सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

कविता अन मी






अभंग न येत मजला

न जमतात गझला

भावनांचा पूर येता

शब्द होतात पाचोळा



उमटे आकार काही

उंच उडुनी धुरळा

घडणार कसे काही

माहित नसे कुणाला



लागतो कधी कश्याने

घोर या वेड्या जीवाला

तळमळता मन हे   

शब्द येती सांत्वनाला



रुजतात भाव आत

ये अंकुर प्रतिभेला

जाती मुळ्या खोलवर

उसवत अंतराला



विक्रांत प्रभाकर

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

कबीर १ --अवधूता मी तर












अवधूता मी तर आहे युगायुगांचा योगी

आल्यागेल्या मिटल्या वाचून शब्द अनाहत भोगी  

सारे जगत सगेसोयरे सारे जगत हे जत्रा

सारे माझ्यात मी सर्वात तरीही केवळ एकटा

मी सिध्द समाधी मीच मौनी मी अन मी बोले

रूप स्वरूप अरुपी दावून मीच मजशी खेळे

म्हणे कबीर साधू बंधू रे ऐक नाही कुठली इच्छा

कुटीत माझ्या मीच डोले खेळे सहज स्वेच्छा



अनुवाद विक्रांत प्रभाकर

एक अपमृत्यू ..






तो टाकीत उतरला
टाकी साफ करायला
विशीचा तरुण पोरगा
क्षणात मरून गेला

कुणी म्हणती शॉक लागला
कुणी म्हणती गुदमरला
तर्क वितर्क गूढ करत
अर्थ कुणी काय लावला

दाढी कोवळी केस कुरळी
डोळे आत खोल ओढली
थोडी उघडी पुतळ्या थिजली
मुद्रा उदास करून गेली

होता मृत्यू त्याचा जाहीर
बाप उभा सुन्न कातळ झाला
आवळून मग पोट घट्ट आपले
मटकन असा खाली बसला

श्वास त्याचा छातीत अडकला
जणू की अंतर चिरत गेला
कसा बसा अन बाहेर पडत
एक विदीर्ण हंबरडा झाला

कुठे कुठे मरण लपते
असे कुणा का घेवून जाते
या अपघाती प्रश्नाचे
कुणाकडेच उत्तर नव्हते

विक्रांत प्रभाकर


शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

हटके





तू बोलतांना
चिडत असतेस
अन मी
तरीही
खुळ्यागत 
तुला डोळ्यात
साठवत असतो..

बोलतांना मध्येच
ते तुझे
स्वर खेचणे
मी कानात
घोळवत राहतो

खरच सखी
तुझे तर
सारेच किती
अनोखे असते
हटके शब्द
खरोखर तुलाच
लागू होतो

वाऱ्यावर स्वार  
सदा वीजेशी
स्पर्धा असते
आगीचा चटका  
शब्द तुझा
फटका असतो

गर्द सावळ्या
डोळ्यात तुझ्या
तरीही मन
उडी मारते
कधी पाणी
गुडघाभर
कधी डोह
अथांग असतो

विक्रांत प्रभाकर




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...