मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

वेदनांचे काळकुट





जीवनाचे ओझे झाले
सुखस्वप्ने वाहतांना
पाऊलांचे गाणे गेले
कुणाविना चालतांना

आपुलेच आक्रंदन
परतून येई काना
आणि कंठी शोष पडे
पाणी पाणी म्हणतांना

मृगजळ भेटतात
स्वप्न नवी पडतात
परी हात लावताच
स्पर्श पुन्हा जळतात

पातकांचा भर माथी
शाप कुण्या जन्माचा हा
जगतांना तडफडे
अरे जन्म कशाला हा

चाललेल्या वाटेवर
चटकेच सोसतांना
कसे खरे मानू सांग    
या जगाच्या वल्गनांना

मी न माझा आता इथे
प्रीती यारी सारी झूठ
विषाची आभा भोवती
वेदनांचे काळकुट

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

स्तंभ प्रकाशाचा गिरनारी






ते दारही बंद होते  
हे दारही बंद आहे
पाऊलांच्या चिंध्यांना या
वेदनाच अंत आहे ॥

भिजावेत पंख ऐसे
पाखरांना वाटते रे
परी मृत्यू दबा धरी
पाणवठे फास सारे  ॥

मिटावेत आशादीप
व्यर्थ लेख मिटू जावे
नको नको जुने काही 
कोरेपन जीवा यावे ॥

कुणा हव्यात चांदण्या   
रंगलेल्या मधुरात्री
झंकारल्या स्पंदनांनी
उठावे ओंकार गात्री ॥

एक अंत अटळसा
जरी जीवा खुणावतो
पलीकडे वाट नवी
आत कुणी सांभाळतो ||

जगण्यास जाणायचे
भलतेच खूळ जरी
दिव्य स्तंभ प्रकाशाचा
बोलवतो गिरनारी ||
**"""
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com/



 

रविवार, ३ जानेवारी, २०१६

छापाकाटा





म्हटले तर सुखी आहे ती
म्हटले तर दु:खी आहे ती

तेच नाणे जीवनाचे अन
छापाकाटा खेळत आहे ती

छापा सुख अन काटा दु:ख
ठरवून बसली आहे ती

आणि तरीही कशास काय
हे विसरून जात आहे ती

मग पुन्हा स्मरणी आतील
हुडकून काढत आहे ती

या सुखाचे दु:ख कसे होय
पाहून अचंबित आहे ती


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



  

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...