शनिवार, १८ जून, २०१६

मनीच्या आकाशी





माझ्या मनीच्या आकाशी  
रंग सोनेरी कुसुंबी
चंद्र पुनवेचा सदा
धुंद केशरी गुलाबी

मेघ सुखाचे कोवळे
छंदी नाचतात वारे
स्वप्न अतृप्त सुंदर
झगमगतात तारे

मोह सहज सजले
दव टिपती इवले
धुके अस्तित्वाचे गूढ
घेते लपेटून ओले

कधी दाटते गडद
आर्द्र सर्द भरलेले
देण्या उत्सुक अपार  
प्रेम दयेने भरले

कधी निरभ्र उरतो
शून्य जगण्याचा ठसा
निळा असून दिसतो
दृष्टी भ्रमाचा आरसा

नाद उमटे ओंकार
सूर्य किरणी कोंडला
कळे दत्त असे दत्त
कणाकणात भरला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/






गुरुवार, १६ जून, २०१६

कृपेचे ते द्वार






मजला संकल्पी 
गोवूनिया दत्त
ओढूनिया घेत आहे खरा ||
तयाच्या कृपेनी 
पातलो मंदिरी
पाहिली साजरी मूर्त गोड ||
दिगंबर घोष 
निनादे कानात
इवलाले नाद सर्वांगात ||
तयाच्या आवडी 
सरो जन्म सारा
उदारा दातारा भेट घडो ||
विक्रांत पातला 
कृपेचे ते द्वार
क्षणात संसार हरवला  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १५ जून, २०१६

जन्म बाटलेला





माझे चिखलाचे पाय
तुझे सोन्याचे देवूळ
नको बोलावूस आत
बघ उठेल वादळ

तुझे कठोर सोवळे
माझे सारेच रे ढिले
तुझे बेगडी पहारे
माझ्या उडतील बळे

माझा जन्म बाटलेला
स्पर्शास्पर्श फेकलेला
बघ रुचतो का तुला
वंश एक मानलेला

तुझ्या सगुण रुपाला
बघ भाळलो मी असा
तुझ्या नियमि जुनाट
मी न बसणार असा

अंत निर्मळ प्रेमाचा
उगा नकोस तू पाहू
चल निघ रे बाहेर
माझ्या वस्तीत रे जावू

(दत्त हसून गालात
म्हणे येतो रे विक्रांत
चल बसू ये मातीत
सोने राहू दे मूर्तीत )

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...