शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

भक्तीचे मोजमाप







माझिया भक्तीचे
काय मोजमाप
लाजे आपोआप
मन माझे ||
म्हणावी साधना
तरी हसू येते
म्हणे डबक्याते
महासागर ||
बहु पातकांची
असावी गाठोडी
म्हणोनिया थडी
अडकलो ||
संतांचे आशिष
मागे असतात
परी चुकतात
मार्ग सारे  ||
गांडूळाना माती
जगण्याची प्रीती
तैश्या काही रिती
दिन जाये ||
विक्रांता सनाथ
करी दयाघन
दावुनी चरण
सुकुमार ||
भेटी आळवितो      
करीतो  प्रलाप
दत्त मायबाप
धाव माझे ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

प्रभू तुझा दास







प्रभू तुझा दास
मजला करावे
चरणासी घ्यावे
दत्तात्रेया  ||
अवघा हिंडलो
जन्म तृष्णेपाठी
तुझी गाठी भेटी  
झाली नाही ||
सुख शोधतांना
दुर्दशा पातलो
लोटूनिया आलो 
वेचले ते ||
अनाथा सदैव
तुची तो सांभाळी
भक्ता प्रतिपाळी
शरणागत  ||
कीर्ती तुझी जगी
गातात पुराणे
प्रत्ययास येणे
घडेल कै ||
विक्रांत उदास
हृदयात आस
संपले सायास
यत्नबळ ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे 



गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

|| स्वामी लोकनाथ तीर्थ ||







तीर्थांचे ते तीर्थ
लोकनाथ तीर्थ
झाले हृदयात
विराजित ||

भाग्यवशे आलो
तयांच्या दारात
योग शक्तिपात
कळो आलाय ||

शिव प्रसादीत
सिद्धांचा हा पंथ
अगणित मुक्त
भाग्यवान ||

वैराग्याची कळा
अग्निचीच ज्वाळा
कृपेचा पुतळा
मूर्तिमंत ||

तया पदी आता
जावो जन्म सारा
मायेचा पसारा
मिटूनिया ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

मद



निरार्थ वाद | उथळ संवाद
शब्दात मद | साचलेला ||
मिळाली दैवाने | थोरली भाकरी |
परी शिरजोरी | डोईजड ||
माजले हे तण | वाढे बेगुमान |
मनात रोवून | बीज साऱ्या ||
लायकी वाचून | नाचती सोंगाडे |
तया पाया पडे | मिंधेराजे ||
तुझे माझे बळ | शेवटी केवळ |
पुष्ट वळवळ | गांडूळाची ||
पांढरी कॉलर | घाबरे मळाला ||
ऐकुनी नावाला | थोर थोर ||
अहाहा चालला | काय हा खेळ |
बाजार केवळ  | खिसे भरू ||
झाकले डोळे | घातला गॉगल |
विक्रांता पडळ | नयनाला  ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...