रे पती
सोंग हे नाचती
बुणग्यांची ||
विक्रांत एकटा
कोंडला घरात
गुलाल दारात
खच पडे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

ढुंकून गेलो बरं...



(आज सहज खूप महिन्यांनी एका जुन्या  ग्रुपवर गेलो तेव्हा तिथे सुचलेली कविता.)



येवून गेलो बरं मी
तुमच्या कुणीही
ढुंकून न पाहिलेल्या
कवितात
ढुंकून गेलो बरं...

आता ढुंकल्याची गोष्ट
सांगण्या सारखी नाही
हे माहित आहे मला
पण न ढुंकल्याचे दु:ख
काय असते हे ही
माहित आहे मला
म्हणून लिहून गेलो ...

खरतर कविता लिहिणे म्हणजे
आपणच आपले पंख
फडफडवणे असते
उबलेले अंग
मोकळे करणे असते
अन त्यातही कुणाचे
ढुंकून पाहणे म्हणजे
असल्या नसल्या पिसाऱ्याचे
उलगडणे असते ..

थोडक्यात काय
ती एक
अनैच्छिक प्रतिक्रियात्मक
मस्त गोष्ट असते ...

वाचल्या...
खूप कविता होत्या
ओसाड पडलेल्या
(मला माझ्याही काही आठवून गेल्या )
म्हणून प्रत्येकाला ढुंकायला
जमले नाही मला
खरतर ते शक्य ही नव्हते
(अन ती काय कुठल्या
चविष्ट डीशची रेसेपी थोडीच आहे
पुन्हा पुन्हा चघळायला)
बरे ते असो
आता या कवितेकडे
तुम्ही ढुंकून पाहाल
याची मलाही काही खात्री नाही
अन या ग्रुपवर 
पेज व्हू मोजायची सोयही नाही
त्यामुळे मी थोडे हे
तर थोडे ते गृहीत धरतो
अन आपला निरोप घेतो
..
पण येवून गेलो बर मी !!
ढुंकून गेलो !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

सांभाळ साधना






पिकवितो बळे
बरड जमीन
देहा कष्टवून
यथाशक्ती  ||

उदार वरूण
गुरुचे वचन
मनी आठवून
पुन:पुन्हा ||

तोच तू आहे
निरखून पाहे
स्वानंदाचे लाहे
वरदान ||

कधी अंकुरेल
माझे हे पाहणे
होईल फुटणे
जाणिवेचे ||

फोफावेल पिक
कृपेने सघन
तृप्त सुखावेन
जीव माझा||

तुझा कुळवाडी
दत्ता दयाघना
सांभाळ करुणा
करुनिया  ||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


http://kavitesathikavita.blogspot.in/

लागू नकोस नादी







मनातील पौर्णिमा ही राहू दे रे मनाला  
या प्रदीर्घ रात्रीची सवय झालीय मला
रक्तात साचलेल्या साऱ्याच वेदनांना
वाहणे नसे मंजूर कुंठीत ज्वालामुखीला

ते ओघळून ऋतू गेले वादळात मानभावी
हरवून विझू गेल्या त्या विनंत्याही निनावी  
ते नेत्रही जळून गेले प्रकाशी खिळलेले
अंधार गाढ सजला का किरण उगा दावी  

ऐकांत मौन गाढ निष्प्राण निस्पंद फांदी
पडे ओघळून जग हे आता नकोच साथी
वर्षाव शुभ्र रुपेरी तव होईल आता थट्टा
जा तू तुझ्या रे वाटे लागू नकोस नादी

ते राहू दे तराणे मन उसने भोगी मळले
सांगू तुला खरे का आता न मी ती उरले
वेढून घेती मजला गूढ रंग घन निळूले
मिटली कधीच व्यथा दिसणे फक्त राहिले  


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
















भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...