रविवार, २१ डिसेंबर, २०१४

नायिका






बरीच धूसर अन अजून  
खूप दूरवर आहे ती
माझ्या शब्दात असून  
मलाच अनोळखी आहे ती  

प्रेमात कुणाच्या
चिंब भिजलेली आहे ती
तप्त विरहाच्या आगीत
पोळलेली आहे ती

बोलायला तलवार पण  
वागायला अलवार आहे  
येणे जाणे पाहणे तिचे
अवघेच लयदार  आहे

छोट्या छोट्या स्वप्नांची
दुनिया आहे तिची
चार पाच खूप प्रेमाची
माणसे आहेत तिची

रडण्यासवे तिच्या ‘
माझे शब्द उदास होतात
हसतांना पाहून
तारा फुलात सजतात

कधी डोळे पुसतात
कधी हळुवार समजवतात
चिडवतात तिला कधी
अशीच मस्ती करतात

पोरपण तिच्यातले
कधीच मिटत नाही
नाकावरचा राग
अन हसू हरवत नाही

कुठून कशी कधी ती
माझ्या कवितेत शिरली
सारे शब्द रंग लेवून
राणी इथली झाली 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

ती माझी कविता







ती माझी कविता
मला आता भेटत नाही
तुडवून रान शब्दांचे
वेल ती सापडत नाही

चष्म्याविना अलिकडे मज   
खरच काही दिसत नाही
रंग गंध पण तो तिचा
मन मुळी विसरत नाही

आठवता तिला आसमंत
तोच तो राहत नाही
मनामध्ये फुलतात ऋतू
अजुन का कळत नाही

मिटता डोळे चित्र तिचे
काळ मधला स्मरत नाही
चुकले वळण आयुष्याचे
परत घेता येत नाही

धूसर नजर संध्याकाळी
शब्द मुळी आठवत नाही
मौनामध्ये काही दाटते
ओठावर पण येत नाही

चुकल्या गाठी आयुष्याच्या
जरी मी मोजत बसत नाही
पण रुतणारी गाठ एक  ती  
धड जगू मरू देत नाही


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

सावळ्याची सखी








सावळ्याची सखी
सावळी सावळी
उष्ण तप्त मनी
जणू की साऊली

येई पुन्हा अशी
नको शंका मनी
प्राण तुझ्या पदी
मी गं अंथरुनी

गूढ डोळे तुझे
भाव नच कळे
देई जन्म मला
वा वध शामले

तुज वाचून हा
जन्म नको मला
वाट पाहू किती
प्राण व्याकुळला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...