गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मस्तवाल ...










मस्तवाल ...

तोंडा मध्ये काहीबाही
चघळत चोखत अन थुंकत
अजस्त्र देह धडधाकट
येती पुढे सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कानावरती फोन ठेवत

लाल भगवा कधी निळा
टिळा कपाळी लावलेला
छातीवरती कधी बिल्ला
कधी टोपी घातलेला

डोळ्यामध्ये बेदरकार
सत्ता मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र श्वास उर्मटलेला
परिटघडीच्या पेहरावी
उन्मत्त गुंड सजलेला

आम्ही तोडू आम्ही फोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्यावाचून
समोरच्याला पार गाडू

हुकमी पोळ माजलेले
रेडे मस्तवाल वा झाले
इवले डोके संस्कारावीन
धूर्तपणे कुणी वापरले
होते दानव काय वेगळे
दंगलखोर मती मेलेले
बाहूच्या मदात माजले
अन शेवटी मातीत गेले

तीच वर्तुळे पुनःपुन्हा
नियती फिरवे गरागरा
समजून उमजूनही होतो
या दुनियेचा का पोतेरा



डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

विझणारा दिवा






विझणाऱ्या दिव्यामध्ये थोडे तेल घाल
काजळल्या वातीची नि कर देखभाल

सांभाळले तूच तर बघ सांभाळेल
नाहीतर वाऱ्यावर सहज विरेल

तुझे हात वात्सल्याचे समर्थ सशक्त
अंधाराशी झुंजतांना हवी फक्त साथ

तुज सारे ठाव तरी पावूल माघारी
विझू विझू जाय मग प्राणांची उभारी

मातीच्या दिव्यास नसे स्वत:ची कहाणी
पेटवतो ज्योत त्यास सारी जिंदगानी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

मुखवटे







 

मुखवटे तेच परी  
मजला नवीन आहे
आज सारे सेवाधारी
द्वेषात सजून आहे
  
भेटले सारे प्रवासी
नकोसे स्मरण आहे 
हातातले ओझे देणे
वाटते मरण आहे

मागणे माझे कुणाला  
जणू जयगाण आहे
धुत्कारने ते कुणाचे
आसुरी उधान आहे

आभार जीवनाचे की
शाप वरदान आहे
त्या व्यथांच्या लत्कारांची
गोधडी ही उन आहे

जाणीव जाळून त्यांनी
मांडले थैमान आहे
माझ्या जाणण्यास नवे
हे एक अंगण आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...