बुधवार, ४ मे, २०१६

जीवना कुशीत



कृपा 

सुखाचे गोजिरे 
स्वप्न हरखले  
एक उमलले 
फुल घरा |

दातारे दिधले 
आनंद निधान
नव्याने तोरण 
बांधियले |

सुखाची आवृत्ती 
परी असे नवी  
जैसी वर्षा यावी 
भरुनिया |

आनंद थरार 
सर्वांगे आभार
कृपा दीनावर 
लोट वाहे |

जीवन मिठीत 
जीवना कुशीत
घेवूनी वाहत 
आहे जन्म |

तुवा दिधले जे 
प्रेमे सांभाळीन
तुझे ते जपीन 
जीवापाड |

विक्रांत जाहला 
पुनरपी पूर्ण
फिटूनिया ऋण 
विधात्याचे |




डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in



रविवार, १ मे, २०१६

जगविले दत्ता




जगविले दत्ता मज तुचि आजवर  
पोटास दिली रोजला भाकर    

फिरविले उगा चार रानोमाळ  
जणू आठवाया तुजला प्रेमळ  

ती ही तुझीच अपार करुणा  
आता कळो ये माझिया मना  

अजुनीही जगेल मी इथे तसा   
परंतु प्रभू तुम्ही ह्रदयी वसा  

असेल तोवर सुखे मी वाहीन   
भार पाठीवर न त्रास सांगेन  

मरणी पडणे घडो येई तेव्हा
दिसे मृत्युघर पसारा अवघा  

माझिया मनी शांत आणी स्थिर  
जळो स्मृती दीप तव प्रभूवर   

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

काव्य चौर्य रसिकास




रसिक एक भेटला
अन मजसी वदला
रे तुझ्या कवितेतील
भाव मजला भावला

साऱ्याच कविता तुझ्या 
करतो मी फोरवर्ड
येतेय वाहवा मग
मजला बघ उदंड

वाटला आनंद थोडा
दु:ख हि अन दाटले
कविराज मनातले
खुट्ट बरेच जाहले

थोडेतरी श्रेय मला
नको काय मिळायला
काय जाते याचे असे
कविता या चोरायाला

तोच मनी एकू आली
वाणी एका वानियाची
शब्दश्रीचा  स्वामी महा
गाथा सांगे जीवनाची

जावू देरे तूच नाही
एकटा शिकार असा
नाव जावो शब्द राहो
सोडू नको तुझा वसा

लिहिणारा असे कोण
वाचणारा आणि कोण
ज्यास जे हवे तयास 
मिळणार त्याचे दान 

माझे तुझे काही नाही
कोण किती उरला रे
वाहू देत साचलेले
मुक्त सांग कोण झाले

कर्ज असे कुणाचे  हे 
भार शिरावर दिला
देणारा तो कुणी अन
घेणारा हि ठरविला

तया शब्दे शांत जालो
चीड व्यथा निवळली
घेणाऱ्या घे हवे ते रे
इवली तव ओंजळी

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे

kavitesathikavita.blogspot.in 

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...