शनिवार, १० जानेवारी, २०१५

मौन द्वारावर





अंतरातून उमटणाऱ्या उर्मी
अनावर व्याकूळ उत्सुक
मौनाचा अर्थ जाणून घ्यायला
शब्दांनी बरेच काही सांगितले
मेटाकुटीस येत
अर्थाचा भार वाहत
शब्द देतात
हिंम्मत अन आधार
अन आणून सोडतात
अगम्य अनाकलनीय
अश्या प्रवेश द्वारावर
तिथून पुढे चालायचे
आपले आपणच
आधाराशिवाय
पण कुणाचा तरी आधार
सदैव घेत आले मन आजवर
ती सवय ती चाकोरी
अजून मनाला सोडवत नाही
शब्द सुटत नाही
ते आग्रह करते आहे साथीचा
आणि कदाचित म्हणूनच  
पावूल पुढे पडतच नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

पाघळणे माझे..





ढुंकूनही माझ्याकडे
राणी आता पाहू नको
उडालेत केस बहु
कलपाला हसू नको

थकलेत सांधे सारे
करकर वाजतात
भिंगाआड डोळे रूप
कसे बसे पाहतात

पाघळणे माझे असे
मनावर घेवू नको
पुरुषाची जात आहे
विचार तू करू नको

कधी कधी रूपामध्ये
मन असे अडकते
चाली मध्ये भान कधी
वेडे खुळे हरवते

असू देत मन जरी
तुजवरी भाळलेले
सुजाण तू व्यवहारी
तुज जग कळलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

स्मृती काजळाची





आताच स्वप्न
मनात संपले   
बह्कले शब्द  
ओठात हरवले

डोळ्यात डोळे 
नव्हते कधीही
कोरडे शब्द अन
उपचार बोलही

अवघेच भास
खरे मानले
नव्हतेच काही
वाटले तुटले

हासती कुणी
काळजात वार
मानतो उगाच  
खेळात हार

चालेल काही
पुढे जिंदगानी
स्मृती काजळाची
उरेल मनी

विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ५ जानेवारी, २०१५

गूढ डोहात







पुन्हा डोकावले
गूढ डोहात  
पुन्हा पाहिले  
त्या अंधारात

थोडे पाणी
हलले फिरले  
मीच मजला
पुनरपि दिसले 
    
अन सावल्या
मनातल्या  
मनास मग 
हळूच कळल्या

पान कोवळे  
कुणी तोडले  
अलगद आले  
दुख प्यायले

तरीही ओठी  
हासू सजले   
काय भेटले  
काय हरवले


खळखळ ना  
कलकल केले  
तरीही पाणी
वाहून गेले


पाहण्याचे त्या 
गाणे झाले  
जल कणकण
मग मोहरले

अजुनी अर्धे  
प्रकाश प्राशिले 
मन तृषार्थ  
ओठ थिजले  


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...