रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

पुंड






तुळतुळीत दाढी करून
कुणी दिलेला सेंट मारून
पुंड येतसे तावातावाने
तोंडामध्ये शिव्यास पेरून

भुंकण्याचा पगार तयास  
कुणी दिला असे ठरवून
मूर्ख काही अन दांडगट
त्या ठेवती डोई चढवून

एकेरीची ती ताकद त्याला
पुरेपूर माहिती असते
अन सभोवती तेच सैन्य
सारी ठरली नीती असते

कामापुरते मुखात त्याच्या
थोर पुरुष नाव असते
तिन्ही मकारी मोकळलेला
सारे वळूचे गाव असते

लबाड भामटा स्वपुजक
गटारी तो मुरला असतो
किळसवाणे अस्तित्व त्याचे
घरी फुटला नाला असतो

पण कुणीही त्याच्यासमोर
नाक दाबून धरत नाही
पोट भरते शिव्या स्त्रवून
पण ओकून दावत नाही  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

साधू





एक येईल रे कळ
मग सरेल रे खेळ
लाख करून याचना
नाही मिळणार वेळ

किती आरडा ओरड
तडफड त्या मनात    
जीव जाईल क्षणात
कोण ठेवेल ध्यानात

साधू मिटुनी घे डोळा
खेळ जाणुनी आंधळा
आत भरला चालला
सारा सुखाचा सोहळा

दिसे हरेक तयास
यमपुरीस निघाला
अन हव्यास बोजड
घट्ट हातात धरला

साधू उगाच बसला 
नाम स्पंदने भरला
देह टाकला राहीला
दीना कारणे उरला

ऐसा शोधूनी पुरुष 
जन्म कर रे सफळ
किती काळ वाहशील  
देह पोटाला केवळ

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

जिवलग स्मृती



फडफड ज्योत
विझते क्षणात
दु:खाचा अंधार
दाटतो मनात

असाच असतो
मायेचा बाजार
शेवटी सुटतो
प्रत्येक आधार

जळते काळीज
स्मरणाचा पूर
जाता जिवलग
सोडुनिया दूर

सहज मोडतो
सुखाचा मांडव
वेदना वादळ
करीते तांडव

एकेक आठव
मनात छळते
नसणे तयांचे
जीवाला टोचते


जगण्यामधले
विरतात सूर
डोळिया मधून
ओघळतो पूर

हसणे सरते
काहूर उरते
तरीही जगणे 
नशीबी असते



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

दत्तात्रेया...





काय मी करावे
जेणे तुझे मन
कृपाळू होवून
ओघळेल ||
तुझ्या नामध्यानी
विकले स्वत:ला
प्रपंच पणाला
लाविला हा ||
काय मज हवे
ठावूक तुजला
काय सांगायाला
हवे पुन्हा ||
तुजवीण आन
नाही काही आस
घ्यावे हृदयास
दत्तात्रेया ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...