मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

मुलगी दाखवणं





थरथरत आणि बावरत
पदर घट्ट लपेटत
ती लग्नाच्या बाजारात
होती स्वत:ला दाखवत

नजरांनी खिळलेली
पारड्यात टाकलेली
डोळे नाक ओठ भुवई
जात होते न्याहाळत

प्रश्न काही सरळसोट
आडवळणी वा विचारात
बौधिकता होते जोखत
सारं ती होती सोसत

गालावरील हसणं खोटं
उत्तरात बोलणं नव्हतं
ते तिचे असणं होतं
विकण्यासाठी मांडणं फक्त  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

आलो रे मित्रा !!





कवितेसाठी काविमित्राचं
कवितेच्या ग्रुपवर निमंत्रण आलं
अशी काही निमंत्रणं खरोखर
फार विरळ असतात
आणि निमंत्रण देणारे तर
त्याहून विरळ असतात
आपल्याहून कुणी चांगल लिहू शकतो
हे मनानं मानायला कवीला
फारच अवघड असतं
जरी तो वारंवार वरवर
वाह्वाचे तोरण बांधत असतो
आपल्या कवितेची तंगडी
मनी वरच ठेवत असतो
आणि इथं तर निमंत्रण..
आग्रह.. पुनःपुन्हा बोलावणं
ते सुद्धा हौशी कवीला
तर मग भागच होतं येण ...
आलो रे मित्रा !!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

अंधाराचा शाप..







 
म्हटलं काढू नये
कधीच ती आठवण
पण तरीही ती येते
मी बोलाविल्यावाचून

म्हटलं सारे काही  
जावू आता विसरून
प्रत्येक रिता क्षण
डसतो स्मृती होवून

कश्यासाठी गुंता
असा हा होतो
सुटकेच्या मार्गच
सापळा का ठरतो

पुन्हा एक रात्र
किर्र अंगावर घेतो  
मध्ये दिन कुठला
कधीच का नसतो

आता अश्या रात्रीची
सवय होत आहे
मरणाची मध्यरात्रही
जवळ येत आहे

असेल उष:काल
निदान त्या त्यांनतर  
अंधाराचाच शाप
वा जन्म जन्मावर

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...