बुधवार, १९ मार्च, २०१४

शिवरात्रीला ..




शिवरात्रीला ..

शिवालयी त्या
गेल्या वाचुनी
बेल फुले जल
वाहिल्या वाचुनी |
घुमतो हृदयी
बबं बम ध्वनी
डमरू वाजे
भृकुटीमधूनी |
उठले वादळ
सर्वांगातुनी
गेले मी पण  
सवे घेवूनी |
विलया गेली
पंच भुते नि
किर्ती तुझी
आली कळूनी |
पुन्हा एकदा
शून्या मधले
स्पंदन कळले
शक्ती भरले |
पुन्हा एकदा
भ्रम कळला
भक्ती वाचून
जन्मा आला |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शिमगा आणि डॉल्बी


 


ढणाणा वाजत होता
डॉल्बी भर रस्त्यात
खिडक्या होत्या हादरत
आणि भिंती थरारत  
छातीच्या पिंजऱ्यात
जोर जोराने धडाडत
काना मस्तकाच्या
पार ठिकऱ्या उडत
हळू हळू ब्लड प्रेशर
होते वरवर चढत
अस्वस्थ बेचैनीत
क्षणोक्षणी भर पडत
दारखिडक्या अगदी  
करकचून लावूनी
घरात घुसणारा तो
थांबत नव्हता ध्वनी
साऱ्या अस्तित्वावर
जणू बिनदिक्कत
दिवसा ढवळ्या होता
बलात्कार करत  
आम्ही सारे रहिवासी
होतो षंढ दुबळ्यागत
कानात कापूस घालून
गुपचूप सारे पाहत
अजून एक दिवसीय  
सार्वजनिक अत्याचार
तोंड बांधून बुक्क्यांचा
सहन करीत मार
सहन करीत जे न
सांगता येते जसे
अवघड जागेवरचे
गळू सांभाळावे तसे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









  



मंगळवार, १८ मार्च, २०१४

संताच्या नातवा....




मजला कळेना गादीचा प्रकार
संताच्या नातवा कैसा अधिकार
मानसिकता ही इथल्या जनाची
सवय असे का सदा गुलामीची
काय त्याने इथे मिळविले असे
जनासी दिधले कधी काय कैसे
त्यांना विचारीता शब्दे डाफरती
भक्ताळले डोळे मोठे वटारीती
अथवा मिळतो फटक्यांचा मार
चौदाही पिढ्यांचा घडतो उद्धार
गादीवरी राजा अरेरे म्हणतो
मंबाजी नाटक छान वठवतो
अज्ञानी मी मूढ गरीब बिचारा
पोहोचतो पार नरकाच्या दारा 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १७ मार्च, २०१४

रागावता श्रीमतीजी

रागावता श्रीमतीजी
आपण चूप राहावं
मिळतंय जेवण ते
गप गुमान गिळावं
 
ती का रागावली याचं
कारण लहान आहे
इथं साऱ्या संसारांचं
एकच गाऱ्हाणं आहे

दर सहा महिन्यात
एक भूकंप होतोय
जपान्यांचे ते सोसणं
आता मला कळतय

तसे लहान उद्रेक
नेहमीच घडतात
दोन चार दिवसात
अन मिटून जातात

हळू हळू दरी पण
रुंद खोल करतात
जोडणाऱ्या त्या पुलास 
रे सावध म्हणतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...