मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

कारणाविना





कळले ते जगता यावे
हीच प्रार्थना जीवना
पाहता पहाता माझे मला
तुला पाहता यावे जीवना  

खोलवर आत आत
पुन्हा एकदा उतरतांना
जाणीवेला बळ येवू दे
पावूल पुढे पडतांना

उतरलेले ओझे अन
मिटलेल्या चिंताना
पुन्हा वाव न मिळावा   
स्मृतीच्या अंगणा  

निवळवा डोह हळूहळू
झरा नवा फुटतांना
अन मग मी वाहत जावे
कुठल्याही कारणाविना 


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

पिंपळपान





कोवळ पिंपळ
पान नव्हाळ
वाऱ्यावरती
करे सळसळ
वृक्ष गुलाबी
तांबूस नटला
नव जन्माचा
मुग्ध सोहळा
पाना पानात
टिहया घुमतो
माय धरला
पान्हा फुटतो
लालस पानें
सुवर्ण होतील
ज्ञानेशाच्या नि
ओव्या गातील
चैतन्यच हे
प्रभू रुपातले
क्षण गोठूनी
घन जाहले
वा सृष्टीच्या
वारे मधून
सहस्त्र जन्म
आले उमलून
इतुके स्पंदन
इतुके कंपन
पत्र नव्हे हि
गीत संजीवन

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

पेटल्या सावुल्या






पेटल्या सावुल्या भर पावसात  
पाहीले आक्रीत थक्क झाले  ||१
पुण्याचे पावन दान हे गहन
रानात विरून हरवले ||२
चिंचेखाली देव शेंदूर फासला
प्रवासी फसला प्रसादात ||३
ओसाड मनात ध्यान सोंग शून्य
वांझपण धन्य प्रवसले ||४
हर हर हर मनाची चादर
आणली उधार हरवली ||५
विक्रांत कामना विरल्या गगना
सूर्य तारांगणा कण झाला ||६


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

मेल्याची पुण्याई फळा आली







सुख ओघळले दु:ख चावळले
मनाला शिवले जन्मभूत ||
दत्त सौदामिनी भिडे जीवनाला
सुखाने जळला देह वृक्ष ||
काय ठेवू पोटी क्षण एक कोटी
उजळल्या ज्योती अंधकारी ||
जाहलो फकीर वासनेच्या डोही
मेल्याची पुण्याई फळा आली ||
तेच भोग भोगी त्याच राग लोभी
नरक निर्लोभी दुजा कुणी ||
झालो दिंगबर वस्त्री घनदाट
कृपेची पहाट अवधूत ||
विक्रांत वाकुडा सरळ जाहला
पदी विसावला वल्लभाच्या  ||

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...