मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

व्याकूळ आळव













तिथे जावूनिया  
परतून येणे 
घडू नये कधी
शोधितो ते पेणे

ऐसे ध्यानी मनी
म्हणून धावतो
जागोजागी साऱ्या
संता विचारितो

देवाच्या मिठीत
सरावे जीवित  
पंख जीवनाचे
हळूच मिटीत

कशाला असले
नकळे भोगणे
जगणे मरणे
येणे अन जाणे 

आपण आपुणा
देहात चिणणे
वेदना सोसत
उगाच रडणे 

नभाच्या कुशीत
धरेच्या उशीत
जाणावे गूढ या
जन्माचे गुपित 

व्याकूळ आळव
विक्रांत चित्तात
कधी भेटतील
प्रभू दत्तनाथ 

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
------------------------------------------------------

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

प्रारब्ध भोगणे








देहाचे बंधन | कळले देहाला |
व्याधीत जळला | तपोमार्ग ||१||
फुटलेले भांडे | कुठे डकवले |
आणिक ठेवले | संसाराला ||२||
ऐसा हा प्रकार | करुनी स्वीकार
प्रभू मार्गावर | चाललो मी ||३||
अशक्य तयाला | नसे इथे काही |
कशाला पुण्याई | वेचू पण ||४||
प्रारब्ध भोगणे | दाविले गुरूंनी |
देहात जगुनी | शांतपणे ||५||
तोच तो वारसा | जगतो घेवून |
नामात राहून | यथाशक्ती ||६||
देई देवराया | भोगायचे बळ |
करुनी निर्मळ | मोक्ष मार्ग ||७||
विक्रांत देहात | विकल विरक्त |
धूप चंदनात | हरवला ||८||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...