शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

नकोच आता प्रेम जीवनी







नव्या वादळी पुन्हा उभी ती
जीवना पुढती दिड्मुख होती 
घडले होते काही आश्चर्यवत
मागितल्यावीन ये प्रेम वर्षत
परंतु थकले म्लान विरले
जीवन होते काही जाहले
वजा बेरीज तिला कळेना
व्यवहारी अन मेळ बसेना
चालून आले भाग्य थोरले
क्वचित जीवन देई असले
चार दिसांचे भाग्य तियेचे
सौख्य होते धुंद ऋतूचे
घ्यावे भोगून धुंद भारले
जावे विसरून दु;ख आतले
पुन्हा मिळो वा न मिळो
प्रीत समोरी आले कळो
ठिक आता परंतु नंतर
काय उद्याचे कळेल अंतर
आताच गेले होते हातून
बालपणीचे प्रेम ओघळून
रात्र काजळी उदासवाणी
होते जीवन एक विराणी
तसेच काही पुन्हा न होवो
दु;ख प्रीतीचे पुन्हा न येवो
तिच्या मनात अपरंपार
भरला होता दु:ख सागर
पुन्हा हवेचे झोत बेभान
येता सैरभैर झाले मन
नकोच आता प्रेम जीवनी
तिने अंती टाकिले ठरवूनी
व्यवहार अन ठोक मानुनी
वधूवर मंडळी केली नोंदणी

विक्रांत प्रभाकर


शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

तुला पाहणे





तुला पाहणे
असते गाणे
सांभाळले मन
पुन्हा वाहणे
खूप दिसांनी
पुनव पाहणे
मनी उजळणे
शुभ्र चांदणे
पुन्हा घडते
ते अनुभवने
आम्रवनातील
मन मोहरणे
जड गंधित  
श्वास होणे
नि ऐकू येणे
उरी धडधडणे
बहु कष्टाने
मज सावरणे
सांभाळून मी
तुज बोलणे

विक्रांत प्रभाकर



गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

मैत्रीण





तू एक वादळ आहेस सखी
निजलेल्या रानाला जाग आणणारी
जडशील मनाचा कण कण  
गदगदा हलवणारी
सारा फुफाटा, मरगळ
दूरवर उडवून लावणारी

तू एक कविता आहेस सखी
अचानक भेटलेली
मनाला भिडणारी
सुखाचा झरा विराण वाळवंटातील
मनाला केवळ सुख देणारी

तू एक झाड आहे मैत्रीचे
थकलेल्या प्रवाश्याला रस्त्यात भेटलेले
सावली धरणारे शांती देणारे
सारा प्रवास इथेच थांबवा असे वाटणारे

न मागता किती दिलेस तू मला
तुझ्या दु:खाच्या आरश्यात मी
माझ्या दु:खाचे प्रतिबिंब पाहिले
तुझ्या बडबडण्यात अन भांडणात
माझे सारे काठीण्य विरघळले

तुझ्या प्रवासास जाशील तू
माझ्या प्रवासास मी ही निघुनी
तुझ्या मैत्रीचा अन स्नेहाचा गंध
मन ठेवेल सदैव जपुनी 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...