मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

तुझ्याविना






तुझ्याविना जगणार नाही
नाही असे मुळीच नाही
पण जगणे ते असेल काही
याची खात्री मुळीच नाही

अजूनही तुझ्या दुराव्याची
सवय मज झालीच नाही
एकटाच चालीन म्हणतो
पण पावुल उचलतच नाही

जगणे असे भेटले मज की
जगणे अजुनी कळलेच नाही
शब्द ओठावरी येवूनही  
गाणे कधी सुचलेच नाही


 विक्रांत प्रभाकर

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

किनारा




















नर्मदा किनारा
*********


श्वासात भरून वारा
सोडून विश्व पसारा
भटकेल भोवती मी  
होवून तुझा किनारा   
  
रक्तात माखु दे टाचा
देहास दाह उन्हाचा
प्रत्येक स्पर्श सुखाचा
असेल तुझ्या जलाचा

ते रंग मावळतीचे
गूढ गुंजन अंधाराचे
मज स्वप्न तारकांचे
दीप दिसो प्रकाशाचे

जनरीत व्यवहार
मज नकोच आता ग
हे सुटुनी बंध सारे
तव कुशीत यावे  ग

भय द्वेष दु:ख चिंता
जावे सारे हरवून
यशगान कीर्ती प्रीती
यावी तुझी मुखातून

डॉ . विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

मला वाटले माझ्यासाठी ...



मला वाटले माझ्यासाठी
ब्रह्मगीरीवर ध्वजा फडकली
अन दृष्टीची धरून छत्री
वाट फुलांनी कुणी सजवली

भास कुणाचे कुणास होती
कुपामधले मंडूक फुगती
दोन बोटे भूमी वरती
रथ अन आदळत जाती

फार उशिरा जरी कळाले
डोक्यावरचे केस उडाले
नवी सुरवात करू या म्हटले
झाले गेले गंगेत बुडाले

परी वासना जीर्ण कुमारी
त्याच फिरवे चुकल्या रानी
भोगाची अन सुख सौख्याची
विटली तरीही रुचकर गाणी

विक्रांत प्रभाकर




अश्रुविन हातात न राहिले काही






अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही

घोड्यावरी बसुनी तो मंडपी आला
सजुनी पैठणीत ती खांद्यावरी शेला
सनईसवे मंगलाष्टक नाद नभी मिनला
कोपऱ्यात दूर मी विवश सारे पाही

 
अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही


उधळल्या अक्षता वाजंत्री वाजली
तयाच्या जीवनाची वाट सुरु झाली
जाहली बिदाई गाडी निघून गेली
प्रीत परि माझी मी भग्न उरी वाही

अश्रुविन हातात न राहिले काही
आक्रंदन मनात या भरुनिया राही

विक्रांत प्रभाकर

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...