रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

दत्त क्षणाचा कारक ....





जरी अडला किनारा
लाटा थांबता थांबेना  
पाणी घुमतेय उगा
का या मनास कळेना  

युगायुगांचा या लाटा
नसे जन्मा मोजमाप  
अंत साऱ्या असतोच
महाशुन्यी होतो लोप

बाकी वरचा पसारा
येतो जातो किनाऱ्याला
कधी साठतो कुजतो
बंध घालतो सीमेला

देव देवूळे पर्वत
चर्च मिनार तुर्बत
एका वाटेचे प्रवासी
हात घेवून हातात

कोण किनाऱ्यास उभा
होता सागराचा कण
दत्त क्षणाचा कारक  
देतो निमिषात ज्ञान

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

दत्त सापडत नाही





अजूनही दत्त
सापडत नाही
हरवलो मी ही
काय कुठे ||

भोगाचे गरळ
पिवून सकळ
निजली केवळ
जगदंबा ||

एकेक चक्रास  
लागले कुलूप
वाटता हुरूप
मावळला ||

भिकाऱ्यांच्या गर्दी
पांघरून डोई
याचक मी होई
पोटासाठी ||

तसे बरे आहे
गीत बित गाणे
नीज बरी येते
भजनात ||

शब्दी उंडारता
मानही वाढतो
दिलासा मिळतो
खोटानाटा ||

काढुनिया माळ
करी दत्त दत्त
चाललो गुत्यात
त्याच जुन्या ||

सुटला विक्रांत
वेडा होई पुन्हा
भूकेजाला तान्हा
दत्तासाठी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

मरण मागे होते



थकलेले हात अन
मरण मागे उभे होते
सांभाळण्यास सावरण्यास
फक्त तुझे नाव होते
अटळ अंत असूनहि  
भयाचे काहूर दाटे
अर्ध्या या डावाला
मन बिलगत होते
बाजुला अज्ञात चेहरे
जणू रुख निर्जीव होते,
कश्यासाठी धावणे
कुणासाठीआणि कुठे
पोहचलो ते ठाणे ही
रिते रिते होते ,
अगतिक पाय अन
आंबलेले रक्त होते
किती संभाळाशी दत्ता ,
कि हे हि तुझे एक नाटक होते

विक्रांत प्रभाकर
 http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

प्रकाश दाटता






अवघा प्रकाश दाटला कल्लोळ

दिशांना भोवळ अस्तित्वाची ||

नारायण नभी नारायण मनी

भरे कणोकणी दिव्य आभा ||

रंगांचे विभ्रम चाकाटले चित्त

सुवर्णाचा पोत जीवनाला ||

सरला अंधार गात्रात दाटला

डोळिया पाहीला दिव्यारूण ||

सरे कुतूहल सृष्टीचे सकळ

अनंत अपार निरंजन  ||

अंतर्बाह्य शुद्ध निजात्मज्योती

कापुराची वाती विक्रांत हा || 



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...