गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

उंट रेती अन तो







तीन पाहुणे उंटावरती
नवलाईने बघत रेती
आणि चालला एक पुढे
जयास दुसरी नाही गती  

दूरदूरवर झाड नाही
वरती खालती लाहीलाही
तरीही मजा येतेय किती
नवी दुनिया नवे मनही

आज कुणी तर उद्या कुणी
उंट वाहती त्याच प्रवाही
आणि सैल तुमान पठाणी
शीड सुकाणू होवून दोन्ही

अखेर जगणे असते काय
पसरट उंटाचेच पाय
धसती खचती वाळूमध्ये  
तरी सदैव पुढेच जाय

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

चकवे






पुन्हा धूसर धुकट
तुझ्या गावच्या वाटा
कधी दिसते शिखर
पुन्हा धुक्याच्याच लाटा 

का रे मांडसी समोर
असे हजारो चकवे
भर प्रकाशी अंधार
सारे विझवून दिवे

माझ्या जगात सांडले
तुझे किरण कोवळे
त्याला रुजवणे खुळ 
आता मनात दाटले

लाख हरवलो जरी
तूच धरिसी बोटाला
दिशा दाखवून पुन्हा
सांगे पुन्हा चालायला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

जाणिवेची जाण..






खोलवर आत मध्ये
काय झाले ते कळेना  
जाणिवेची जाण नवी
जणू आली डोळीयांना

मी आहेचा स्पंद आत
शब्दावाचून उमले
ढोल नगाऱ्याचे गाणे
हळूच मग थांबले

तेच तेच धृव पद
ऐकू येते हर क्षणा
कंटाळ्यावाचून चाले
नाद तोच एक मना

आहे पण हाती घेता
नाही पण जगा आले
आले गेले विश्व किती
सूर्य कितीक फुटले

असे उरले आकाश  
आज माझिया मनात  
कळेना हे लिहितो मी
की वारा जणू पाण्यात

 
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

कमिटीत






कुठेही निवडून यायला
अक्कल असावीच लागते
असे काही नाही
कमिटीत बसायला तर
अजूनच नाही 
आपली सारी सोसायटीच 
वेडगळ आहे
पण दोन्हीकडे यावी लागते
ती एकच गोष्ट
आपण अत्यंत ज्ञानी आहोत
हा भ्रम अगदी ताजातवाना
असायला हवा
समोर ज्ञानवंत बुद्धिवंत
किंबहुना ब्रह्मदेव जरी
बसला असला तरीही
अशी चालवता यावी टकळी
की आपली मूर्खता अन अज्ञान
ओसंडून वाहूनही
शुद्ध नसावी आपल्याला
अन हिंमत न व्हावी
समोरच्याला सांगायला


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...