सोमवार, १० मार्च, २०१४

कुठे मनास गुंतवू




कुठे मनास गुंतवू म्हणतोस का रे
रडण्याची उगा ती भंकस नको रे |
असु दे नसू दे खिशात पैसे 
ये वडापाव पार्टी साजरी करू रे |
गेली जरी ती आज सोडून सारे 
नाक्यावरी चल दुसऱ्या बसू रे |
वाचून कुणा जग ओस पडे ना 
येतात उन्हाळे अन जातात ना रे |
धुळवडीची झालीय तयारी सारी 
उरातले मग सारे बाहेर येऊ दे रे |
नाहीतर करू चल आज उसनवारी 
दु:खास खास त्या उतारा घे रे | 

विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, ९ मार्च, २०१४

पैसा ओत

 


पैसा ओत
पोरगी पटेल
बायको हसेल
सुख मिळेल |
पैसा ओत
छत मिळेल
फ्लश असेल
सुख कळेल |
पैसा ओत
पोर शिकेल
काम करेल
सुख मिळेल |
पैसा ओत
मोर्टीन जळेल
डास पळेल
सुख मिळेल |
पैसा ओत
रांग टळेल
वेळ वाचेल
देव दिसेल |

विक्रांत प्रभाकर



गुरुवार, ६ मार्च, २०१४

पानोपानी कविता





शेकडो कवींच्या
हजारो कविता
पाऊस थांबेना
पडता पडता 

पडती तळ्यात
पडती मळ्यात
मोतीच फुलती
शुक्ता अन शेता

वाचोत कुणी वा
कुणी ना वाचोत
प्रकाश भेटतो
लिहिता लिहिता 

तयात धावतो
उगाच नाचतो
शब्दांत भिजतो  
वाचता वाचता 

लिहारे गड्यानो
भरभरूनिया
पानोपानी साऱ्या
कविता कविता 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ५ मार्च, २०१४

श्री गणेश वंदना




हात जोडून | करतो वंदन | देव गजानन | आरंभी मी || १ ||
तुझ्या कृपेनं | तुझे नमन | येते घडून | शुभ कार्यी || २ ||
दु:ख सरुनी | विघ्न पळूनी | जाते होवुनी | विश्व सुखी || ३ ||
मी तो बालक | नवथर साधक | भक्ती एक | तुज मागे || ४ ||
रिद्धीसिद्धीचा | दाता जगाचा | परि मी त्याचा | नसे भुका || ५ ||
तुझ्या चरणी | मीपण वाहुनी | जावी संपूनी | सर्व गती || ६ ||
हेच सांगणे | देवा मागणे | ठाव देणे | तुझ्या पदी || ७ ||
तव गुणगाणी | झिजो लेखणी | सदैव वदनी | नाव तुझे || ८ ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...