गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

सावरी..




वारा विरक्त उदास
चंद्र दूरचा मनास
स्वप्न थकलेले म्लान  
साद घालते कुणास  

डोळे मिटलेले आत
रंग सांडले अनंत
निळ्या जांभळ्या कळीस
अंग नाही मोडवत

तळ निर्मळ नितळ
पार प्रकाश पाखरं
गर्द हिरव्या पानात
गंध मधुर मदिर

कुठे निघालास असा
जन्म कळल्यावाचून
मंत्र गुंजती कानात
मनी आठवते गाण  

काळ क्षणात बोलतो
उडे सावरी पिंजर
वारा लहरी शीतल
बीज विखुरे सुदूर

प्राण प्राणास व्यापून
आर्त देहात पेटून
दिव्य उसळे चैतन्य
येते आकाश फाटून  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मीच एकटी







मीच एकटी झोक्यावरती
केस मोकळे वाऱ्यावरती
आनंदाचा अथांग सागर
मीपण हरवून माझे धूसर
अशी कधीची युगा युगाची
सदैव उषा नव किरणाची
याच्या त्याच्यासाठी नुरले
मी माझ्यातच माझी नटले
माझेपण हे आकाश झाले
माझ्यातच हा प्रकाश उमले
वृक्षवेली अन पानफुले
सखी मी माया मज कळले
मी छाया मी गंध हवेवर
मी रंग मी स्वर समेवर
मी मुक्त या कळीकाळातील
मी जाणीव गूढ चैतन्यातील 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

सारे नावावर दत्ता






सहज कंटाळा 
आला जगण्याचा
देह ओढण्याचा 
उगाचच ||
ओढले ताणले 
उगा या मनाला
जणू वितळला 
रबर हा ||
शून्यात निमाली 
सारी हालचाल
शून्याचा महाल 
कोसळला ||
नको येरझार 
नको फेरफार
सारे नावावर 
दत्ता तुझ्या  ||
विक्रांत जाहला 
दिवाळखोर
मोडून व्यापार 
वासनांचा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...