शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

माझी ही वही






जगापासून दूर
मौनाच्या गुहेत
आत्ममग्न संत
बसलेले ||

जगण्याचे सूत्र
साधनेचे तंत्र
सुखाचे मंत्र
तया कळले ||

अन इथे कुणी
दुःख वणव्यात  
धावे किंचाळत
दिनरात  ||

लबाड श्वापदे   
टपून बसली
पावलो पावली
त्राही त्राही ||

होतो कधी का
कृपा अपघात
जन्म अकस्मात
उजाडतो ||

फाटल्या देहाचे
जळल्या त्वचेचे
प्राक्तन कुणाचे
वा ठरले ||

कळले कुणास
कळले वा नाही
माझी ही वही
भरू आली ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मित्र भेटतात तेव्हा






दिस उजाडत नाही
रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात तेव्हा
शब्दही थांबत नाही

स्मरणांचा धबधबा
कोसळतो अनावर
हसतांना बोलतांना
किती लोटती प्रहर

कधी लबाड होवून
हळू टपली मारतो
भांड भांडूनिया कधी  
मिठी प्रेमाने मारतो  

यश कीर्ती वय पद
सारे हरवून जातो
आपल्यातच आपण
कुणी दुसरेसे होतो  

काही नसते अपेक्षा
तरी भरते आकाश
उगा उगाच आपण
जातो होवून प्रकाश



विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/



रविवार, ६ डिसेंबर, २०१५

माझ्या देवा नकार हा ...







वेगळाल्या धर्मिकांच्या
वाटा सदा वेगळाल्या
व्यवहारी मैत्री अन
भिंती आत बांधलेल्या

माझ्या देवा नकार हा
नकार मलाच असे
मूलगामी ओळख ही
खरी कळपाची असे

लाख संत लाख पंथ
तरी जग वाटलेले
धनासाठी प्राणासाठी
कुणी कुणा बाटवले

खरा देव जाणावया
कोण इथे पुण्यवान
सालो साल खेळ चाले
व्यर्थ सारे ग्रंथ ज्ञान

एक धर्म जगी व्हावा
स्वप्न वेडी अंधारली  
विटंबून प्रेते किती  
गावोगावी सांडलेली

कुणालाच नको असे  
सत्य खरे धर्मातले
धर्मवेड द्वेष मनी
दुष्ट जाळे पसरले  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...