शुक्रवार, २ मे, २०१४

भरल्या पोटाची कविता





भरलेल्या पोटानं
लिहतोय कविता
“भुकेने जळल्या
कलिका लता”

शांत निवांत
लोडला टेकून
एसीचे तापमान
योग्य राखून

शब्दाचा परिणाम
यमक विचार
आठवतो कुठली
उपमा चमकदार

ठरवले असते
कविता लिहल्यावर
मॉलला चक्कर
दुपारचा पिक्चर

आणि आल्यावर
लाईकवर नजर
थँक्स धन्यवाद
लाघवी उत्तर

तोवर तिकडे
जंगलात दूरवर  
एका बळीची
पडतेच भर  

वाचणारा अरे रे  
लिह्णारा खरे रे
काही मिनीटातच
विसरती सारे

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





गुरुवार, १ मे, २०१४

माणूस आहोत आपण..




(नितीन आगेच्या निमित्ताने)

सतरा अठरा वर्षाचे
तरुण कोवळे वय
कुठल्याही मुलीने
हाक मारली तरी
धडधड वाढायचे
नर्व्हसनेस झाकायचे
वेड्या खुळ्या स्वप्नांचे
रानभूली वय
अश्या या वयात
अनोळखी वनात
हलकेच पाऊल
पडले म्हणून
यौवनाच्या गंधाने
नकळत छाती
भरली म्हणून
द्वेषाचा तीर गेला
धुंद हृदयास भेदून
कळल्या वाचून गंध कसला
कुठल्या फुलावरून आला
कट्टर कडव्या हातांनी
श्वास बंद करून टाकला
माणूस आहोत
माणूस आहोत
माणूस आहोत आपण
कितीदा सांगायचे
पुनःपुन्हा त्यांना    
कानामध्ये ओरडून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, ३० एप्रिल, २०१४

मदांध सत्ता ...


तोंडामध्ये पान चघळत
अजस्त्र देह धडधाकट
पुढे येती सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कुणाकुणाच्या नावाचा
टिळा कपाळी लावलेला
डोळ्या मध्ये बेदरकार
सत्तेचा मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र वासात मिसळली
परीटघडीच्या पेहारावी
गुंडगिरी सजलेली
आम्ही झोडू आम्ही मोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्या वाचून
समोरच्याला पार गाडू
होते दानव काय वेगळे
यवनांनीही हेच केले
बाहुच्या मदात मातले
परि शेवटी मातीत गेले
नियती फिरवे गरागरा
तीच वर्तुळे पुनःपुन्हा
सत्ता मद अविचार अंत
कळूनी सारा घडे गुन्हा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २८ एप्रिल, २०१४

द्रां बीज हृदयी





द्रां बीज हृदयी
रुजे खोलवर
झालो वृक्षाकार
औदुंबर ||
वाचून फुलांच्या
फळलो मनात
बहर रुखात
प्रेम फुटे ||
करुणा तयांची
मागितल्यावीन  
ओघळून घन
तृप्त झालो ||
देवाचाही देव
कृपाळू होवुन
आला उतरून
गिरनार ||
मिळाले अवघे
जाहले कल्याण
धन्य निरंजन
दत्त पदी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...