सोमवार, २४ मार्च, २०१४

पेरॉलवरचे सुख





चार मुक्त श्वासासाठी 
प्राण तिचे आसावले 
पैसा पाणी उधळत
संधी मिळता धावले

चार दिवस सुखाचे
धुंदीमध्ये उधाणले  
गंजलेले नाते तिचे 
दु:ख सारे विसरले 

मनातून पण तिला
सारेच माहित होते
हे असे सुख केवळ 
पेरॉलवरचे असते
 
गज तिची वाट आहे 
पाहत तिकडे बसले
शृंखलेच्या आठवेनी  
मग पाय जड झाले    

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




रविवार, २३ मार्च, २०१४

घोलपांचे दुकान..



कुणाची तरी नजर लागली
घोलपांचे दुकान बंद पडले
घोलप म्हणाले ,
“मी काय कुणाचे घोडे मारले
सारे करतात तेच मी केले .
माल आणला ,माल विकला
कुठे पाव कुठे अर्धा ,
माल इकडे तिकडे गेला .
शंभर टक्के धंदा कुठला
सांगा प्रामाणिक असतो
चाणे कुजबळ गवार पाटी
आम्ही सारे हेच करतो
पुढचे दार बंद पडले
तरी काही हरकत नाही
मागच्या दारची वहिवाट
कुणी मोडू शकणार नाही
बरे वाईट दिवस तर
साऱ्यांनाच येतात
मनमाडी डॉगाईत हे मित्र
ताठ मानेने मिरवतात
हिशोब थोडा चुकला खरा
पण आम्ही निर्दोष आहोत
नवे नवे होतो तेव्हा
आता एकदम पक्के आहोत
काही वर्ष वरवर टाळे
बहुदा तेही बसणार नाही
बसले जरी दुर्दैवाने
फार कमी होणार नाही
पण जो नडेल आम्हाला
कधी सोडणार नाही त्याला
आम्ही मानतो लोकशाहीला
हात  तिच्या ** ला ! "

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, २२ मार्च, २०१४

जाळे







आपण विणतो जाळे
जगण्यासाठी स्वत;ला
जाळ्याच्या गुंत्यात मग   
घेतो गाडून स्वत;ला

पदाचे प्रतिष्ठ्तेचे 
झगझगीत कपडे
घालतांना नकळत
करतो नग्न स्वत:ला

कधी कुठल्या ध्येयाचे
फाजील सत्ता केंद्राचे
नाव लावून दाराला
करतो दास स्वत:ला

अहो स्वामी महाराजे
जगायचे जगायला
काय कुण्या दारावरी
श्वान करणे स्वत;ला

तेच यावे अभिमानी
रक्त सळसळूनिया
साऱ्या बंधातून त्वरे    
मुक्त करीत स्वत:ला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



गुरुवार, २० मार्च, २०१४

तुका म्हणे



  
माझे वेडे शब्द
वाचू नका कुणी
उरात टोचणी
लागेल बा ||१ ||
सदैव छळेल
जीवनाचे कोडे
अरुपाचे वेड
डोईवरी ||२ ||
थांबा जरा पहा
करा विचार हा
संसार अवघा
विस्कटेल ||३||
नसे घडीभर
जीवा विरंगुळा
ऐश्या प्रवासाला
जाणे पडे ||४ ||
मग तयातून
नसेच सुटका
म्हणतसे तुका
तुम्हा आम्हा ||५||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...