शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

रीस्टोर फोटो








रिसायकल बिन मधील तुझे फोटो
मी पुन्हा रीस्टोर केले .
तसे ही ते पुसले जाणार नाहीच
मग राहू दे म्हटले
ती तू तेव्हाची मनात घर केलेली
माझे सर्वस्व झालेली
पुन्हा पाहतांना तुला माझा श्वास अडकला
कालौघी विचार थांबला
अन तेव्हा अचानक कळून चुकले मला  
दुखते जखम तरी सुखावते  
आता तुला मुद्दाम विसरायची तशी
काहीच गरज नव्हती
अस्तित्वाचा माझ्या एक तू
अविभाज्य भाग झाली होतीस
तू तशी नाहीस खरतर
तू तशी नव्हतीस
पण मनी सजली प्रतिमा झालीस
अदभूत अचानक झाला भास अन
एक कविता उमलून गेलीस    

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




  





  

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

कान्हुली जगदंबे





तुझिया बिढारी
झालो घुसखोर
टाकुनिया भार
राहिलो मी ||
किती हाकलेले
नाही हटणार
लोचट लाचार
श्वानापरी ||
अवघे संपले
मागील आधार
कळो आला पार
संसाराचा ||
मांडिले निर्वाण
प्राण हे पणास
मारा तारायास
उभा दारी ||
साऊली सुखाची
तुझीच माऊली
याचतो कान्हुली
जगदंबे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

भास पाचूचा






देहामध्ये मुरलेला
स्पर्श रेशमी कुणाचा
डोळयामध्ये भिनलेला 
रंग सावळा कुणाचा

मनामध्ये रुंजणारा
भास पाचूचा कुणाचा
कानामध्ये गुंजणारा
शब्द कोवळा कुणाचा

व्यापुनि तनामनाला
गंध उरला कुणाचा
प्राणात कोंडुनी श्वास
प्रश्वास धुंडे कुणाचा

पुन:पुन्हा शोधितो मी
तोच चेहरा कुणाचा
आभाळ शून्य मोकळे
स्पंद जाणवे कुणाचा

मिटताच डोळे मीच   
होतो नकळे कुणाचा
लक्ष लाटा सर्वागात
पार लागे ना कुणाचा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५

सुटते आणि बसते गाठ




हरवत जाते  एक  एक वाट
विस्मृतिच्या घनदाट रानात
रुळलेले पावूल अड़कते
अनोळखी  कुण्या  जाळ्यात

मी माझे सारे ओळखीचे  
गाव हरवते कुण्या डोंगरात 
धावायचे आता  कशाला
दीप विझतात अंध हातात

विखुरतात हाका  साऱ्या
कपारीतील  खाचखळग्यात
हळूहळू अन भान हरवते
या  इथल्याच घन गोंगटात

कधी  कुठली चांदनी अन
मेघ  सावळा  येतो नभात
गूढ़ गुपित काळी सावळी 
उमलु लागतात अंतरात

तेवढाच मी  माझा होतो
उगाच  सुटतो गाणे  गात
नि  बरेच  काही होते आत
सुटते आणि बसते गाठ



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...