शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

अजुनी बाकी आहे..






जीवनाचे मजवर काही उपकार अजुनी बाकी आहे
म्हणुनी संपल्या श्वासात जाग अजुनी बाकी आहे

तसा तर विझवून दुनिया वारा गेला आहे खरा  
अंधारात दिवा एकटा अन तेल अजुनी बाकी आहे

पेटेल न पेटेल प्राण तळमळ उरात सदैव जागते  
काय करू लोचट मन स्वप्न अजुनी बाकी आहे  

हिंडलो इथे तिथे मी शोध घेत त्या प्राक्तनाचा
जळल्या रेषा हातच्या संवेदना अजुनी बाकी आहे

नाही म्हणजे नाहीच पडला पावूस असे जरी ना
रंग जळल्या अंकुराचा हिरवा अजुनी बाकी आहे

होईल निदान ती सौदामिनी आस होती शेवटची
भंगण्याचे स्वप्न देखणे तेही अजुनी बाकी आहे

आणि शेवटी शब्द उसने हाती घेवूनी उभा मी
धुरळाच शेवटी येणे आभाळ अजुनी बाकी आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

तुझ्यासाठी चोरीमारी





तुझ्यासाठी जगायला
दुनियेत फसायला
रडायला हसायला
बघ आवडेल मला

तुझ्यासाठी चोरीमारी
करीन मी शिवीगाळीं
भांडुनिया सारी आळी  
घेईन मी डोईवरी

तुझ्यासाठी खपेन मी
मरमर मरेन मी
पापपुण्य गुंडाळुनी
पैश्यामागे धावेन मी

तुझ्या गोड हसण्याने
प्रेम रस वर्षावाने
उमलते मनी गाणे
खुळखुळ वाजे नाणे

बघ मागे सरू नको  
सोडुनिया जावू नको
माझे प्रेम हाराकिरी
नाही त्याला म्हणू नको

बाकी सारे स्वीकारेल
जग सारे ठोकारेल
जीवा फक्त एक आस  
प्रेमी असो आलबेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




सोमवार, १३ एप्रिल, २०१५

माउलीचे मन धाले...






 (मृत्यू शय्येवरील जीवाचा प्राण जीवलगच्या भेटीसाठी कसा ताटकळतो हे मागील आठवड्यात आयसीयुत प्रत्यक्ष पाहिले त्याची ही कविता)



तपासण्या औषधांची
साऱ्या पराकाष्टा झाली
खूप यत्न करूनही
म्हातारी कोमात गेली

जीवघेणा रोग होता
कणकण थकलेला
सुडोमोनी जंतू होते
मृत्यू अन ठरलेला

यातनेत भरडला
कसाबसा टिकलेला
लाडकीला पहायाला
प्राण होता थबकला

उपचार थकलेले
चालू होते चाललेले
ठोके श्वास मंद होते
हृदयही थकलेले

परी जीव घोटाळला
कान प्राण आतुरले
लेक तिची दूर देशी
निरोपाचे दूत गेले

दहा दिस मावळले
मरणाला रोखलेले
भीष्म तन होते जणू
सुयांमध्ये खिळलेले

आणि मग एकदाचे
लेकीचे वाहन आले
कानापाशी स्फुंदत ती
कशीबशी तिला बोले

उघड ग डोळे आई
बघ दुरुनिया आले
लाडक्या या पाडसांना
घेवूनीया सवे आले

मिटलेल्या डोळ्यात त्या
काहीतरी चमकले
अडकले प्राण मग
मिनिटांत निसटले

ऐकण्याच्या पलीकडे
होते तिने ऐकियले
भेटण्याची आस होती
माउलीचे मन धाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...